रश्मि वारंग viva@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

मोठय़ा ब्रॅण्ड्सची लक्षणं कोणती या प्रश्नावर अर्थातच त्याची आर्थिक उलाढाल, व्याप्ती यावर चर्चा होऊ  शकते. पण या जोडीला थोडासा भावनिक भागही जोडल्यास त्या ब्रॅण्ड्सने वापरकर्त्यांच्या मनात निर्माण केलेल्या स्मृतींचा विचारही करता येतो. या अर्थाने भारतीय चॉकलेट, गोळ्यांसाठीचा एक मोठा पण तुलनेने थोडा विस्मृतीत गेलेला ब्रॅण्ड म्हणजे रावळगाव. एका पिढीचा शाळेत जायचा कंटाळा सुसह्य़ करण्याचं काम या ब्रॅण्ड्सच्या पानपसंद, मँगो मुड, कॉफी ब्रेक या आणि अशा अनेक चॉकलेट व गोळ्यांनी केलं. त्या ब्रॅण्ड्सची ही कहाणी.

सोलापूर जिल्ह्य़ात जन्माला आलेल्या हिराचंद वालचंद यांना अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. व्यावसायिक होण्याचं स्वप्न मात्र त्यांना खुणावत राहायचं. वडिलांचा पारंपरिक अडतीचा व्यवसाय सोडून ते आपलं व्यावसायिक नशीब आजमावायला थेट बांधकाम व्यवसायात शिरले. फाटक नावाच्या बांधकाम व्यावसायिकाशी भागीदारीत फाटक-वालचंद बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला. बार्शी लाइट रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामात त्यांना ब्रिटिशांचा दुजाभाव खटकत होता. मर्जीतील ब्रिटिश कंपन्यांना संधी देत भारतीयांना डावलण्याच्या ब्रिटिशनीतीला ठोस उत्तर देण्याची वालचंद यांची इच्छा होती. त्यांनी शेतकी जीवन लहानपणापासून पाहिलं होतं. आणि शेतकी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा शेतीप्रधान भारत देश ब्रिटिशांना पुरून उरेल अशी त्यांची भावना होती. याच भूमिकेतून त्यांनी नाशिक जवळील रावळगाव येथे तब्बल दीड हजार एकर उजाड नापीक जमीन स्वस्तात घेतली. अनेक कृषीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अभियंते यांना हाताशी धरून त्या नापीक जमिनीचं रूपांतर काहीच वर्षांतच उपजाऊ  कसदार जमिनीत झालं. तिथे उसाची लागवड करण्यात आली. १९३३ मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना रावळगाव येथे उभा राहिला. थोडासा दुर्लक्षित असा तो भाग त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह विकसित झाला. याच कारखान्याच्या जोरावर १९४० मध्ये रावळगाव चॉकलेट, गोळ्यांचं उत्पादन सुरू झालं. अगदी तसंच शेतकी प्रारूप त्यांनी पुण्याजवळील कळंब इथे राबवलं. ज्या परिसराला सध्या आपण वालचंदनगर म्हणून ओळखतो.

गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली. बदलत्या काळानुसार आपली संस्कृतीही बदलत गेली. वाढदिवस, त्यानिमित्ताने शाळेत गोळ्या वाटणं, घरी जंगी मेजवानी साजरी होणं हे सारं रुजत असताना घाऊक प्रमाणावर चॉकलेट किंवा गोळ्यांची पाकिटं खरेदी करणंही अनिवार्य झालं. ८०/९० च्या दशकातील पिढीला आई-बाबांनी अशाच निमित्ताने घरी आणलेली रावळगाव चॉकलेटची थैली नक्की आठवत असेल. हिरव्या, लाल चकचकीत आवरणातली ती चॉकलेट्स म्हणजे वाढदिवस धमाल साजरा होणार याची ग्वाही असायची. त्या चॉकलेट्सवर विशिष्ट नाव नसायचं तर रावळगाव अशी छान लफ्फेदार अक्षरं असायची. या घाऊक खरेदीबरोबर शाळेजवळच्या दुकानातील हाका मारून बोलावणाऱ्या बरण्यांमध्ये रावळगावचं पानपसंद, मँगो मूड खुणावायचं. महागडी चॉकलेट भेट देऊन मैत्री करण्याचा तो काळ नव्हता. पण खिशातील पानपसंद, मँगो मूडने शाळेतील कितीतरी मैत्रीबंध पक्के केले. खिसा अशक्त असेल तर फक्त स्वत:पुरतं गोळी घेणंही लपून राहायचं नाही. लालभडक झालेली जीभ दगा द्यायची. ‘‘एकटीनेच पानपसंद खाल्लंस ना? आता मी देते का बघ’’ अशा धमक्या मिळायच्या.

रावळगाव हे ब्रॅण्डनेम मनावर ठसण्यात त्यांच्या जाहिरातीचा वाटाही मोठा होता. मँगो मूडच्या जाहिरातीतला तो गवतातला तरुण आणि नंतर पिकल्या मिशीचा आंबा आठवून बघा. पानपसंदच्या जाहिराती हिंदी असल्या तरी मराठी कलाकारांच्या दर्शनाने त्या अधिक जवळच्या वाटत. ‘शादी और तुमसे? कभी नहीं’ असं रागात म्हणणाऱ्या अर्चना जोगळेकर किंवा हातात लाटणं घेऊन ‘देखो मुझे गुस्सा मत दिलाओ, अपनी बिवीपे हुकूम चलाते हो?’ असं खडसावणाऱ्या भारती आचरेकर पडद्यावर दिसत. मग पानपसंद समोर येई. सोबत आवाज ‘पान का स्वाद गजब की मिठास’ आणि तीच वाक्यं लाडेलाडे बोलली जात. या जाहिरातीसुद्धा रावळगाव गोळ्यांइतक्या गोड होत्या.

नंतर अनेक परदेशी कंपन्यांच्या मार्केटिंगचा झंझावात आला आणि आपली ही देशी बनावटीची चॉकलेट्स गोळ्या कुठेतरी मागे पडली. आजही रावळगाव चॉकलेट वितरित होतात पण सध्याची पिढी त्या स्वादापासून अनभिज्ञ आहे. मध्यंतरी एका सर्वेक्षणात कोणती भारतीय चॉकलेट्स परत बाजारात यावीशी वाटतात? या प्रश्नाला अनेकांनी इतर गोळ्यांसह पानपसंद, मँगो मूड हे दिलेलं उत्तर बोलकं आहे.

रावळगाव गोळ्यांची टॅगलाइन आहे, स्वीट स्माइल ऑन मिलीअन्स ऑफ फेसेस. ही टॅगलाइन अनेक अर्थाने खरी होती. गोळ्या, चॉकलेट यांच्या गोडव्यासोबत तुलनेने स्वस्त अशी ही चॉकलेट सर्व थरांतील मंडळींना परवडत.

आज ७८ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड काहीसा झाकोळलाय, पण तरीही स्मृतींच्या पडद्यावर त्याच्या आठवणी लख्ख आहेत. लहान वयातील अप्रूप असणारे वाढदिवस, मैत्रीच्या आणाभाका, भांडणांची मिटवामिटवी यांचा हा गोड साक्षीदार म्हणूनच आजही केवळ नावाच्या उच्चाराने चेहऱ्यावर हसू फुलवतो.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravalgaon brand history