रश्मि वारंग
हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी
खरोखरच ब्रॅण्डस् आणि माणसं यांच्यात अनेकदा इतकं साम्य असतं! काही माणसं स्वकर्तृत्वावर मोठी होणारी, काही नेहमी दुसऱ्याच्या छत्रछायेत वाढणारी तर काही मोठय़ांच्या आधाराने वाढत नंतर स्वत:चं अस्तित्व सिद्ध करणारी. ब्रॅण्डस्च्या दुनियेत हेच वर्ग पाहायला मिळतात. एका मोठय़ा ब्रॅण्डचं ‘युथ कलेक्शन’ म्हणून जन्माला आलेला पण नंतर स्वतंत्रपणे मोठा झालेला असाच एक ब्रॅण्ड म्हणजे फास्टट्रॅक.
‘टायटन’ या सुप्रसिद्ध घडयाळांच्या ब्रॅण्डचं धाकटं भावंडं म्हणून १९९८ साली ‘फास्टट्रॅक’चा जन्म झाला. या ब्रॅण्डच्या निर्मितीचं ध्येय स्पष्ट होतं, तरुणांना परवडेल आणि आवडेल अशी घडय़ाळांची ताजी श्रेणी ‘टायटन’ला निर्माण करायची होती. घडय़ाळ ही केवळ गरजेची वस्तू न राहता तोपर्यंत फॅशनचा एक अविभाज्य भाग बनली होती आणि तरुणाईचं फॅशन स्टेटमेंट ठरेल असे फार कमी ब्रॅण्डस् तेव्हा बाजारात होते. ‘फास्टट्रॅक’ने ही उणीव भरून काढली.
घडय़ाळांच्या डायल्ससाठी ठरावीक साच्यातील गोल्डन, व्हाइट, ब्लॅक डायल्स बाजूला ठेवून आकर्षक रंगांचा वापर या ब्रॅण्डने सुरू केला. मेटल लुक किंवा अनोखे पट्टे यामुळे हे घडय़ाळ काही तरी वेगळं आहे, याची जाणीव तरुणाईला झाली. ‘फास्टट्रॅक’ने ठरावीक साचा न ठेवता सातत्याने नवनवीन डिझाइन देण्याचा प्रयत्न केला आणि हा ब्रॅण्ड यशस्वी झाला. ‘टायटन’चा सबब्रॅण्ड म्हणून निश्चितच ‘फास्टट्रॅक’ला फायदा मिळाला पण ‘टायटन’चा टॅग मिरवण्यात धन्यता न मानता त्याहून वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय या ब्रॅण्डने घेतला हे विशेष. २००५ साली हा ब्रॅण्ड ‘टायटन’पासून स्वतंत्र झाला. फक्त घडय़ाळांवर लक्ष केंद्रित न करता २००५ला ‘फास्टट्रॅक’ने उन्हाचे चश्मे (म्हणजे आपले गॉगल्स हो!) बाजारात आणले. २००९साली पट्टे आणि पाकिटे आणली. त्यानंतर ‘फास्टट्रॅक’ बॅग्ज, कॅप्स, रिस्टबॅण्डस् या उत्पादनांनासुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला.
यानंतर ‘फास्टट्रॅक’ने रिटेल शोरूममधून विस्तारण्याचा निर्णय घेतला. २००९साली त्यांचे पुण्यामध्ये मोठे शोरूम सुरू झाले. विद्याभ्यासासाठी जगभरातून पुण्यात एकवटलेल्या तरुणाईचा याला उत्तम प्रतिसाद मिळणं, स्वाभाविकच होतं. त्यानंतर आजपर्यंत ७९ महत्त्वपूर्ण शहरातून १५० स्टोअर्स अशी प्रगती या ब्रॅण्डने केली आहे. भारतातील झपाटय़ाने मोठय़ा होणाऱ्या ब्रॅण्डमध्ये ‘फास्टट्रॅक’चं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
तरुणाईसाठी निर्माण करण्यात आलेला या ब्रॅण्डचा लोगो वैशिष्टय़पूर्ण आहे. एक प्रकारे हा लोगो घडय़ाळाची डायल वाटतो. तारुण्य, गती, ऊर्जा, सकारात्मकता, धमाल या सगळ्याचं प्रतिनिधित्व हा लोगो करतो. त्याचा रंगही तसाच चतन्यमय आहे. वाढदिवस, परीक्षेतील यश, नोकरीतील प्रावीण्य, अशा अनेक कारणांसाठी तरुण मंडळींना द्यायच्या भेटवस्तूंमध्ये ‘फास्टट्रॅक’चा पर्याय अनेकांना भावतो. देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही त्याचा आनंद जाणवतो हे विशेष.
या ब्रॅण्डची टॅगलाइन आहे, मूव्ह ऑन. काळ कुणासाठीच थांबत नाही. तरुणाईला तर कायमच अगदी थोडक्या वेळात खूप काही करून पाहण्याचं, आजमावण्याचं आव्हान असतं. त्यामुळे ‘थांबला तो संपला’ असा एक संदेशही हा ब्रॅण्ड देतो. या गतिशील ब्रॅण्डसोबत तरुणाईचीच नाही तर ज्यांचं मन चिरतरुण आहे त्यांची पावलंही जलद पडू लागली तर नवल नाही. ज्यांना वेग आवडतो, सातत्याने नवं काही करून पाहावंसं वाटतं त्या प्रत्येकाला उठून चालायला आणि चालून धावायला लावत हा ब्रॅण्ड म्हणतो ‘मूव्ह ऑन’!
viva@expressindia.com