सर्कस म्हटलं की नॉस्टॅल्जिया जागृत होतो. टेक्नोयुगात सर्कस व्हायरल होणं म्हणजे ‘एक पाऊल मागे’ म्हणायला हवं. पण हे मागे जाणं वनटाइम आहे– पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, ग्रे असं सगळंच आहे. दैनंदिन रुटिनरूपी सर्कशीतून वेळ काढून वाचा.
शहराबाहेरची मोठ्ठी मोकळी जागा पाहून ते डेरा टाकायचे. त्यांच्या आगमनाची वार्ता कर्णा बसवलेल्या रिक्षातून व्हायची. मोक्याच्या ठिकाणी आकर्षक शब्द आणि फोटो असलेली पोस्टर्स झळकायची. मी जाऊन आलो, जाम मज्जा आली, तू गेला नाही अजून असं कुणीतरी शाळेत म्हणायचं. न गेलेले हिरमुसायचे. या निराशेचं घरी गेल्यावर आई-बाबांकडे हट्ट करण्यात रूपांतर व्हायचं. हिशोबाची वही तपासून शनिवारची संध्याकाळ पक्की व्हायची. ठेवणीतले चांगले कपडे बाहेर निघायचे, केसांना तेल लावून भांग पाडून स्वारी तयार व्हायची. येताना गर्दी होईल, अडचण होईल म्हणून स्कूटर घेऊन ते त्रिकोणी कुटुंब वेशीबाहेरच्या त्या अनुभवाच्या दिशेने कूच करायचं. दूरवरूनच रंगांची आणि प्रकाशाची उधळण मनमोहक दिसे. काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार याची खात्री पटल्याने मनातली लगबग विस्फारलेल्या डोळ्यांद्वारे बाहेर पडत असे. प्रचंड आकाराचा तंबू. इटुकल्या आकाराचा चिवटय़ाबावटय़ा रंगाचे कपडे घातलेला आणि स्प्रिंगप्रमाणे हालचाली करणारा विदूषक. भालू अस्वलाशी गट्टी केलेला तो मुलगा. आतापर्यंत गोष्टींमध्ये पाहिलेले वाघ-सिंह. वाघाचं पट्टेदार रांगडेपण आणि सिंहाची भलीमोठी आयाळ या कशालाही न घाबरता त्यांच्या जबडय़ात हात घालणारा अवलिया. ज्याच्या आकारानेच भीती वाटावी अशा गजराजाच्या पाठुंगळीवर बसून त्याला तालावर नाचायला लावणारा माहुत. दोरी आणि वर्तुळाकार रिंगमध्ये राहून अजब गजब कसरती करणारी मंडळी. गाणी, विनोद, जिम्नॅस्टिक्स या सगळ्यांची सोबत असलेली प्राणी, पक्षी आणि माणसांची दीड दोन तासांची मैफल प्रत्येकाने एकदातरी अनुभवलेली. त्या प्राण्यांचं जगणं काय कसेल किंवा प्राण्यांना सांभाळणाऱ्या माणसांची स्थिती कशी असेल असे विचार तेव्हा कधीच मनात येत नाहीत. कारण तेव्हा मन त्या अनुभवाने भरलेलं असे.
दूरवरच्या अमेरिकेत अशाच अनुभवांची कायमस्वरूपी अखेर होणार आहे. ‘रिंगलिंग ब्रदर्स अॅण्ड बारनुम अॅण्ड बेली सर्कस’ अशा भल्याथोरल्या नावाच्या सर्कस कंपनीने तब्बल १४६ वर्षांच्या सेवेनंतर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्कस कंपनी, झाली बंद त्याचं काय एवढं असं म्हणण्याआधी थोडं थांबा. अल्बर्ट, ऑगस्टस, विल्यम, आल्फ्रेड आणि चार्ल्स या पाच भावंडांनी मिळून १८८४ मध्ये अमेरिकेतल्या विस्कन्सिन प्रांतातल्या बाराबू नावाच्या शहरात सर्कस कंपनी सुरू केली. त्यावेळी जेम्स अँथनी बेली आणि जेम्स कूपर यांची ‘कूपर अॅण्ड बेली’ सर्कस तेजीत होती. हत्तींच्या खेळासाठी प्रसिद्ध बारनुम त्यांच्याशी जोडले गेले आणि १८८२ पासून ‘बारनुम अॅण्ड बेली सर्कस’ या बदललेल्या नावाने सुरू झाली. सर्कस केंद्रित अशी ही दोन संस्थानं. प्रेक्षकांना रिझवण्याचं काम करतानाच त्यांनी उत्तम पैसाही कमावला. समांतर राहण्यापेक्षा एकत्र येऊन मोठं होणं फायद्याचं हे ध्यानात आल्यावर रिंगलिंग ब्रदर्सने ‘बारनुम अॅण्ड बेली सर्कस’ १९०७ मध्ये विकत घेतली. मर्जरनंतरही १२ र्वष दोन्ही सर्कशी स्वतंत्रपणे कार्यरत होत्या. १९९९ पासून ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ या बिरुदावलीसह काम करायला सुरुवात केली. ५०० पेक्षा जास्त पूर्णवेळ कर्मचारी कंपनीच्या ताफ्यात आहेत. तीन युनिट्स मिळून अमेरिकेतल्या साधारण ११५ शहरांमध्ये सर्कशीचे खेळ होतात. माणसं, प्राणी, प्रॉपर्टी यांची ने-आण करण्यासाठी कंपनीकडे ‘ब्ल्यू टूर’ आणि ‘रेड टूर’ अशा दोन ट्रेन्स आहेत. ६० डब्यांच्या या ट्रेनमधले काही डबे हत्तींसाठी राखीव असतात. १९५२ साली या कंपनीवर आधारित ‘द ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ नावाचा चित्रपटही निघाला. याच धर्तीवरचा ‘ग्रेटेस्ट शोमन’ नावाचा चित्रपट पुढच्या वर्षी येऊ घातला आहे. या सर्कस कंपनीचा वर्षांचा टर्नओव्हर १ बिलियन डॉलर्स एवढा आहे. १९६७ मध्ये फेल्ड एंटरटेन्मेंट कंपनीने सर्कस विकत घेतली. कंपनीचा सीईओ फोर्ब्सतर्फे जाहीर झालेल्या अब्जाधीशांच्या यादीत अग्रणी आहे. गेल्याच वर्षी ओरलँडो येथे झालेल्या कार्यक्रमात पहिल्यावहिल्या महिला ग्रँडमास्टरने एंट्री केली.
मात्र या सगळ्याची दुसरी बाजूही आहे. प्राण्यांचं शोषण करणारी कंपनी म्हणून या सर्कसविरोधात गेली ३० र्वष अनेक संघटना लढा देत होत्या. अमानुष पद्धतीने प्राण्यांकडून काम करवून घेतल्याप्रकरणी सर्कस कंपनीने २ लाख ७० हजार डॉलर्सचा दंड भरला. प्रत्येक शोच्या वेळी प्राणीप्रेमींची निदर्शनं नित्याची झाली होती. सर्कस कंपनीने १९९५ मध्येच २०० एकरांवर हत्ती संवर्धन केंद्राची स्थापना केली होती. परंतु गेल्या काही वर्षांत प्राण्यांच्या संघटनांविरुद्धच्या कायदेशीर लढाईत बराच वेळ आणि पैसा खर्च झाला. घोडय़ापासून झेब्रापर्यंत असा शेकडय़ात असणारा विविधांगी प्राणी जत्था काटेकोर नियमांसह सांभाळणे डोईजड होऊ लागले. प्राणीप्रेमींच्या लढय़ाला यश आल्याने गेल्या वर्षी सर्कस कंपनीने हत्तींना शोमधून वगळण्याचा निर्णय घेतला.
लोकप्रिय असा हत्तींचा शो बंद झाल्याने नफ्यावर विपरीत परिणाम झाला. घटलेली तिकीट विक्री आणि आवाक्याबाहेर गेलेली आर्थिक समीकरणं लक्षात घेऊन सर्कस कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मे महिन्यात शेवटचा शो सादर होईल. कर्मचाऱ्यांच्या जॉबवर कुऱ्हाड आहे, मात्र प्राणी अभयारण्यात रवाना होणार आहेत.
काळ बदलला. मनोरंजनाची व्याख्याही बदलली. मन रिझवण्याची साधनं थेट घरात गॅझेट्सच्या रूपात दाखल झाली. सभोवतालच्या माणसांशी सलगी कमी झाल्याने प्राण्यांना घरात पाळून त्यांच्याशी संवाद साधणं स्टेट्स सिम्बॉल झालं. लहानपणी मस्त वाटणारे सर्कशीतले प्राणी प्रत्यक्षात केविलवाणे जगतात याची जाणीव तीव्र झाली. मनोरंजनाचं फॉरमॅट सामूहिकवरून वैयक्तिक झालं. सर्कस कंपन्या बंद होण्याच्या बाबतीत अमेरिका आणि आपल्यात साम्य आहे. बालपणीचा कप्पा आता आठवणीतच कैद राहील. प्राण्यांचं शोषण आणि आपलं मनोरंजन हा विरोधाभास थांबेल. जगण्याची सर्कस आपली आपल्याला निभवावी लागेल.
viva@expressindia.com