भारतातील पॉप संगीताचा प्रवाह आला तो एमटीव्ही आणि व्ही चॅनलच्या आगमनानंतर. तो अल्पकाळ टिकला. कारण संगीतातील जागतिकीकरणाचा मारा नंतरच्या दरेक वर्षांत इतका मोठा होता की त्यापुढे आपल्या ‘चाँद जैसा मुखडा’, ‘तेरा चेहरा’, ‘हुस्न’ असल्या शब्दांची गाणी रुचेनाशी झाली. लकी अलीने ‘सुनो’ या अल्बमनंतर ‘सिफर’ आणि ‘अक्स’ नावाचे आयुष्याच्या तत्त्वज्ञानाशी निगडित वगैरे गाण्यांची पूर्ण तयारीनिशी बांधणी केली. पण पुढे रिमिक्स-डीजे इलेक्ट्रॉनिक संगीताची लाट. पॉप स्टार्सची चित्रपटांमध्ये लागणारी वर्णी, पाकिस्तानी पॉप गाण्यांची लाट, व्ही आणि एम टीव्हीवरचा रिअॅलिटी शोजचा सुळसुळाट यात भारतीय पॉप चळवळ हद्दपार झाली. हाच प्रकार ऐंशीच्या दशकात अमेरिका आणि ब्रिटनसह आधी एमटीव्ही पोहोचलेल्या राष्ट्रांमध्ये झाला, पण अमेरिका आणि युरोप खंडामध्ये पॉपस्टार निर्मितीची यंत्रणा पायरसी वाढेपर्यंत जोशात होती. रिअॅलिटी शोजच्या माऱ्यातही दरेक आठवडय़ात नव्या-जुन्या कलाकारांची अल्बम प्रकाशित करण्याची हौस संपलेली नाही. या उद्योगाचा आर्थिक नफा कमी झाला असला, तरी संगीतोत्साह कायम राहिलेला आहे. नव्वदीच्या दशकात चांगल्या आणि श्रवणीय इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा दुष्काळ होता, तेव्हा निव्वळ डान्सनंबर्सनी ओळखल्या जाणाऱ्या मोबी या बॅण्डचा ताजा म्हणजे तब्बल पंधरावा अल्बम काही आठवडय़ांपूर्वीच प्रकाशित झाला. ‘एव्हरीथिंग इज ब्युटिफुल, अॅण्ड नथिंग हर्ट’ नावाच्या या अल्बममध्ये नव्वदीपासून आजच्या झंगड इलेक्ट्रॉनिक संगीताचा प्रभाव आहे. या बॅण्डची अनेक गाणी लोकप्रिय झालीत. ‘पोर्सिलिन’ नावाचे प्ले या अल्बममधील गाणे आपल्याकडे अधिक परिचित आहे. लिओनाडरे डि कॅप्रिओच्या ‘द बीच’ सिनेमात ते वापरले गेले. या बॅण्डचे ‘लास्ट डेज’ नावाचे गाणे भारतात चित्रित करण्यात आले आहे. चित्रीकरणाचे कोणतेही नियोजन न करता दैनंदिन जीवनातील अस्सल भारतीयत्व शोधण्याचा त्यात प्रयत्न केला आहे. इलेक्ट्रॉनिक संगीत असूनही पुन:पुन्हा ऐकाव्याशा वाटणाऱ्या कलाकारांमध्ये मोबीइतकेच ब्रिटिश गायिका इमोजन हीप हिच्या गाण्यांचा समावेश करावा लागेल. कित्येक सूर-ताल वाद्ये लिलया वाजविणाऱ्या या कलाकाराच्या ‘फ्रो-फ्रो डिटेल्स’ या एकटय़ा अल्बममध्ये सरस गाण्यांचा पाऊस पाडण्यात आला आहे. त्यातील ‘हिअर मी आऊट’, ‘ब्रिद इन’ ही विशेष गाणी खूपदा ऐकूनही टाकून देता येणार नाहीत. ‘हिअर मी आऊट’ हे प्रेमगीत आहे आणि त्याला वाजणारे सर्वच संगीत इलेक्ट्रॉनिक आहे. ‘ब्रिद इन’ या गाण्यातला कोरस आणि बिट्स घरातल्या भिंतींना पाठ होऊन जाईल, इतके हे गाणे पुन:पुन्हा ऐकावेसे वाटणारे आहे. इमोजन हीपच्या खास आवाजाची जादू ‘मस्ट बी ड्रीमिंग’ या गाण्यामध्ये सापडते. आपल्याकडे सुरुवातीला एमटीव्ही आणि व्ही चॅनल आणि नंतर व्हीएचवन एवढाच संगीताचा स्रोत असल्यामुळे त्यावर सातत्याने वाजणाऱ्या कलाकारांना देशी संगीतवेडय़ांकडून ओळख मिळाली. नव्वदीच्या दशकात आपल्याकडे मायकेल जॅक्सन, मेडोना यांचे चुकीचे प्रस्थ तयार झाले होते. आवडत नसली तरी केवळ प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून तरुणाई त्यांची गाणी ऐकायची. यूटय़ुब आणि पायरसीने इतक्या प्रचंड मोठय़ा गुंफा उपलब्ध करून दिल्या की ऐकणाऱ्यांना हवे ते उत्तम शोधायची संधी मिळाली. १९९१ पासून इल्स या बॅॅण्डची गाणी बिलबोर्र्डच्या पंढरीमध्ये वाजत आहेत. हा बॅण्ड आपल्याकडे परिचितही असण्याचे कारण नसले तरीही त्यांची सारी इलेक्ट्रॉनिक्स आणि आकुस्टिक गाणी आवडीने ऐकावीत अशी आहेत. अलीकडच्या काही लक्षणीय चित्रपटांत वाजविण्यात आलेल्या या बॅण्डच्या गाण्यापैकी ‘लव्ह ऑफ द लव्हलेस’ नावाचे गाणे आपल्या म्युझिकलिस्टमध्ये साजेसे ठरेल. इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा बहुतांश भाग असलेले हे गाणे चाल, शब्दांनी ऐकणाऱ्याला सहजपणे जिंकून घेते. इल या बॅण्डहून अधिक स्थानक असलेला आणखी एक अमेरिकी समूह ‘टेलिकनिसिस’ यांचे ‘कॉल ऑल डॉक्टर्स’ हे एकच गाणे प्रभावित करण्यास पुरेसे आहे. हा बॅण्ड अत्यंत अपरिचित गटात मोडणारा आहे. पण त्यांचे इलेक्ट्रॉनिक संगीत कानांपासून मेंदूवर कोरले जाणारे आहे. इलेक्ट्रॉनिक संगीत नेहमीच टीका केली जाते तितके आक्रस्ताळे नसून पुन:पुन्हा ऐकणारे देखील असू शकते, हे सिद्ध करणारी उदाहरणे आजच्या स्तंभात आहेत. ताज्या बिलबोर्र्ड यादीत ड्रेकच्या ‘गॉड्स प्लान’नंतर दुसऱ्या स्थानी असलेले ‘रुडीमेंटल’ बॅण्डचे ‘दीज डेज’ आणि ‘सन कम्स’ ही गाणी, झेड-मारेन मॉरेस-ग्रे यांचे ‘मिडल’ आदी नवी इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा मेळ असलेली गाणीही सहज भावणारी आहेत. भारतातील पॉप गाण्यांमध्ये डीजे संस्कृतीमुळे इलेक्ट्रॉनिक वाद्यांची सरमिसळ झाल्यानंतर श्रवणीयतेऐवजी ती अधिकाधिक हिडीस बनत गेली. अर्थात इथल्या कानसेनांनी ती नाकारल्यामुळे आणि ग्लोबल संगीत प्रवाहाला कवटाळल्यामुळे भारतीय पॉप चळवळ संपली, त्याचा कसलाही तोटा झाला नाही.
म्युझिक बॉक्स
- Eels- Love of the Loveless
- Moby – Porcelain
- Frou Frou – Breathe in
- Frou Frou – Hear Me Out
- Telekinesis – Call All Doctors
- Zedd, Maren Morris, Grey – The Middle
- Rudimental – These Days