गावाला व्यक्तिमत्त्व देणाऱ्या, त्याचं वैशिष्टय़ जपणाऱ्या खाऊगल्ल्या आणि त्या निमित्ताने त्या गावा-शहरांची चवदार सफर या पाक्षिक सदरातून..
या आठवडय़ात रंगील्या राजस्थानमधील जोधपूरची खाद्यभ्रमंती.
राजस्थानमधील जोधपूर हे वाळवंटाच्या काठावरचं महत्त्वाचं ऐतिहासिक शहर आहे. या शहराचा इतिहास आणि पर्यटन हे मेहरानगड या किल्ल्याशी जोडलेले आहे. राठोड राजघराण्यातील राव जोधा यांनी इसवीसन १४५९ मध्ये मेहरानगड किल्ला बांधला. त्याबरोबर जोधपूर शहराची भरभराट सुरू झाली, बाजारपेठ वसली त्यात इतर दुकानांबरोबर खाण्या-पिण्याची दुकाने होती. त्यामुळे एक खाद्य संस्कृती तयार झाली. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची इथे रेलचेल आहे. इथल्या स्थानिक जनतेला मिठाई अतिप्रिय आहे.
जोधपूर शहरात मेहरानगड किल्ल्याकडे चालत जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच नाव – नई सडक. हा रस्ता क्लॉक टॉवरमाग्रे थेट मेहरानगड किल्ल्यापर्यंत जातो. या रस्त्यावर गेली १०० वर्षे जोधपूरची खाद्य संस्कृती जपणारी काही दुकाने आहेत. क्लॉक टॉवर महाराजा सरदारसिंहच्या काळात (इसवीसन १८८० ते १९११) बांधला गेला. याच्या आसपास बाजार, हवेल्या आणि दाटीवाटीने वसलेली जुनी वस्ती आहे. क्लॉक टॉवरच्या गेटला लागून ‘मिशरीलाल’ हे मिठाईचे दुकान आहे. १९२७ साली स्थापन झालेल्या या दुकानात काळानुसार थोडे बदल करून नवा साज चढवलेला आहे. या दुकानातली ‘माखनीया लस्सी’ फार फेमस आहे. अप्रतिम चवीच्या लस्सीवरचा मलईच्या जाड तुकडय़ामुळे जिभेवर चव रेंगाळत राहाते. या ठिकाणी तिखट पदार्थही (नमकीन) मिळतात. बेसनची वडी, गाजर हलवा, कलाकंद, मावा कचोरी हे गोड पदार्थ आणि तळलेले काजू, शेव-चिवडय़ाचे विविध प्रकार, नमकीन कचोरी आणि मिरची वडा यातील आवडणारे पदार्थ खाऊन जड पोटाने आणि (अंतकरणाने) या जुन्याजाणत्या मिठाईवाल्याला निरोप देऊन किल्ल्याचा रस्ता पकडला. किल्ला आणि जसवंत थाडा बघण्यात तीन तास खर्च झालेले असतात आणि चालत फिरल्याने सकाळचा हेवी नाश्ताही जिरलेला असतो.
जसवंत थाडाला रिक्षा पकडून नई सडक गाठली. नई सडकवरचे प्रीती रेस्टॉरंट हे व्हेज खाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. कैर सांग्री ही इथली स्थानिक भाजी, वाळवंटात उगवणाऱ्या खुरटय़ा काटेरी झुडपांवर येणाऱ्या शेंगा खुडून त्यापासून भाजी आणि लोणचे बनवले जाते. ही भाजी गोळा करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांमुळे ती अतिशय महाग आहे. प्रीती रेस्टॉरंटमध्ये ही भाजी खायला मिळते. प्रीती रेस्टॉरंटच्या समोर जनता स्वीट होम आहे. याच्या बऱ्याच शाखा जोधपूर मध्ये आहेत. इथे बंगाली मिठाईचे वेगवेगळे प्रकार अप्रतिम मिळतात. याशिवाय मावा कचोरी, इमरती, मावा लाडू हे प्रकार चांगले मिळतात. या ठिकाणी सॉफ्ट आईस्क्रीम हा वगवेगळ्या फ्लेवरमध्ये स्मुदी सारखा घट्ट पदार्थ मिळतो.
वामकुक्षीनंतर उमेद भवन पॅलेस पाहण्यासाठी बाहेर पडायला हवे. संध्याकाळी फिरायला बाहेर पडताना थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. गरमागरम चहा पिण्याची इच्छा होते. पण चहा न पिता गरमागरम दूध घेतले. त्यावर मलईचा पातळ थर वरून घातला जातो. जोधपूरमध्ये अनेक ठिकाणी गरमागरम दूध विकणारी दुकाने आहेत. चुलीवर दूध रटरटत असतं, त्याच्या बाजूला कढईत मंद आचेवर गरम होणाऱ्या दुधावरची मलई काढून त्याची व्यवस्थित घडी करून बाजूच्या ट्रेमध्ये मांडून ठेवलेली पाहायला मिळते. दूध मागितल्यावर गरमागरम दूध ग्लासात भरून वरून ही मलईची घडी टाकली जाते.
उमेद भवन पाहून झाल्यावर क्लॉक टॉवरकडे मोर्चा वळवला. नई सडक आणि क्लॉक टॉवरजवळील बाजारात अनेक स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू, मोजडी इत्यादी मिळतात. त्यामुळे देशी, विदेशी पर्यटकांची इथे गर्दी असते. या नई सडकच्या टोकाला शाही समोसा नावाचे जोधपूरमधले समोसा आणि मसाला मिरचीचे फेमस दुकान आहे. गर्दीत शिरून सामोसा आणि मिरची घेतली. त्याबरोबर चटणी नव्हती. आपल्या सवयीप्रमाणे चटणी मागितल्यावर दुकानदार म्हणाला, ‘उसकी जरुरत नही, अंदरही है’ मोठय़ा अपेक्षेने सामोसा खायला सुरुवात केली आणि पहिल्याच घासाला अपेक्षाभंग झाला. सामोशाच्या सारणात चिंचेचा कोळ घातला होता. त्यामुळे सामोसा आंबट लागत होता म्हणून त्याला चटणीची गरज नाही असे दुकानदाराने सांगितले असावे. सामोशाने अपेक्षाभंग झाल्यावर मिरची खायला सुरुवात केली. त्यातही ते आंबट सारण भरलेले होते. रात्रीच्या दिव्यांनी उजळलेला क्लॉक टॉवर पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एका दुकानासमोर बरीच गर्दी दिसली. आमलेट शॉप असे नाव असलेल्या दुकानात एक म्हातारे गृहस्थ आमलेट बनवत होते आणि बाहेर खायला विदेशी पर्यटकांची गर्दी होती. दुकानात जागा नसल्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसूनच खात होते. अनेक परदेशी पुस्तकांनी गौरवलेल्या या दुकानात अंडय़ाचे विविध प्रकार मिळतात. उकडलेल्या अंडय़ापासून, फ्लपी आमलेट, टोस्ट आमलेट, पोटॅटो आमलेटपर्यंत असंख्य प्रकार इथे खायला मिळतात. किमान दोन प्रकार खाऊन पुढे जाणे म्हणजे फाऊल आहे. शाही सामोसा खाताना झालेल्या अपेक्षाभंगाचे दुख आमलेट शॉपमुळे कमी झाले.
दुसऱ्या दिवशी जोधपूरच्या पावटा सर्कलपासून सुटणाऱ्या बसने ६० किमी वरील ओसिया गाठले. ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्त्वाचे स्थान होते. ओसियातील मंदिरे पाहायला दोन तास लागतात. त्यानंतर जीप भाडय़ाने घेऊन आपण १० किमीवर असलेल्या वाळूच्या टेकडय़ांवर जीपने जाऊ शकतो. मुख्य रस्ता सोडून जीप वाळूच्या रस्त्याला लागते आणि उंच-सखल टेकडय़ांवरून जाताना रोलर कोस्टरचे थ्रील अनुभवता येते. या ठिकाणी गावात टिपिकल राजस्थानी घरात राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. राजस्थानी पद्धतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलीकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते. सहाव्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिर आणि म्युझियम पाहून संध्याकाळी जोधपूरला परतता येते.
सकाळी व्हेज जेवण झाल्यामुळे संध्याकाळी नॉनव्हेज खाऊया या उद्देशाने स्थानिक लोकांकडे चौकशी केली. त्यावेळी किलगा हॉटेलचे नाव कळले. स्टेशनजवळ असलेले किलगा जरा महाग पण मुंबईसारखं पॉश एसी रेस्टॉरंट आहे. राजस्थानी स्पेशल काय आहे विचारल्यावर लाल मास (म्हणजे बकऱ्याचे लाल मसाल्यात केलेले मटण) आहे असे सांगण्यात आले. रोटीबरोबर मटण खाल्ल्यावर जोधपूरकरांच्या सवयीप्रमाणे गोड खाणे आवश्यक होते. रिक्षा पकडून शाही सामोसाच्या मागच्या गल्लीत असलेले चतुर्भुजचे दुकान गाठले. एका चिंचोळ्या गल्लीत हे पुरातन दुकान आहे. दुकानात कुठल्याही प्रकारचा बडेजाव नाही, पण इथल्या माव्याच्या पदार्थाना तोड नाही. गुलाबजाम, कलाकंद तर तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतात. जमिनीवर बसलेला मॅनेजर कम कॅशिअर आणि त्याच्या बाजूला बसलेला वजन करून देणारा माणूस एवढाच स्टाफ. गुलाबजाम आणि कलाकंद येथे थेट वर्तमानपत्राच्या तुकडय़ावर देतात. खवय्ये गिऱ्हाईक रस्त्यावर उभं राहून रिक्षा चुकवत गुलाबजाम रिचवत असतात. गुलाबजाम खाऊन थोडे दुसऱ्या दिवशीच्या प्रवासासाठी बांधून घेऊन जोधपूरची खाद्यभ्रमंती आटोपती घेतली.