‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ. लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्टफिल्मच्या न आटणाऱ्या समुद्रातले काही मोती.‘ट्वेल्व्ह मंकीज’ नावाचा प्रत्यक्षात एकही मर्कट नसलेला गंभीर विज्ञानपट आहे. यात २०३५ च्या काळात पृथ्वीवरील मानवजातीचं साम्राज्य नष्ट झालं असून पूर्वीसारखेच प्राणी राज्य करीत आहेत. विशिष्ट विषाणूमुळे येथील उरलेली मानवजात जमिनीखाली वास्तव्य करून राहते. तेथील वैज्ञानिक विषाणूंवर उतारा शोधण्यासाठी नायकाला टाइम मशीनद्वारे भूतकाळात पाठवितात. त्याला विषाणू पसरविण्यास जबाबदार १२ मंकीज या संघटनेचा माग घ्यायचा असतो. पण प्रयोग चुकतो आणि नायक १९९६ सालाऐवजी सहा वर्षे आधी येऊन धडकतो. तेथे त्याच्या आवेशामुळे त्याची रवानगी थेट मनोरुग्णालयात होते. नायकाला ‘१२ मंकीज’ सापडते का हे, शोधायचे असेल तर चित्रपट पाहावा पण या विज्ञानिकेची मूळ कल्पना जाणून घ्यायची असेल तर ‘ल जेटी’ (१९६२) नावाची शॉर्टफिल्म पाहणे अत्यावश्यक आहे.

हीदेखील विज्ञानिका असून यात काडीचेही स्पेशल इफेक्ट नाही. दिग्दर्शक क्रिस मार्करची खरं तर छायाचित्रांना जोडणारी ही मालिका अखंड चित्रपटाचा अनुभव देते. सुरुवात होते एका फोटोतून ज्यात पॅरिसमध्ये आई-वडिलांसोबत विमानतळावर आलेल्या एका छोटा मुलगा एका तरुणीच्या चेहऱ्यासोबत आणखी काही तरी पाहतो, जे त्याच्या मनस्मृतीत कायम गोंदले गेलेले असते. हा मुलगा मोठा होतो तेव्हा तिसरे महायुद्ध होऊन पृथ्वीवरील मानवजात नष्ट झालेली असते आणि शिल्लक राहिलेली माणसे जमिनीखाली वस्ती करून जगत असतात. विमानतळावरील भूतकाळाची स्मृती शिल्लक असलेल्या या मुलाला वैद्यानिक टाइम मशीनद्वारे भूतकाळात पाठवतात. तेथे हा मुलगा विमानतळावर लहानपणी पाहिलेल्या मुलीवर चक्क प्रेम वगैरे करतो. पण पुढील फोटोंमध्ये या विचित्र प्रेमकथेची वळणे सामान्य राहत नाहीत. ‘ल जेटी’ हे शॉर्टफिल्म्सच्या प्रयोगाचे आणि ताकदीचे परमोच्च उदाहरण आहे. एकदा या लघुपटाची कल्पना कळली की सिनेमा आवडणाऱ्या-नावडणाऱ्या सर्वाना तो प्रचंड आवडू शकतो.

यूटय़ूब हे सध्या शॉर्टफिल्म उद्योगाचे सर्वात मोठे माध्यम आहे. चित्रपट कलेमुळे अध्र्या हळकुंडात पिवळे झालेल्या हौशांपासून ते हाय-पिक्सेल मोबाइल कॅमेरा हाती आलेल्या टाइमपासवादी संप्रदायापर्यंत लोकांनी कोणत्याही सामान्य-सुमार शॉर्टफिल्म्सना अपलोड केलेले पाहायला मिळू शकते. जगभरात चित्रपट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही या लघुपट समुद्रात रोज शेकडय़ांची भर पडत असते. सगळ्याच वाईट असतात असे नाही, पण चांगल्याही सापडायला नशीब असावे लागते. ‘सिनेमा सिक्स्टीन’ नावाची एक लघुपटांची डीव्हीडीबद्ध मालिका आहे. या सीरिजमध्ये ब्रिटिश आणि अमेरिकी दिग्गज दिग्दर्शकांच्या अगदीच अनोळखी असतानाच्या काळातील उत्तम शॉर्टफिल्म्स आहेत. त्यामध्ये टिम बर्टनपासून रिडले स्कॉटपर्यंत कित्येक ओळखीची नावे सापडतील. त्या सर्व आज यूटय़ूबमध्ये नावानिशी सर्च दिल्यास पाहायला मिळू शकतात.

यंदा ‘ला ला लॅण्ड’ चित्रपटाला सवरेत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले नसले, तरी ऑस्कर स्पर्धेतला सर्वाधिक पाहिला आणि नावाजला गेलेला चित्रपट तोच आहे. याचा दिग्दर्शक डेमियन चेजेलने  ‘व्हिपलॅश’ नावाची संगीतकथा दोन वर्षांपूर्वी पडद्यावर आणली होती. तोही चित्रपट ऑस्कर स्पर्धेत होता. पूर्ण लांबीचा हा चित्रपट त्याआधी १८ मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये तयार करण्यात आला आहे. जाहिरात क्षेत्रात कारकीर्द घडविण्याआधीची ‘द लेटर’ नावाची मायकेल गॉण्ड्रीची गमतीशीर फिल्म पाहावी अशी आहे. पौगंडावस्थेतील मुलाच्या प्रेमाची पौगंडावस्था ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट रूपात पाहायला मिळते.

स्पाइक जोन्झ या दिग्दर्शकाचे अनेक दीर्घ लांबीचे प्रायोगिक लोकप्रिय चित्रपट (हर, बिइंग जॉन माल्कोविच) आहेत. त्याने केलेल्या शॉर्टफिल्म्सपैकी ‘आय अ‍ॅम हिअर’ ही संगणकाच्या नजरेतून जग आणि मानव दाखविणारी फिल्म प्रत्येकाने पाहायला हवी. यात मानवाहून अधिक संवेदनशील मनाचा रोबो आहे. ते काम अलीकडे ‘स्पायडरमॅन’ची भूमिका वठविणाऱ्या अ‍ॅण्ड्रय़ू गारफिल्डने उत्तम वठविले आहे.

भारतीय शॉर्टफिल्म्सचा साठा यूटय़ूबवर हळूहळू वाढत आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी ते राधिका आपटे यांच्या अभिनयाने नटलेल्या कल्पक लघुपटांसोबत नव्या होतकरू दिग्दर्शकांच्या भरपूर फिल्म्स पाहायला मिळू शकतील. श्रीकांत आगवणे या दिग्दर्शकाने मुंबईतील लोकांच्या फक्त चालण्याच्या संकल्पनेला धरून ‘वॉकिंग इन द सिटी’ नावाची छान शॉर्टफिल्म बनविली आहे. त्याचीच ‘सिन सिटी’ ही मुंबईतील गुन्हेगारी जगतावर बॉलीवूडी सिनेमॅटिक पाश्र्वभूमी मांडून केलेली गंभीर फिल्मही जमलेली आहे. लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्टफिल्मची लांबी कमी असली, तरी परिणाम मोठय़ा चित्रपटांचाच असतो. म्हणून त्यातून अल्पकाळात किती तरी परिणामकार फिल्म्स अनुभवायला मिळू शकतात. यूटय़ूबचा समुद्र त्यासाठी कधीच आटू शकणार नाही.

काही शॉर्टफिल्म्स

 

पंकज भोसले

viva @expressindia.com