कानांपुढे अनंत वाद्यांचा ठणठणाट आणि त्यातच अनाकलनीय लक्षवेधी ध्वनींचा सुळसुळाट करून तंत्रज्ञानाचा कल्पकतेने मधुर गाण्यांसाठी वापर करणारे संगीतच गेल्या काही वर्षांत लक्षात राहिले. आरडी बर्मन यांनी चहासाठी आलेल्या काचेच्या ग्लासांमधून ध्वनी काढत एका ऐतिहासिक गाण्याची निर्मिती केली होती, तसाच ए. आर. रेहमानच्या ‘रोजा’मधील ‘दिल है छोटासा’ हा गाण्यामधील ऱ्हिदमचा विचित्र प्रयोग होता. आजवर कधीही न ऐकलेली सुरावट कानांवर पडल्याने लोकांनी ते गाणे वेडे होत ऐकले. सनईसदृश मंगलमयी असलेल्या दक्षिण भारतीय वाद्याला कोरसमध्ये वाजवून ‘बॉम्बे’तील ‘हम्मा, हम्मा’च्या सुरुवातीच्या तुकडय़ापासूनच श्रोत्याला चकवणारा रेहमान जसा प्रवाहावेगळा ठरतो, तसाच तंतुवाद्यांचा आवाज विविध गीतांमध्ये तोंडाने काढून घेणारा अमित त्रिवेदी इतरांत उठून दिसायला लागला. त्याची ‘कर्मा इज ए बीच’ हे ‘शोर इन द सिटी’मधील आणि ‘दुनिया’ हे ‘देव डी’मधील गाणे वानगीदाखल ऐकावे. तर आंतरराष्ट्रीय सुगम संगीताच्या पटलातून आपल्याकडे खुष्कीच्या मार्गाने हे प्रयोग आले. आत्ताच्या आंतरराष्ट्रीय संगीत जगतावर लॅटिन आणि आफ्रिकी संगीताचा पगडा आहे. त्यात प्रयोगी संगीतकार काय एकेक आवाजांची पेशकश करू शकतील याचा नेम नाही. म्हणजे एमआयए या जन्माने श्रीलंकी आणि कर्तृत्वाने ब्रिटिश असलेल्या गायिकेने पोट बिघडलेली व्यक्ती शौचगृहात जो ध्वनी पैदा करू शकते, तसाच समांतर ध्वनी वाद्यातून निर्माण करून सुश्राव्य गाणे तयार केले आहे. सध्या गुची गँग हे लिल पम्प या कलाकाराचे रॅप गाणे त्यातल्या वादग्रस्त शब्दांसाठी गाजत आहे. पण त्याच्या एलिमेण्ट्री किंवा गेट या गाण्यांमध्येही गुची गँगमधील सिग्नेचर असा ‘टर्र्र्र्र’ हा ओळखीचा आवाज ऐकायला मिळतो. हा आवाज वेगळ्या प्रकारे आणखी गावात ऐकायला मिळाला. जस्टिन टिंबरलेकच्या भारतीय चाहत्या वर्गाला त्याची विस्मरणीय गाणी चटकन सांगता येऊ शकणार नाहीत. एन-सिंक या बॉयबॅण्डमधून पुढे स्वतंत्र आर अ‍ॅण्ड बी अल्बम काढून विविध गॉसिप्स न्यूजमधून गाजत राहिलेल्या या कलाकाराने अल्पावधीत ग्रॅमीवर नाव कोरले. नंतर चित्रपटात अभिनेता म्हणूनही नाव कमावले. गेल्या काही वर्षांमध्ये वयानुरूप आलेली परिपक्वता त्याच्या पुढील महिन्यात दाखल होणाऱ्या अल्बममध्ये स्पष्ट झाली आहे. म्हणजे ग्रॅमीमध्ये त्याचा सहभाग नाही. पण अनेक ग्रॅमी मानांकित संकलनामध्ये त्या गाण्यांचा सहभाग आहे. या पुरस्काराच्या माहोलातच त्याचा ‘लॉस्ट इन द वुड’ हा अल्बम प्रकाशित होणार आहे. त्यातील फिल्दी आणि सातच दिवसांपूर्वी प्रकाशित झालेले ‘सप्लाइज’ हे गाणे जगभरातील सध्याच्या राजकीय, ऐतिहासिक घटकांना शब्द आणि चित्रीकरणामध्ये उतरविते. या दोन्ही गाण्यांचे व्हिडीओ उत्तम बनले असले तरी गंमत आहे, ती सप्लाईज गाण्यातील वाद्य आणि ध्वनिमेळाची. गुची गँग या गाण्यामध्ये काढल्या जाणाऱ्या विचित्र आवाजासारखाच तो आवाज आहे. फक्त ‘टर्र्र्र्र’ऐवजी तो ‘हुर्र्र्र’ असा करण्यात आला आहे. आपल्याकडे गुराखी गुरे हाकण्यासाठी जो हुर्र-हुर्र आवाज काढतात तसाच गमतीशीर प्रकार सप्लाईजमध्ये एकत्र आला आहे. गाणी लक्षवेधी करण्यात अशा चमत्कारिक ध्वनिक्रीडा उपयुक्त ठरतात, हे वेळोवेळी दिसून आले आहे. टिम्बरलेकचा व्हिडीओ आणि त्याची ही दोन्ही गाणी या आठवडय़ात सर्वाधिक ऐकली, पाहिली आणि डाऊनलोड करण्यात आलेली आहेत. अमेरिकी गायकांची गाणी साठोत्तरीच्या काळापासून बंडखोरीच्या सुराला आवळणारी आहे. साठच्या घटकातील विविध गोष्टींतील भ्रमनिरासाने विस्थापित झालेल्या तरुणांच्या मनाला गाण्यांनी शांत केले होते. आत्ताची बंडखोरी ही अनेकदा स्त्री-पुरुष स्वैराचाराच्या रूपात गाण्यांमध्ये दिसून येते. या पाश्र्वभूमीवर ‘अमेरिकन टीन’ नावाचा खलीद या कृष्णवंशीय अमेरिकी गायकाचा अल्बम अनेक श्रोते घडविणारा आहे. या अल्बममधील ‘यंग अ‍ॅण्ड डम्ब’ हे गाणे ग्रॅमीमध्ये अनेक पुरस्कारांच्या स्पर्धेत आहे.  सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि नशीब या सार्वत्रिकच कमी प्रमाणात उपलब्ध आहे.  त्यामुळे ‘यंग अ‍ॅण्ड डम्ब’ गाण्यातील तत्त्वज्ञानाशी जोडणारा सर्वसामान्यांचा प्रचंड मोठा वर्ग या गाण्याचा अनुयायी आहे. ‘इट एण्ट मी’ या गाण्यातील ध्वनिप्रयोगाचा नमुना कायगोने जस्टिन जेसोवर चित्रित केलेल्या ‘स्टारगेझिंग’ या गाण्यामध्ये आणखी विकसित रूपात तयार झाला आहे. गाण्याच्या लक्षात राहणाऱ्या महत्त्वाच्या भागामध्ये शब्दाची नेमकी तंत्राने छाटणी करून तयार झालेला हा प्रयोग या गाण्याचे सौंदर्य वाढवितो. पुन्हा पुन्हा हे गाणे ऐकण्यास भाग पाडतो. मधुर गीते म्हणून वर्षांनुवर्षे एकच सुरावळीचे भक्त राहण्याचा काळ आता लोप पावला आहे. बारा स्वरांच्या मर्यादित स्वरजगात अमर्याद चैतन्य निर्माण करणाऱ्या ध्वनिजादूगारांची उडत्या चालींची गाणी प्रयोगांसह ऐकायला मिळतायत. ‘आजची गाणी वाईटच’ हे वाक्य आळवणाऱ्यांना हे प्रयोग कळणार नाहीत, तोवर त्यांचा आनंद त्यांना घेता येणे शक्य नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

1) Kygo – Stargazing ft. Justin Jesso

2) Lil Pump – Elementary

3) justin timberlake – supplies

4) Khalid – Young Dumb & Broke

5) Justin Timberlake – Filthy

6) Lady Gaga – Million Reasons

7) Dua Lipa – IDGAF

viva@expressindia.com  

1) Kygo – Stargazing ft. Justin Jesso

2) Lil Pump – Elementary

3) justin timberlake – supplies

4) Khalid – Young Dumb & Broke

5) Justin Timberlake – Filthy

6) Lady Gaga – Million Reasons

7) Dua Lipa – IDGAF

viva@expressindia.com