रश्मि वारंग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

गणरायाचे आगमन झाल्याबरोबर घरोघरी पूजाअर्चेची तांब्या-पितळेची भांडी बासनातून बाहेर आली आहेत. वर्षांनुवर्षे घरगुती पदार्थाच्या वापराने ही भांडी उजळवण्याचं काम करणाऱ्या अनेकांना एका ब्रॅण्डने मोठाच दिलासा दिला. तो ब्रॅण्ड म्हणजे पितांबरी.

व्यवसायात नेहमीच वेगळा विचार गरजेचा असतो. ग्राहकाची गरज ओळखून आहे त्याच श्रेणीत नवं उत्पादन आणणं अनेक ब्रॅण्डस्नी केलं आहे, पण चौकटीबाहेर विचार करून एखादं उत्पादन नव्याने निर्माण करायला तशी नजर लागते. याच विचारधारेतून जन्माला आलेला ब्रॅण्ड म्हणजे पितांबरी. तांब्या-पितळेची भांडी उजळवणारी पावडर ते एकूणच विविध धातूंना लख्ख करणारा आणि आता चार वेगवेगळ्या युनिटमध्ये विस्तारलेला ब्रॅण्ड असा पितांबरीचा प्रवास आश्वासक आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.

पितांबरीचे कर्ते रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वडिलांचा छोटासा व्यवसाय होता. लहान वयात रवींद्र यांना वडिलांसोबत कामानिमित्त फिरताना व्यवसायाचं बाळकडू मिळालं. बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केल्यावर प्रभुदेसाई यांच्यासमोर दोन पर्याय होते. वडिलांचा व्यवसाय सांभाळणे किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करणे. त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. अर्थात वडिलांच्या व्यवसायाचा अनुभव पाठीशी होताच. कुठलाही यशस्वी ब्रॅण्ड कोणत्या परिस्थितीत बाजारात येतो ते पाहणं महत्त्वाचं असतं. ग्राहकांसाठी आधीच उपलब्ध असलेल्या उत्पादनांशी स्पर्धा करीत आपला ब्रॅण्ड आणायचा की स्वत:च्या बुद्धीने काही नवं निर्माण करायचं हा निर्णय गरजेचा असतो. प्रभुदेसाई यांनी लहानपणी स्वत:च्या तसेच त्यांच्या सोबत्यांच्या घरी तांब्या-पितळेची भांडी पाहिली होती आणि ती स्वच्छ करण्यासाठी लागणारे कष्टही पाहिले होते. चिंचेचा कोळ, कोकम यांनी घासून ही भांडी उजळावी लागत. हे कष्टाचे काम सोपं करणारं काही तरी बाजारात आणता येईल हे प्रभुदेसाईंना सुचलं. अशा अनेक कल्पना अनेकांना सुचतात, पण त्यापाठी अभ्यासाची बैठक असावी लागते. प्रभुदेसाई यांनी आधी हिशोब केला. १९८६ साली महाराष्ट्राची लोकसंख्या होती सहा कोटी. म्हणजे सव्वा कोटी कुटुंबं धरली तर त्यातील सर्वच्या सर्व नाही पण १०% लोकांना तांब्या-पितळेची भांडी उजळवण्यासाठी एखाद्या उत्पादनाची गरज असू शकते. म्हणजे या उत्पादनाला साधारणपणे बारा/ साडेबारा लाखांचा ग्राहकवर्ग उपलब्ध होण्याची क्षमता या उत्पादनात आहे. तेव्हा हे उत्पादन चालू शकेल असा कौल प्रभुदेसाई यांना मिळाला. त्याप्रमाणे तांब्या-पितळेची भांडी उजळवणारी पावडर निर्माण झाली. आता समोर प्रश्नचिन्ह होतं नावाचं. नाव सोपं हवं आणि त्यात त्या उत्पादनाचा हेतू दिसणं आवश्यक होतं. पितळ आणि तांबे यावरून मग नाव ठरलं पितांबरी! वास्तविक अनेक तगडे ब्रॅण्डस् करोडोंच्या उलाढालीसह भांडय़ांचा साबण या क्षेत्रात आहेत, पण प्रभुदेसाई यांचा विचार वेगळा होता. तो तांब्या-पितळेच्या भांडय़ांवर लक्ष केंद्रित करणारा होता. शिवाय तोपर्यंत असं उत्पादन फार मोठय़ा प्रमाणावर व्यावसायिकरीत्या बाजारात आलेलं नव्हतं. त्यामुळे पितांबरीला भरघोस प्रतिसाद मिळाला.

सुरुवातीच्या काळात प्रभुदेसाई यांनी काही बेरोजगार तरुणांना हाताशी धरून पितांबरीची छोटी पाकिटं चाळ, मध्यमवर्गीय घरं इथं विकायला दिली. पुरवठय़ाने मागणी निर्माण करण्याची ही युक्ती सफल झाली. त्यानंतर प्रशांत दामलेंसह पितांबरीची जाहिरात झळकली. ‘‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी’’ या जाहिरातीने खूप मोठा ग्राहकवर्ग आकर्षित झाला.

पावडरनंतर पितांबरी बार, होमकेअर, आयुर्वेदिक, अ‍ॅग्रो, अगरबत्ती अशा विविध युनिटमध्ये हा ब्रॅण्ड पसरला. २०१७ सालापर्यंत पाच लाख दुकानदार, १५० वितरक, १० कोटी ग्राहक, १५०० कामगार असा हा व्यवसाय विस्तारला. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यासह हा ब्रॅण्ड १५ देशांमध्ये जाऊन पोहोचला आहे. पितांबरीच्या विविध ४० उत्पादनांचे पाच निर्मिती केंद्रांत उत्पादन होते. केवळ तांब्या-पितळेलाच नाही तर वेगवेगळ्या धातूंच्या वस्तूंना चकाकी आणणारा ब्रॅण्ड म्हणून पितांबरीकडे विश्वासानं पाहिलं जातं.

ब्रॅण्डिंगच्या जमान्यात हा आपला, तो परका असा भेदभाव नसतोच. ग्राहकांसाठी उत्तम सेवा हीच पोचपावती. तरीही मराठी व्यावसायिक म्हणून एक वेगळी आत्मीयता या ब्रॅण्डविषयी जाणवते. सणासुदीच्या दिवसांत त्यातही गणपती उत्सवातल्या पावसाळी वातावरणात तांब्या-पितळेच्या भांडय़ांवरील काळसर डाग काढणं म्हणजे परीक्षाच! पण पितांबरीचं पाकीट घरात आहे म्हणून निर्धास्त राहणारा ग्राहकवर्ग पाहिला की गुणवत्ता, दर्जा यातील सातत्य या ब्रॅण्डने छान जोपासलंय हे अधोरेखित होतं. पितांबरीने उजळून निघालेलं ताम्हण, पळी, पंचपात्र यांनी प्रिय बाप्पांची पूजा करताना या भांडय़ांची लकाकी बाप्पाच्या मूर्तीतून आपल्याही चेहऱ्यावर झळकते. हेच या ब्रॅण्डचं खरं यश. या गणेशोत्सवात आपल्या साऱ्यांची मतीही अशीच लख्ख उजळावी हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना!

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of pitambari brand