हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
ब्रॅण्ड्सची दुनिया म्हणजे एक मायाजाल आहे. इथे त्या ब्रॅण्डच्या उत्पादनात नसलेले हजार गुण वर्णन करून करून सांगितले जातात आणि असलेले हजार दोष पडद्याआड राहतात. शीतपेयांच्या जाहिरातीतून दिसणारे तुषार, तरतरीतपणा प्रत्यक्षात अनुभवास येवो अथवा न येवो पण जाहिरातीतुन तो असा काही आदळत राहतो की, ते मृगजळ खरं वाटू लागतं. अशा या मायाजालाच्या गुंत्यातला प्रसिद्ध ब्रॅण्ड म्हणजे स्प्राइट.
लेमन अॅण्ड लाइम सोडा वर्गातील हे शीतपेय कोका कोला कंपनीचं अत्यंत महत्त्वाचं उत्पादन. रंगहीन, कॅफेनमुक्त अशा या शीतपेयाचा जन्म मूळचा पश्चिम जर्मनीचा. ‘क्लीअर लेमन फॅण्टा’ या नावानं ते बाजारात आलं. १९६१ मध्ये ‘स्प्राइट’ या नावानं अमेरिकेत हे शीतपेय दाखल झालं. ‘सेवन अप’ या त्या काळी सुप्रसिद्ध असलेल्या सोडा वर्गातील ब्रॅण्डला टक्कर देण्यासाठी स्प्राइटची निर्मिती झाली होती.
वास्तविक स्प्राइट हा काही शीतपेयांच्या दुनियेतील पूर्णत: अनोखा प्रयोग नव्हता. त्या काळी साधारण याच धर्तीवरचे इतर ब्रॅण्डही होते. पण स्प्राइटच्या बाटलीपासून ते बांधणीपर्यंतच्या मुबलक हिरव्या रंगाने ग्राहकांना या ब्रॅण्डकडे आकर्षित केलं. सेवन अप बाजारातून गायब होत गेलं तसा स्प्राइटचा चाहतावर्ग वाढत गेला. स्प्राइटने आपल्या उत्पादनाचं वर्णन नेहमी लेयमन (lymon) असं केलेलं दिसतं. त्यातून लेमन आणि लाइम असं दोन्हींचं मिश्रण अपेक्षित आहे.
भारतात १९९९ मध्ये स्प्राइट आलं. तोवर इथं लिम्काची चलती होती. आक्रमक जाहिरातबाजी करून स्प्राइटने विशेषत: तरुणाईला आकर्षून घेतलं. २०१२ मधल्या एका बदलाने स्प्राइटला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. फ्रान्समधील लॅबमध्ये स्प्राइटमधली ३० टक्के साखर कमी करून त्याऐवजी स्टीव्हीआ नामक नैसर्गिक वनस्पतीच्या माध्यमातून गोडवा आणण्याचा प्रयत्न केला गेला. जो यशस्वीही झाला. त्यामुळे स्प्राइटमधील कृत्रिम गोडवा कमी व्हायला मदत झाली. शीतपेय पितानाही डाएट आणि कॅलरीजचा विचार करणाऱ्या मंडळींना ही सुखावणारी बाब होती.
आज जगभरातील १९० देशांत स्प्राइट झिरो, स्प्राइट ब्लास्ट, स्प्राइट आइस, स्प्राइट डय़ुओ, स्प्राइट सुपरलेमन, स्प्राइट ग्रीन, स्प्राइट ट्रॉपिकल अशा १७ वैविध्यपूर्ण पर्यायांसह स्प्राइटचं सेवन होतं. जगभरातील सर्व शीतपेयांत स्प्राइटचा चौथा क्रमांक आहे. तर सोडा वर्गातील शीतपेयांत स्प्राइटने सगळी बाजारपेठच खिशात घातलीय आणि पहिला क्रमांक पटकावला आहे.
या साऱ्या थंडगार प्रवासात स्प्राइटच्या जाहिरातींची भूमिका विलक्षण आहे. आपल्या रंगहीन असण्याचंही स्प्राइटनं उत्तम मार्केटिंग केलेलं दिसतं. भारतात ‘स्प्राइट बुझाए प्यास, बाकी सब बकवास’ अशा दमदार स्लोगनसह स्प्राइटने प्रवेश केला. त्यानंतर ‘नो ग्यान, ओन्ली स्प्राइट’, ‘सिधी बात नो बकवास. क्लिअर है?’ इथपासून ते अगदी अलीकडचं ‘ग्यान गुल, रिफ्रेशमेंट फुल’ इथपर्यंत सगळी स्लोगन्स तरुणाईला पसंत पडणारी आहेत. आपल्या ‘क्लीअर, रंगहीन’ रूपाला मानवी सरळ, स्पष्ट स्वभावाशी जोडणं ही जाहिरातीची कल्पकता स्प्राइटच्या यशात महत्त्वपूर्ण ठरते.
पण या साऱ्यापलीकडे या ब्रॅण्डकडे असं काय आहे जे त्याला इतकं कमालीचं यश देऊन गेलं आहे? तर त्यातला सोडा आबालवृद्धांना विविध कारणांनी महत्त्वाचा वाटतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात जिथं लिंबू सरबत हे अगदी सहज सोपं पेय आहे तिथे स्प्राइटमधल्या लेमन आणि लाइमचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं आणि या सगळ्या पलीकडे ते हिरव्या रंगाच्या बाटलीतून दिसणारे बुडबुडे आपसूकच एक तरतरीत फेसाळलेपणा आणतात. तो हिरवा रंग आणि त्यावरचा पिवळसर टिळा नकळत एक गारवा निर्माण करतो. त्यातूनच तहानलेल्या, जड जेवणाने आळसलेल्या जीवाला स्प्राइटची तहान लागते. साधं पाणी जितकी छान तहान भागवतं तितकं अन्य कुणीही भागवू शकत नाही, हे सत्य मेंदूला कळत असतं. पण मन मात्र त्या बुडबुडय़ांवर स्वार व्हायला आतूर असतं. मेंदूवर मात करत मन जिभेची तहान भागवतं आणि म्हणतं, ..हे मृगजळ आहे आम्ही जाणतो तरी आम्ही इथेच पुन्हा पुन्हा वळणार.. क्लीअर है?
viva@expressindia.com