मी प्रशांत. सध्या मी ‘एकटेपणाने’ त्रासलो आहे. गेली ९ र्वष मी रिलेशनशिप मध्ये होतो. पण या वर्षी आम्ही हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे आम्हा दोघांचे वेगळे धर्म. यामुळे आमच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध आहे. त्यामुळेच आम्ही वेगळं होण्याचं ठरवलं. पण आता मला फार एकटं वाटतं आहे. कामातही लक्ष लागत नाही. मी आणि माझ्या पार्टनरने जरी मिळून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी मी अजूनही या निर्णयाचा स्वीकार मनाने केलेला नाही. आता काय करावे हेच मला कळत नाही आहे. मला सल्ला द्या.
– प्रशांत
प्रिय प्रशांत,
फार वर्षांपूर्वीचं गाणं आठवतंय मला – ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान कि औलाद है इन्सान बनेगा’.. मित्रा तुझं वय, तू काय करतोयस हे तुझ्या प्रश्नामधून मला समजू शकलेलं नाहीय. पण इतकं समजतंय की, तुझं अजून लग्न झालेलं नाही आणि नऊ वर्षांची मैत्री तुम्ही तोडलेली आहे. यावरून माझा कयास तुझं वय २६ ते ३०च्या दरम्यान असेल असं वाटतं. या वयात अशी अपेक्षा असते की, स्वतला काय हवंय, काय आवडतंय, स्वतच्या गरजा, अपेक्षा काय आहेत याबद्दल थोडीफार जाणीव तयार झाली पाहिजे. प्रेम आणि लग्न यासुद्धा एकामागोमाग येणाऱ्या गोष्टी नाहीत. पण दोन्हीमध्येच काही फरक आहे. लग्न ही एक सामाजिक संस्था आहे ज्याला कौटुंबिक अधिष्ठान आहे. ते नात्याच्या हक्कासाठी दिलेलं आहे. थोडक्यात लग्नानंतर कौटुंबिक हक्क, वैचारिक, भावनिक आणि आर्थिक स्थितीसुद्धा बदलत जाते. एक सामाजिक अधिष्ठान मिळतं आणि म्हणून दोन व्यक्तींची व्यक्तिमत्त्वं, त्यांच्या बोलण्या-चालण्याची, विचार करण्याची पद्धत, घडलेले संस्कार, चालीरीती या सगळ्या गोष्टी लग्नामध्ये महत्त्वाच्या ठरतात.
तुम्ही दोघं नऊ र्वष एकत्र होतात. या नऊ वर्षांत या सर्व गोष्टींचा, फरकांचा थोडाफार अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. तो फरक समजून घेऊन त्या फरकामुळे होणाऱ्या भिन्न जीवनशैलीचा विचार करून जर वेगळं व्हायचा निर्णय घेतला असेल तर तो तुमचा निर्णय योग्य ठरेल; पण मग हे समजण्यासाठी तुम्हाला इतकी र्वष का बरं लागली? हा प्रश्न स्वाभाविकपणे माझ्या मनात उद्भवतो. तुम्ही जो काही निर्णय घेतला, तो योग्य की अयोग्य हे तुम्ही तुमचा निर्णय किती समंजसपणे घेतला आहे यावर अवलंबून आहे. फक्त धर्म वेगळा असूनही लग्नं यशस्वी झाली आहेत, अशी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेतही. पण जीवनशैली वेगळी आहे किंवा अॅडजस्ट करणं अशक्य दिसत आहे तर हा निर्णय योग्य ठरू शकतो. सध्या तुला उदास वाटतंय. जर तुझा निर्णय तुला योग्य वाटत असेल, तर साहजिकच झालं गेलं गंगेला मिळालं असं समजून आयुष्यात पुढे चल, आणि जर निर्णयाचा फेरविचार करायचा असेल तर उचल तो फोन आणि लाव कानाला! ल्ल
मोकळं व्हा!
अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा एक ना दोन असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. याचा मानसिक त्रास होतो आणि कुणाकडे तरी सल्ला मागावासा वाटतो. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. ही जागा तुमची आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. मुंबईतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे या सदरातून तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्टलाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.