हे दोघे खरोखरच स्पेशल आहेत. रॅकेटचा खेळ त्यांचा ध्यास आहे. जिंकणं त्यांची जुनी सवय आहे. बावनकशी खेळाच्या मैफलीत ते भान हरपून झुंजतात. शेरास सव्वाशेर ठरतात आणि मग..

कॅमेरा सुरू होतो. पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे चेक्स असलेला शर्ट. त्यावर निळ्याची झाक असणारा काळा सूट. त्याच रंगाची पँट. ब्रँडेड शूज. मोठ्ठं नाक, जराही पोट सुटलेलं नाही असा सडपातळ बांधा. क्लिन शेव्ह. ब्राऊन रंगाचे भुरभुरणारे केस सावरत कानाला लावलेल्या माइकवर तो बोलू लागतो- ‘‘राफा नावाच्या महान खेळाडूला सन्मानित करायला मी आलो आहे. ज्या खेळाला त्याचं अमूल्य योगदान आहे त्या खेळाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून त्याने सुरू केलेला उपक्रम अतिशय आनंदाचा आणि समाधानाचा क्षण आहे. गेली सतरा र्वष आपण टेनिसशी संलग्न आहोत. मेहनत करत आहोत. पण तुझ्या प्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. माझ्या मते टेनिस खेळावर, युवा खेळाडूंवर, समकालीनांवर तुझा प्रभाव विलक्षण आहे. कारण ज्या पद्धतीने तू खेळतोस ते अनोखं आहे. डावखुरी शैली, चेंडू स्पिन करत चकवा देण्याची पद्धत आणि यापेक्षाही जीव ओतून तुझं खेळणं. तुझ्यामुळे मला माझ्या खेळात बदल करावा लागला. मला इथे येण्याची संधी मिळाल्याने प्रचंड आनंद झाला आहे. मुलं या दिग्गज योद्धय़ाकडून खूप काही शिकतील याची खात्री आहे. कारण तो सार्वकालीन महान टेनिसपटू आहेच पण त्याहीपेक्षा खूप सच्चा माणूस आहे. या अकादमीत भविष्यातले प्रतिभाशाली टेनिसपटू घडतील असा मला विश्वास आहे. एक गोष्ट तर नक्की आहे, माझ्या मुलांना टेनिस शिकावंसं वाटलं तर मी त्यांना हक्काने इथेच पाठवेन. अकादमीला आणि युवा टेनिसपटूंना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.’’ बोलणारा माणूस थांबतो. बाजूला खुर्चीत अशाच पेहरावात बसलेला माणूस शेवटच्या वाक्याला खळखळून हसून दाद देतो आणि आदरपूर्वक शुभेच्छांचा स्वीकार करतो. समोरच्या श्रोत्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होतो. कॅमेरा पॅन होऊन दोघांच्या मागे असलेल्या पांढऱ्याशुभ्र पडद्याकडे जातो. लोभसवाण्या निळ्या रंगात राफा नदाल अकादमी अशी अक्षरं उमटतात. त्याच्या डावीकडे स्पेनची ओळख असलेल्या बुलच्या शिंगांचं चिन्हही असतं. जिंकायचं असेल तर शिंगावर घ्यावंच लागतं हे ठसवणारं बोधचिन्ह. व्हिडीओ थांबतो. बोलणारा माणूस असतो- रॉजर फेडरर. ज्याच्याविषयी बोलत असतो तो अर्थातच राफेल नदाल. स्वत: टेनिसचं चालतंबोलतं विद्यापीठ असलेल्या फेडररचं कडवा प्रतिस्पर्धी नदालच्या अकादमी उद्घाटनप्रसंगीचं हे छोटेखानी भाषण नव्या निमित्ताने व्हायरल होतं आहे.

कारकीर्दीच्या संध्याकाळ टप्प्यात हे दोघं आहेत. फेडररच्या नावावर १८ तर नदालच्या नावावर १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत. मुंबई, पुण्यात किंवा कोणत्याही मोठय़ा शहरात स्वत:च्या मालकीची एक जागा घेताना सर्वस्व पणाला लागतं. एक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावताना टेनिसपटूंचं हेच होतं. बहुतांशी टेनिसपटूंना दशकभराहून जास्त वेळ खेळूनही एकही ग्रँड स्लॅम नशिबी येत नाही. या दोघांच्या ग्रँड स्लॅम जेतेपदांची एकत्रित संख्या लक्षात घेतल्यावर त्यांचं दिग्गजत्व ध्यानी यावं. गंभीर दुखापतींनी त्रस्त अशा या दोघांनी अद्भुत पुनरागमन करत वर्षांतल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली. हे दोघे समोरासमोर येणार लक्षात आल्यापासून अगदी फेडररने जेतेपदाचा चषक उंचावल्यानंतरही ‘फेडरर-नदाल’ व्हायरल आहेत. दोघांमध्ये जिंकलं कोण यापेक्षाही ते दोघं एकमेकांबद्दल जे बोलतात ते श्रवणीय असतं. प्रतिस्पध्र्याला उद्देशून अर्वाच्य शेरेबाजी ते शारीरिक इजा करणं एवढी क्रीडापटूंची पातळी खालावली आहे. त्याच काळात फेडरर-नदाल यांचा एकमेकांबद्दलचा आत्यंतिक आदर चकित करणारा आहे. मैदानावर एकमेकांविरुद्ध खेळतानाजिंकण्यासाठी जीवाचं रान करणारे हे कट्टर प्रतिस्पर्धी मॅच संपताक्षणी मैत्री मोडमध्ये असतात.

सत्तेच्या लोण्याचा वाढता गोळा हडपण्यासाठी आतूर युती मित्र आता एकमेकांविरुद्ध मनमुराद गरळ ओकताना तुम्ही रोज पाहताय. मेकअपशिवाय कुरुप दिसणाऱ्या आणि आयटम साँग म्हणजेच अभिनय अशी समजूत असणाऱ्या नटय़ा दुसरीला रोल मिळाला तर आगपाखड करतात (सुदैवाने तो अभिनय येतो त्यांना.) अध्यात्मिक बैठक वगैरे असणारे गुरू दुसऱ्या सेल्फ प्रोकेल्म्ड बाबांवर यथेच्छ टीका करतात. सरस्वतीचे पाईक असणारे लेखक/कवी अन्य बोरुबहाद्दरांना शेलक्या विशेषणांनी हाणतात. आपल्या प्रॉडक्टच्या जाहिरातीत रायव्हल प्रॉडक्टची उणीदुणी काढली जातात. समाज सुधारणेचा वसा घेतलेले दोन सुधारक योगदानाच्या मुद्दय़ावर हमरातुमरीवर येतात. पट्टीचे गायकही दुसऱ्या तानसेनाचा ‘सा’ बहरला की स्वत:ची क्रोध ‘पट्टी’ उंचावतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हीही नोंदवाल. एकाच क्षेत्रात एकाच वेळी दोन तारे चमकू शकतात आणि त्यांच्यात हाडवैर नाही! रिवाइंड होऊन आटपाट नगरीत गेल्याचा भास फेडरर-नदाल जोडीने दिला. आदर दिला तर आदर मिळतो. समोरचा आपल्याएवढा किंबहुना आपल्यापेक्षा जास्त स्किलफुल आहे हे मान्य करून जिंकण्यात गंमत आहे. तुम्ही स्पोर्ट्स दुनियेपासून सुरक्षित अंतर राखून असाल. स्पोर्ट्स सेगमेंटचीच तुम्हाला अ‍ॅलर्जी असेल. पोक्त वगैरे झाल्यावरही सापशिडीत ९७वरून ३ वर घसरगुंडी झाल्यावर तुमचा जळफळाट होत असेल तर आमच्यासाठी बंदिस्ती तोडा आणि स्पोर्ट्समनशिपचा हा तुकडा नक्की अनुभवा.

(ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर हे दोघे सुरेख बोलले आहेत. वायफायची गंगा अंगणी असेल तर आवर्जून बघाच.)

viva@expressindia.com