हाय फ्रेण्ड्स! मी सेल्फी फोटोबा प्रोफाइल बोलतेय. आता असे बुचकळ्यात नका बॉऽऽ पडू की, ही कुणाची सेल्फी आहे बरं. कारण सेल्फी ही म्हटलं तर सर्वाचीच नि नाही म्हटलं तर कुणाचीही नसू शकते. मी याची, त्याची, हिची, तिची, तुमची नि आमची असू शकते आणि नोऽऽ सेल्फी प्लीज.. असं ठामपणं म्हणणाऱ्याच्या स्मार्टफोनातही सेल्फी मोडचा ऑप्शन असतोच. म्हणजे सेटिंग्जमध्ये अंशत: का होईना माझं अस्तित्व असतंच. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे नाही का.. तुम हो तो हम हैं भाई! हेऽऽ काय तरी तोंड करताय राव.. सेल्फी काढतानाच ही तोंडं ठीक वाटतात भाऊ, एरवी नाही बॉऽऽ.. हंऽऽ हंऽऽ बरेच पकलात का कायऽऽ.. की मी खूप सेंटी बोलतेय किंवा फिलो झाडतेय असं काही वाटतंय का तुम्हांला.. राहिलं बॉऽऽ..
कसंए ना की, सध्या मी सॉल्लिड चर्चेत आहे. जो उठतोय तो सेल्फीवरून लेक्चरबाजी करतोय -देतोय राव.. मग तो टीनएजर असो किंवा ऐंशीच्या घरातले आजोबा.. खरं तर मला कळत नाहीए की, लोक्स माझ्यावर खवळेत तरी का? शेवटी बोलून-चालून मी आहे तुमच्या स्मार्टफोनमधला एक ऑप्शन. एका टचवर चालू-बंद होणारा. मग तुम्ही त्याचा वापर कसा करता याला मी कशी हो जबाबदार? आता टेक्नॉलॉजीचा इतिहासच मांडून त्याची चिरफाड करायची आणि यंत्र-माणसांचं नातं चाचपडायचं ठरवलं तर माझे खापरखापरपणजोबा होते अस्तित्वात १८३९ मध्ये कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये. मग घेतलं गेलं १९०० मध्ये मिरर पिक्चर आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं आमच्या पिढीपर्यंत सेल्फी फॅमिली वाढतच गेली. बाथरूमपासून अवकाशापर्यंत सगळीकडे मी नि माझ्या भावंडांना ‘फिलिंग स्पेशल’चा फिल येऊ लागला.. एवढा की, थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत सेल्फी शब्दाचा समावेश करण्यात आला. #२ी’ऋ्री असे हॅशटॅग सर्रासपणं मिरवले जाऊ लागले. अगदी आमच्या फॅमिलीची सपोर्ट सिस्टीम म्हणून सेल्फी स्टिक मावशीपण अस्तित्वात आली हो.. पण..
पण.. हा पण आहे ना तो खरा व्हेरीव्हेरीआयएमपी आहे. कारण मला अर्थात सेल्फी काढण्याच्या या ऑप्शनचं वेडात नि नादखुळेपणा करण्यात कधी रूपांतर झालं तर तुम्हांलाच काय, मलाही कळलं नाही बॉ.. कडय़ाच्या टोकापासून ते डेडबॉडीजवळच्या सेल्फीपर्यंत वाटेल त्या ठिकाणी अगदी बेदरकारपणं मला क्लिक केलं गेलं. कधी काही जीव गेले, कधी अपघात झाले, कधी होता होता वाचले तर कधी नुसतीच हूल.. बरं हे सगळं होताना माझ्या काळजातली धडधड.. ती काय तुम्हांला ऐकायला येणारेय थोडीच़ अशा या खुळाला सेल्फी मॉनिया म्हटलं गेलं, त्याच्याशी रिलेटेड मानसिक आजारांची महाचर्चा दर घटनेनंतर घडू लागली. त्यामुळं आताशा कुणी नादावलेल्या सेल्फीवेडय़ानं सेल्फी काढायचं ठरवल्यावर माझेच हार्टबीट वाढायला लागतात राव! हो, परवा तुमचाही स्क्रीन थोडासा हँग झाला होता ना, तो याचमुळं बरं का. यापुढं असं होणार नाही याची नक्की काळजी घ्याल, ही खात्री आहे मला. कारण शेवटी मी – सेल्फी आणि तुम्ही वेगळे असे नाहीचोत. मी तर तुमचंच प्रतिबिंब.. तुमच्याच लाइफस्टाइलचं.. तुमच्या प्रोफाइल पिकसाठी काढलेला भारी फोटो.. तो कायमच स्माइली यायला हवा.. सो क्लिक इट फास्ट अॅण्ड सेफली