‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
सत्तर-ऐंशीच्या दशकामध्ये गाणी ऐकण्यासाठी टेप रेकॉर्डर आणि कॅसेट्स आली. संगीताच्या ध्वनिफिती खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. त्यापूर्वी प्रचंड मोठाली कण्र्याची रेकॉर्ड प्लेअर्स आणि त्यावर वाजविल्या जाणाऱ्या तबकडय़ा म्हणजेच रेकॉर्ड्सना महत्त्व होते. चावी देऊन वाजविला जाणारा ग्रामोफोन १९९०च्या दशकात निर्माण होणे थांबले आणि बडय़ा संगीत कंपन्यांनी खरेदी केली जात नाही म्हणून रेकॉर्ड बनविणे बंद केले. १९९०च्या दशकात ऑडिओ कॅसेट कंपन्यांची प्रचंड भरभराट झाली. भारतातील ऑडिओ कॅसेट्स बाजार इतका फोफावला होता की जपानमधल्या टीडीके, सोनी या कंपन्यांच्या कोऱ्या कॅसेट्सची भारतात मोठी आयात होत होती. एमपीथ्री फाइल्स, सीडी, संगणक यांच्या आगमन झाल्यावर दोन हजार सालानंतर हा ऑडिओ कॅसेट्सचा व्यवहार दोन ते चार वर्षांत कोसळला. सीडीचे आकर्षण पेन ड्राइव्ह आल्यानंतर संपले आणि नवे संगीतवेडे संग्राहक ध्वनीफितींऐवजी एमपीथ्री फाइल्स गोळा करू लागले. एमपीथ्री फाइल्समुळे जगभरात गेल्या शतकभरातील संगीताची किंमत आणि मोल कमी करून ठेवले असले तरीही सर्वच देशांत रेकॉर्ड प्लेअरवर संगीत ऐकणाऱ्यांचा वर्ग शिल्लक आहे. नंतर आलेल्या कॅसेट्स खराब झाल्या असतील, सीडीज वाजेनाशा झाल्या असतील आणि एमपीथ्री फाइल्स करप्ट झाल्या असतील. पण सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी तयार झालेल्या रेकॉर्डस अद्याप खणखणीत वाजतात. गायक आणि वादक आपल्या शेजारी बसून गात किंवा वाजवत असल्याची जाणीव या रेर्कार्ड्स ऐकताना होते. त्यामुळे गेल्या पाचेक वर्षांत नव्या पिढीमध्ये रेकॉर्ड प्लेअर्सचे चाहते तयार झाले आहेत. रेकॉर्ड प्लेअर संग्रहाचा छंद हा आज सर्वात महागडा आणि सर्वात वेगळा समजला जातो. जगभरामध्ये सेवण्टीएट आरपीएम या दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या रेकॉर्ड्स मिळविणारे वेडे संग्राहक आहेत. भारतामध्ये १९८८ ते ९०च्या दरम्यान रेकॉर्ड प्लेअर कंपन्यांकडूनच बनायचे थांबले असले, तरी जुन्या बाजारात ते तंदुरुस्त अवस्थेत खोऱ्यांनी शिल्लक आहेत. मुंबईत जिथे चोरबाजार भरतो, त्या ठिकाणी सर्वाधिक रेकॉर्ड प्लेअर्स असलेले रीतसर दुकान आहे. त्यांच्याकडे असलेल्या रेकॉर्ड्स म्हणजेच तबकडय़ांचीही संख्या फार मोठी आहे. या व्हायनल रेकॉर्ड्स वेडय़ांच्या, विक्रेत्यांच्या शेकडो गोष्टी यूटय़ुबवर पाहायला मिळतात. रेकॉर्ड खरेदीदार, त्यांच्या अवाढव्य किमती आणि एका रेकॉर्डसाठी देश पालथे घालणारी तरुण-वृद्ध संग्रहकांची छांदिष्ट वृत्ती यात प्रगट होते. जगभरामधील अडगळीतल्या वस्तू विकणाऱ्या बाजारांमध्ये रेकॉर्ड्स स्वस्तात मिळत असल्या तरी भारतात दिल्ली, मुंबई आणि कलकत्ता या शहरांमध्ये रेकॉर्डस खरेदीसाठी जगभरातील पर्यटक खरेदीदार हजर असतात. दिल्लीमधील चांदणी चौकातील शहा म्युझिक सेंटर्स आणि न्यू ग्रामोफोन सेंट रेकॉर्डस विकणाऱ्या देशातील मोठय़ा दुकानांपैकी ओळखली जातात. या दुकानांमध्ये असणाऱ्या रेकॉर्ड्सचा परदेशी व्यक्तींनी तयार केलेले व्हिडीओज यूटय़ुबवर प्रसारित करण्यात आले आहेत. शाह म्युझिक सेंटरमधील बिटल्स या ब्रिटिश बँडची त्यांच्याकडे असलेली सेवण्टीएट आरपीएम रेकॉर्ड पन्नास हजार रुपयांची आहे, तर आता जवळजवळ उरलेल्या काही रेकॉर्ड्सपैकी असलेली एक रेकॉर्ड लाख रुपये किमतीची आहे. पाचशे रुपयांपासून लाखो रुपयांचे मूल्य असणाऱ्या या रेकॉर्ड्स आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी जगभरातील रेकॉर्ड्स संग्राहकांचे पाय या दुकानांना सतत लागत असतात. मुंबईमध्ये फोर्ट परिसरातही काही रेकॉर्ड्स विक्रेते आहेत. रेकॉर्ड प्लेअर खरेदीसाठी न्यूयॉर्कमधून रशियाच्या रेकॉर्ड बाजारात दाखल झालेल्या अॅना नावाच्या संगीतवेडय़ा मुलीचा व्हिडीओ लोकप्रिय आहे. पिट्सबर्ग येथील दुकानातील श्रीमंत रेकॉर्डविक्रेता या व्हिडीओत पाहायला मिळतो. डीजेंच्या लोकप्रियतेमुळे तरुणांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये रेकॉर्ड गोळा करण्याचे वेड वाढत आहे. त्यामुळे तरुण आपल्या रेकॉर्ड संग्रहकांचे व्हिडीओज अपलोड करण्यात पटाईत आहेत. एका व्हिडीओमध्ये रेकॉर्ड संग्रह कसा करावा, याची माहिती देण्यात आली आहे. भारतात एकीकडे रेकॉर्डवर संगीत ऐकणे बंद व्हायला लागले असताना टोरंटोमध्ये नव्वद साली उघडण्यात आलेल्या भारतीय संगीताच्या रेकॉर्ड विकणाऱ्या दुकानाची भरभराट झालेली दिसते. तेथील भारतीयांमुळे बॉलीवूड संगीताच्या या तबकडय़ा देशातून तेथे निर्यात झाल्या आहेत. या दुकानांची कॅनडा आणि अमेरिकेतही शाखा आहे. वैयक्तिक संग्राहक मुंबई, पुणे आणि देशातील सर्वच भागांत मोठय़ा प्रमाणावर आहेत. ठाण्यात पहिला रेकॉर्डिग स्टुडिओ उभारणाऱ्या एव्ही स्टुडिओचे मालक आव्हाड यांच्याकडे प्रचंड मोठा रेकॉर्डसचा साठा आहे. काही रेकॉर्डस संग्राहकांना स्वत:ला माहिती नसेल, इतक्या त्यांच्या रेकॉर्डसची किंमत झाली आहे. गेल्या दशकामध्ये एका अमेरिकी रेकॉर्ड्स अभ्यासकाने जगभरामध्ये शोध घेतला, तेव्हा अमेरिकी जॅझ संगीताच्या सर्वाधिक रेकॉर्ड्स जपानमध्ये असल्याचे लक्षात आले. आपल्या देशातून बॉलीवूड आणि शास्त्रीय संगीताच्या जुन्या रेकॉर्डस दररोज परदेशांतील संगीतवेडय़ांच्या रेकॉर्ड ताफ्यात जात आहेत. रेकॉर्ड प्लेअर्स आज निव्वळ घरातील शोभेची वस्तू म्हणून खरेदी केल्या जाण्याच्या काळात हे व्हिडीओ पाहणे आवश्यक आहेत. त्यातून परदेशात होणारे दुर्मीळ रेकॉर्डड्रेन काही अंशी कमी झाले तरी बरे.
viva@expressindia.com