हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

विशिष्ट संस्कृतीसाठी निषिद्ध असणारा एखादा पदार्थ काळासोबत रोजच्या खाऊगिरीचा भाग कसा होतो हे पाहणं, खरंच रोचक आहे. बिस्किटांचा भारतीय इतिहास हेच सांगतो. त्यातही भारतीय घरांत बिस्किटांच्या बरणीला अधिक आकर्षक करण्याचा मान ज्या महत्त्वाच्या ब्रॅण्ड्सकडे जातो त्यातला १२६ वर्ष जुना ब्रॅण्ड म्हणजे ब्रिटानिया. बॉरबन, गुड डे, मारी गोल्ड, टायगर अशा विविध बिस्कीट्सची लांबलचक श्रेणीच ब्रिटानिया नावासह आपल्या डोळ्यांसमोरून तरळून जाते. त्याच ब्रॅण्डची ही कहाणी.

कोलकात्यामध्ये १८९२ साली २९५ रु.च्या गुंतवणुकीसह गुप्ता बंधूंनी या व्यवसायाला सुरुवात केली. बिस्कीट खाऊन विटाळ होतो असं मानणाऱ्या त्या काळात ब्रिटानियाचा मुख्य ग्राहक ब्रिटिश मंडळीच होती. १९१८ मध्ये या व्यवसायाचं ‘ब्रिटानिया पब्लिक लिमिटेड कंपनी’त रूपांतर झालं. त्या काळात कंपनी बेकरी उत्पादनांसह सोयाबीन उत्पादनं, काजूगर आणि मत्स्य उत्पादनांची विक्री करत असे. त्यानंतर बाकीच्या या उद्योगांखेरीज कंपनीने बिस्किटांवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. १९२१ मध्ये कंपनीने भारतात प्रथमच गॅस ओव्हन प्लँट टाकला. इंग्लंडमधील नामवंत कंपनीशी हातमिळवणी करून आपला व्यवसाय वाढवत नेला. १९३९ ते १९४५ हा कंपनीसाठी सुवर्णकाळ होता. जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहत असताना सैनिकांसाठी सोयीचं खाणं म्हणून बिस्किटांना मागणी वाढली. ब्रिटानिया बिस्किटांचा खप या काळात प्रचंड वाढला.

त्यानंतरच कंपनीचं पाऊल ब्रेडच्या उत्पादनाकडे वळलं. भारतात स्लाइस्ड आणि आवरणात गुंडाळलेला ब्रेड प्रथमच विकण्याचं श्रेय ब्रिटानिया कंपनीला जातं. १९५४ साली दिल्लीत ब्रेडचं उत्पादन सुरू झालं. ब्रिटानियाचं सगळ्यात वैशिष्टय़पूर्ण आणि लोकप्रिय बिस्कीट बॉरबर्न त्यानंतर अवतरलं. ६० वर्षांहून अधिक जुनं असं हे बिस्कीट नव्या आकर्षक आवरणासह सद्य पिढीच्याही पसंतीस उतरलं आहे. दरम्यान, ब्रिटानिया पब्लिक लिमिटेड कंपनीचं ब्रिटानिया इंडस्ट्रीत रूपांतर झालं. १९८० साली केरळमधील व्यावसायिक राजन पिलाई यांनी ब्रिटानिया कंपनी विकत घेतली. त्या काळात त्यांना ‘बिस्कीट किंग’ संबोधलं जाई.

ब्रिटानिया कंपनीने १९८९ साली लोणी, काजू, बदाम अशा अफलातून मिश्रणाचं ‘गुड डे’ बाजारात आणलं आणि शब्दश: अनेकांसाठी ‘अच्छे दिनों की’ शुरुवात हो गई. याशिवाय ब्रिटानिया ‘लिटिल हार्ट्स’ आणि ‘फिफ्टी फिफ्टी’ यांनीही भारतीय चवीचा ताबा घेतला. १९९३ मध्ये वाडिया ग्रुपने ब्रिटानिया उद्योग समूह विकत घेतला. आजही त्यांच्याकडेच या समूहाची मालकी आहे. ब्रिटानिया समूहाने त्यानंतर एकच ध्येय बाळगलं. दर तिसरा भारतीय हा ब्रिटानिया ग्राहक असेल या दृष्टीने पावलं उचलली गेली. ‘इट हेल्थी थिंक बेटर’ ही टॅगलाइन याच काळात आणली गेली. या निरोगी जीवनाला समोर ठेवत आणि भारतीयांचं आहाराबाबतीत सजग होणं लक्षात घेऊन ब्रिटानियाने २००७ मध्ये भारतातील पहिलं नो अ‍ॅडेड शुगर बिस्कीट ‘न्युट्रीचॉईस’ आणलं. आपल्या उत्पादनातून चरबीचं (फॅट्स) प्रमाण ८५०० टन इतकं कमी करत ब्रिटानिया ही भारतातील पहिली ‘झिरो ट्रान्स फॅट्स’ कंपनी ठरली. काळासोबत भारतीयांच्या चवीतला बदल टिपण्याचा प्रयत्न ब्रिटानियाने नेहमीच केला. त्यामुळेच पाच लाख आऊटलेटमधून भारतातील ५०%हून अधिक घरांत ब्रिटानिया पोहोचलं आहे. त्याशिवाय जगभरातील ६० देशांत ब्रिटानिया उत्पादनं निर्यात होतात. ‘टेस्ट अ‍ॅण्ड ट्रस्ट’ हे ब्रिटानियाचं सूत्र आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दिसते. फोब्र्ज मासिकाने सर्वात विश्वसनीय ३०० ब्रँडच्या यादीत ब्रिटानियाचा समावेश केलेला दिसतो. ‘ग्लोबल परफॉर्मन्स एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’सोबतच ‘भारतीय नंबर वन फूड ब्रॅण्ड’चा किताबही या ब्रॅण्डने पटकावलेला आहे.

काही ब्रॅण्डची टॅगलाइन आपल्या मुखी बसलेली असते, तसा ब्रिटानिया जाहिरातीमधला तो चिरपरिचित स्वर आपल्या कानी रुळला आहे. ‘टिंग टिंग टिंग टिडिंग’ असं काही ऐकलं की, हा ‘ब्रॅण्ड ब्रिटानिया’ ही खूणगाठ पक्की होते. बिस्कीट हा खाण्याचा फारसा आरोग्यदायी पर्याय नाहीच, पण बिस्कीटप्रेमींसाठी मिट्ट गोड ते आहारदक्ष मंडळींसाठी आरोग्यदायी अशा बिस्किटांचं वैविध्य देणारा ब्रॅण्ड ब्रिटानिया खास आहे. बिस्कीट्स आणि हेल्दी असे दोन भिन्न शब्द बाजूबाजूला बसवण्याचा प्रयत्न हा ब्रॅण्ड करतो आहे.

बिस्कीट हे पूर्णान्न नाही. उगाच तोंडात टाकायला काही म्हणून बिस्कीट्स घरात येतात. पण पाहुणे म्हणून यावं आणि यजमान होऊन जावं तसं बिस्किटांच्या बाबतीत झालंय. हळूहळू चहासोबत कोणतं बिस्कीट असावं, याचा आपला ब्रॅण्ड तयार होत जातो. विशिष्ट ब्रॅण्डच्या प्रेमात पडून बिस्किटाऐवजी आपणच विरघळतो. ब्रिटानियाची बॉरबन, गुड डे आपल्याला असंच प्रेमात पाडतात. त्या अर्थाने ब्रिटानिया म्हणजे टेस्ट आणि ट्रस्ट.. निसंशय!   viva@expressindia.com

Story img Loader