भारतीय सिनेसंगीताने नॉस्टॅल्जिक आणि प्रेमहळव्या मनांची मोठी फौज आरंभापासून तयार केली. म्हणजे ध्वनिमुद्रणाच्या प्राथमिक अवस्थेतल्या के. एल. सेहगल यांच्या ‘जब दिल ही तुट गयाँ’ने लक्षावधी तरुणांना एकतर्फी प्रेमभंगाचे आपले रडगाणे गाण्याची संधी कित्येक दशके दिली. ‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा’ हे किशोरकुमार यांचे गीत आपल्या चुकीचे खापर कुणा दुसऱ्यावर फोडण्याचे सर्वात मोठे उदाहरण. पण भारतीय ब्लॉकबस्टर अथवा सुपरडय़ुपर हिट सिनेमांची कथानके कित्येक दशके प्रेमउत्साह, प्रेमगैरसमज, प्रेमदु:स्वास आणि प्रेमसामोपचार या एकामागोमाग येणाऱ्या घटकांनी परिपूर्ण होत असल्याने त्यानुरूप त्यातील गाणी बनत होती. सुरुवातीला नायिकेच्या पाठीमागे भिरभिरत चंद्र-ताऱ्यांची मालकी असल्याचा थाट मिरविणारा नायक काही काळानंतर आपल्या एकटेपणाला कुरवाळत गाण्यातून साऱ्या दु:खास नायिकेला जबाबदार धरताना दिसतो. या दु:खदर्शनात अलीकडे अमित त्रिवेदीने तयार केलेले ‘मुझे छोड दो मेरे हाल पे’ हे लुटेरा सिनेमातील गीत फार जमले आहे. म्हणजे त्रिवेदीच्या सुरुवातीच्या गाण्यांपासून परिचय असणाऱ्यांना त्याची वाद्यावळ, कोरस आणि चालीची दिशा लक्षात येतील. पण या गाण्याचे वैशिष्टय़ म्हणजे या एकलपणाच्या गीतामध्ये कुणावर खापर न फोडता स्वत:च्या चुकांची कबुली अधिक आहे. देव डीमधील ‘जिंदा है इक हलचलसी’ किंवा ‘उडान’ सिनेमातील शीर्षकगीतास ऐकले, तर लक्षात येईल की, अमित त्रिवेदीच्या गाण्यात एकलपणाच्या विविधांगी स्वरछटा असल्याचे छुपे वैशिष्टय़ आहे. ‘इमोसनल अत्याचार’ ते ‘फस गया’ आणि ‘ओ परदेसी’पासून ते ‘धाक धूक’ (इंग्लिश-विंग्लिशमधील हे गाणे सिनेमात लक्षात आले नसल्यास तातडीने अनुभवा).

आपल्याकडे दु:ख, प्रेमभंगाच्या किंवा एकलपणाच्या गाण्यांमध्ये शब्दांपासून ते वाद्यांचे प्रयोग होत आहेत. ब्रिटिश-अमेरिकी गाण्यांमध्ये हे प्रयोग एमटीव्ही आरंभाच्या काळात मोठय़ा प्रमाणात झाले होते. तरीही एकलपणाच्या विविधरंगी छटा बिलबोर्ड यादीमध्ये पाहायला मिळतात. एकॉन या सेनेगली-अमेरिकी गायकाचा गेल्या दशकापासून जगभरात दबदबा वाढला होता. त्याच्या ‘लोन्ली’ या गाण्यातील शब्द आणि आशय किशोरकुमार यांच्या ‘कोई हमदम ना रहा’चे भाषांतर वाटू शकते. पण गाण्यातील वाद्यावळीहूनही कानांना पकडले जाते, ते एका ट्रॅकवर वेगात वाजणारे गाण्याचे शब्द. हे गाणे आपल्याकडच्या एफएम वाहिन्यांचे संध्याकाळी आणि रात्रीचे लाडके गाणे होते. एकॉनच्या नंतरच्या राईट नाऊ (ना ना ना) आणि इतर प्रत्येक गाण्यांना तरुणाईने आपलेसे केले. डेव्हिड ग्रे हा आपल्याकडच्या संगीत वाहिन्यांनी लोकप्रिय केलेला गायक कधीच नव्हता. या ब्रिटिश गायकाची कित्येक गाणी मात्र खूप लोकप्रिय आणि हॉलीवूड सिनेमांमध्येही वापरली गेली आहेत. ‘बॅबेलॉन’, ‘दिस इयर लव्ह’, ‘सेल अवे’ या प्रत्येक गाण्यांमध्ये त्याच्या एकूण गाण्यांची वैशिष्टय़े सापडतील.

त्याच्या ‘प्लीज फरगिव्ह मी’ या गाण्याची अमित त्रिवेदीच्या ‘मुझे छोड दो, मेरे हाल पे’ या वर उल्लेख केलेल्या गाण्याशी तुलना होऊ शकते. माफीनाम्याचे हे गाणे ड्रम्सच्या वेगवान ऱ्हिदममध्ये चालते. गाण्याला सौंदर्य प्रदान करणारा गिटारचा तुकडा मध्यापासून हे गाणे खुलवत नेतो. या गायकाचे नावही ऐकले नसेल तर वर उल्लेखलेली गाणी आवर्जून अनुभवा. साऱ्या कम्पोझिशन्स नवी संगीतचव म्हणून ऐकायला सुखद वाटतील. डेव्ह मॅथ्यूज बॅण्ड ही ओळख असलेला कलाकार डेव्ह मॅथ्यूज त्याच्या गाण्यांहून अधिक लाइव्ह कन्सर्टसाठी परिचित आहे. त्याचे सगळे लाइव्ह कन्सर्ट यूटय़ूबवर किती संख्येत पाहिले गेले आहेत, ते आकडे थक्क करणारे आहेत. दर कन्सर्टमध्ये हा गायक आणि त्याचे सहकलाकार गाणे वेगळी चाल किंवा वेगळ्या वाद्यांना घेऊन पूर्णपणे बदलून टाकतात. गिटारवर कॉर्डप्रयोगांचे सर्व प्रकार डेव्ह मॅथ्यूज करून दाखवितो. त्याचे ‘ग्रेस इज गॉन’ हे गाणे ऐकावे ते खास कारणासाठी. प्रेमभंगानंतरच्या दु:खाची अवस्था मद्याचा एकच प्याला आणखी मागत मांडतो. प्यालागणीक दु:ख कसे जाईल याचे यात सुश्राव्य वर्णन आहे. वेस्ट इंडिज बेटांवरच्या बार्बाडोसमध्ये जन्मलेली रिहाना हिची अनेक गाणी ग्रॅमीच्या वाटेने आणि अमेरिकी प्लेलिस्टसोबत आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. तिचे ‘वर्क, वर्क, वर्क’ हे गाणे त्यातल्या उच्चारासाठी आवर्जून ऐकणे अनिवार्य आहे. हे गाणे सुपरहिट आहेच. त्याशिवाय समूहामध्ये एकलपणाच्या अवस्थेचे उत्तम वर्णन करणारे आहे. एकलपणाची ही सगळीच गाणी सॅडसाँग्ज नाहीत. डेव्हिड ग्रे याचे मण्डे मॉर्निग किंवा डेव्ह मॅथ्यूजच्या कोणत्याही गाण्याच्या श्रवणातून उत्साह द्विगुणितच होऊ शकतो.

म्युझिक बॉक्स

  • Akon – Lonely
  • David Gray – “Babylon
  • Rihanna – Work
  • Dave Matthews – Grace Is Gone
  • David Gray – This Year’s Love
  • David Gray – Please Forgive Me
  • David Gray – Monday Morning

viva@expressindia.com

Story img Loader