वेदवती चिपळूणकर viva@expressindia.com

पूर्वी जेव्हा लग्नाच्या पत्रिका छापल्या जात असत तेव्हा त्यावर ‘आमचे येथे श्रीकृपेकरून चि. अमुक अमुक व चि. सौ. कां. तमुक तमुक यांचा शुभविवाह करण्याचे योजले आहे’ वगैरे वगैरे मजकूर असायचा. लग्नाच्या आधी त्याची सोशल मीडियावर पब्लिसिटी करायची प्रथा तोपर्यंत नव्हती. त्यामुळे जोडी कितीही बहुचर्चित असली तरी त्या जोडीला काही विशिष्ट नाव वगैरे ठेवायची पद्धत सुरू झाली नव्हती. मात्र सैफ अली खान आणि करिना कपूर यांचे फर्स्ट नेम एकत्र करून या जोडीला वर्तमानपत्रांतून ‘सैफीना’ हे नाव दिलं गेलं. सोशल मीडियाने हा ‘ट्रेण्ड’ म्हणून आणला असला तरी वर्तमानपत्रांनी याबाबतीत मात्र आघाडी घेतली होती. आणि मग अशा जोडय़ांच्या नावांचे शब्द तरुणाईच्या डिक्शनरीमध्ये ‘इन’ झाले.

एखाद्या कपलमधल्या दोघांचीही नावं एकत्र करून काहीतरी ऐकायला बरं वाटणारं नाव तयार करायचं आणि ते व्हायरल करायचं ही याची पद्धत! त्यासाठी ते कपल प्रचंड लोकप्रिय असलं पाहिजे वगैरे अशी अट नाही. उलट अनेकदा असे हॅशटॅग वापरून ते सोशल मीडियावर फेमस केलं जातं. ज्या लग्नांची लोकांना उत्सुकता असते त्यांच्या नावांचे हे असे खेळ सुरू होतात. ‘विराट’ आणि ‘अनुष्का’चे फॅन्स त्यांना ‘विरुष्का’ म्हणतात तर ‘शशांक केतकर’चे फॅन्स त्याच्या लग्नासाठी ‘प्रिश’ हा हॅशटॅग व्हायरल करतात. या ट्रेण्डचा वापर मराठी मालिकांनीही काही प्रमाणात केला. ‘तुझं माझं ब्रेकअप’च्या वेळी समीर-मीराचा ‘समीरा’, ‘गोठ’च्या वेळी राधा-विलासचा ‘विरा’ आणि ‘फुलपाखरू’च्या वेळी मानस-वैदेही यांचा ‘मंदेही’ हा हॅशटॅग सोशल मीडियावर गाजला. याच्याही पुढे जाऊन शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने तर मुलीचं नावच ‘मिशा’ ठेवलं. काही वेळा या अशा जबरदस्तीने लावलेल्या शब्दांच्या जोडय़ा फसतातही, उदा. निक जोन्स-प्रियांका चोप्राचं ‘निकयांका’ किंवा ‘सारे तुझ्याचसाठी’मधलं कार्तिक-श्रुतीचं ‘श्रुतीक’ !

आपल्या लाडक्या आणि आवडत्या जोडय़ांना संबोधन म्हणून, त्यांच्या प्रेमाबद्दल आपल्याला असलेला उत्साह म्हणून प्रेमाने अशी नावं ठेवायचा हा ट्रेण्ड अगदीच आत्ताचा नाही. सैफीनापासून सुरू झालेला हा ट्रेण्ड आत्ता जरा सोशल मीडियामुळे जास्तच प्रकाशात आला आहे इतकंच !