दिवसाला हजारो व्हिडीओ अपलोड होणाऱ्या यूटय़ूबने गेल्या दशकभरात सगळ्याच बाबतीत क्रांती केली. आज निव्वळ मनोरंजनापलीकडे या माध्यमाचा वापर होत आहे. प्रत्येकासाठी ‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या या माध्यमाच्या समुद्रातले ‘वॉच’लेले काही अर्थात काही ‘मस्ट वॉच’ कण..
रोड मूव्हीप्रमाणे रोड म्युझिक पॉप्युलर करणाऱ्या काही क्लासिक म्युझिक व्हिडीओंविषयी..
ज्यांना हिंदूी-मराठीसोबत जगभरातले चित्रपट पाहायला आवडतात, त्यांना त्यातला ‘रोड मूव्ही’ प्रकार ठाऊक असतो. संपूर्ण चित्रपट हा रस्त्यावरच्या प्रवासात घडत असल्याने त्या प्रकाराला रोड मूव्ही म्हटले जाते. हिंदी-मराठीतले ‘हायवे’, ‘दिल चाहता है’, ‘िजदगी ना मिलेगी दोबारा’ ही आपली ढोबळ परिचित रोड मूव्हीची उदाहरणे. जागतिक चित्रपट पाहाल तितकी त्यांत वाढ होईल. पण जगातल्या संगीताचा शोध घेतला तर रोड मूव्हीसारखाच ‘रोड म्युझिक’चा शोध सहजच लागू शकेल. आता संगीत हे ऐकण्यासोबत पाहण्याचेही माध्यम असल्याचे एमटीव्हीच्या निर्मितीनंतर समोर आले. एमटीव्हीने दृश्यक्रांती केली आणि संगीताला ‘म्युझिक व्हिडीओ’तून व्यक्त व्हायला व्यासपीठ निर्माण केले. त्यातूनच गायकांबाबत पॉपस्टार, रॉकस्टार या संकल्पना निर्माण झाल्या. एमटीव्हीद्वारे जगभरातील संगीतवेडय़ांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला गाणी व्हिडीओद्वारे सादर करण्याचे असंख्य प्रयोग झाले. त्यातला एक प्रयोग म्हणजे ‘रोड मूव्ही’प्रमाणे संगीत व्हिडीओ बनविण्याचा. यातला एक प्रयोग म्हणजे ब्युटिफुल साऊथ नामक ब्रिटिश बॅण्डचा ‘रॉटरडॅम ऑर एनिवेअर’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ. कुण्या एके काळी जगात सर्वाधिक व्यापारी उलाढाल होणारे – युरोपातील नेदरलॅण्ड देशातील रॉटरडॅम नावाचे हे बंदर आजही आहे. या भागात राहणाऱ्या शेलक्या, बेरकी आणि तुलना केली तर आपल्याकडल्या कोकणी हेकटपणाशी तंतोतंत जुळणाऱ्या वल्लींविषयी माहिती देणारे हे गाणे ऐकण्याइतकेच पाहण्यात गंमत आहे. ज्या वेळी भलेमोठे सेट्स आणि संगणकीय शिरकावाने स्पेशल इफेक्टचा सुळसुळाट म्युझिक व्हिडीओमध्ये नुकताच व्हायला लागला होता, त्या वेळी हे सुंदर तरीही साधे गाणे त्याच्या चित्रीकरणासाठीही अफाट गाजले. पॉल हिटन यांनी लिहिलेल्या या गाण्याला जॅक्वी अबॉट या ‘ब्युटिफुल साऊथ’ बॅण्डच्या गायिकेनेच गायले.
चित्रीकरणासाठी त्यांनी एक रस्ता घेतला आणि त्या रस्त्यावर बंद पडलेल्या गाडीसाठी पेट्रोलचा कॅन हातात घेऊन जाताना जॅक्वी अबॉटला चित्रित केले. या गाण्यातील शब्द अत्यंत साधे आणि शेलक्या माणसांची माहिती समजावून देणारे असले, तरी गाण्यातील तत्त्वज्ञान हे जगात कुठेही असलात तरी एकटेपणा तुम्हाला सोडणार नाही, हे सांगणारे होते. निरभ्र आकाश आणि त्यात दूरवर एकटा प्रवास.. गावातील मॅडछाप लोकांची सांगितलेली उदाहरणे.. पाठून डोकावतानाही गाणारी गायिका-नायिका निवांतपणे त्या वल्लींपैकी एक असल्यासारखी सहज कॅमेरात चित्रित होते. ब्युटिफुल साऊथ हा नव्वदीतला लोकप्रिय बॅण्ड असला, तरी आज त्याचा बोलबाला कमी आहे. संगीतप्रेमींच्या संग्रहात हमखास सापडणारे या बॅण्डचे गाणे रॉटरडॅम हेच असते. त्यातल्या गिटारवर वाजविल्या गेलेल्या वैशिष्टय़पूर्ण कॉर्ड्सचा आणि शब्दांच्या वजनाचा परिणाम असला, तरी चित्रीकरणासाठी सर्वात साधी आणि सोपी पद्धती अवलंबल्यामुळे हे गाणे लोकप्रिय झाले. आपल्याकडे एमटीव्ही लोकप्रिय असणाऱ्या काळात सातत्याने प्रसारित होत होते.
या गाण्याच्या प्रभावानंतर अशा प्रकारच्या सोप्या चित्रीकरणाने गाणी चित्रित करण्याचा नवा मार्ग म्युझिक बॅण्डना मिळाला. मॅडोनापासून ते यूटूपर्यंत सर्वच म्युझिक बॅण्ड्सनी व्हिडीओ तयार करताना मग रोड म्युझिकचा अवलंब केलेला दिसतो. यातले यूटू बॅण्डचे ‘स्विटेस्ट थिंग’ हे गाणे रॉटरडॅमपेक्षाही अधिक गाजले आहे. आपल्या पत्नीची माफी मागण्यासाठी गाडीमध्ये बसलेला गायक – बोनो – गाण्यातून जे सांगतो आणि त्या प्रवासात जे चित्रित होते, ते गमतीशीर आहे. गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय दोन्ही कसे असू शकते हे दाखविणारे मॅडोनाचे ‘डोण्ट टेल मी’देखील अनुभवणे आवश्यक आहेच. नतालिया इम्ब्रुग्लिया या ऑस्ट्रेलियन गायिकेचे ‘राँग इम्प्रेशन’, व्हेनसा कार्टलूनचे ‘थाउजंड माइल्स’ ही सुंदर चित्रीकरणाची ‘रोड म्युझिक’ची उदाहरणे एकदा पाहिलीत तर सातत्याने त्यांचे दर्शन अनिवार्य ठरेल.
आपल्याकडे रोड म्युझिक पॉप म्युझिकचा सुवर्णकाळ असताना लोकप्रिय झाले. लकी अलीच्या सिफर अल्बममधील ‘देखा है ऐसे भी’ किंवा पाकिस्तानी पॉप बॅण्ड ‘स्ट्रिंग’चे ‘दूर’ ही गाजलेली गाणी या रॉटरडॅम गाण्याच्या पंथातली शोभतात. प्रवासात लोक गाणी का ऐकतात, छोटय़ा किंवा मोठय़ा प्रवासाला सांगीतिक का करतात, याबाबत प्रत्येकाचे काही ना काही खासगी समीकरण असते. आता संगीत ऐकण्यासोबत पाहणेही सुखावह करण्याची सुरुवात ‘रोड म्युझिक’द्वारे सहज करता येईल. तो देखील नवा प्रवासच असेल.
viva@expressindia.com
रोड म्युझिक पंथातील गाण्याच्या काही लिंक्स
https://www.youtube.com/watch?v=onKrpUeocUk
https://www.youtube.com/watch?v=5WybiA263bw
https://www.youtube.com/watch?v=eYZX5e0AkkE
ttps://www.youtube.com/watch?v=3Vt0d9YlTC4