दिशा खातू

बदल हा कायम असतो असं म्हटलं जातं. तुम्हाला बदलायचं नसलं तरी आजूबाजूच्या गोष्टी बदलतात तसे आपणही नकळत त्या बदलाचा भाग होतो. पण प्रवाहाबरोबर जाण्यापेक्षा आपलाच प्रवाह निर्माण करण्याची ऊर्मी असलेली तरुणाई नकळत बदलाचा भाग होण्यापेक्षा जाणीवपूर्वक बदलाचा चेहरा होण्यावर जास्त विश्वास ठेवते. बदल मग तो दैनंदिन जगण्यातील असो, कामाच्या स्वरूपातील असो किंवा फॅशनपासून ते भ्रमंतीच्या संकल्पनांपर्यंत सगळ्याच संकल्पना आपल्या पद्धतीने तरुणाई बदलते. सरत्या वर्षांला निरोप देताना काल काय झाले यापेक्षा उद्या काय होणार आहे, काय बदलणार आहे याचा खास व्हिवाच्या वाचकांसाठी तज्ज्ञांच्या नजरेतून घेतलेला हा वेध..

सध्याचे जग हे तंत्रज्ञान युग म्हणून ओळखले जाते. जगभरात ज्या देशाकडे तंत्रज्ञानाची शक्ती जास्त तो देश प्रभावशाली ठरतो. भारतासारख्या विकसनशील देशाला प्रगतीसाठी तंत्राची हाक महत्त्वाची ठरते. तंत्राची विविध रूपं आजवर सर्वानी पाहिलेली आहेत. अगदी पेजरपासून ते स्मार्ट फोनपर्यंत.. आपल्या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये तंत्र दडलेले आहे. थ्री इडियट्स चित्रपटामध्ये रॅंचो म्हणतो, पॅंटच्या झिपपासून बाथरूमच्या गिझरपर्यंत सर्व यंत्र या व्याख्येत येतं. या यंत्राचे तंत्र आजमावून पाहणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांकडून भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमधून अनुभवायला मिळाली. याच विद्यार्थ्यांकडून नवीन वर्षांत या तंत्राचा नेमका कसा वापर होईल हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न..

काय असेल भविष्यातील तंत्रज्ञान?

’ स्त्रियांची सुरक्षितता हा मुद्दा नेहमीच चर्चेत येत असतो. यासाठी विविध हेल्पलाइन क्रमांक कार्यरत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे ५० अ‍ॅप अ‍ॅंड्रॉइड आणि आयओएच्या प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. मात्र यात अनेक त्रुटी असल्याचे आयटीतज्ज्ञांनी सांगितले. त्यामळे अ‍ॅपच्या गर्दीत नेमकी मदत कशी घ्यायची हे मात्र अजूनही गोंधळात टाकणारे आहे. यावर सेफलेट हा मनगटी बँड पर्याय ठरू शकतो. निर्भयाच्या आई आशादेवी यांच्या सेफलेट या मनगटी बॅंडचे टेकफेस्टमध्ये उद्घाटन करण्यात आले. हा बॅंड मोबाइलशी जोडला गेलेला आहे. याचे अ‍ॅपसुद्धा आहे. या बॅंडवरील बटण दाबले तर तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह केलेल्या जवळच्या माणसांच्या मोबाइलवर संदेश (सिग्नल) जाईल, त्यांची रिंग वाजत राहील. पोलिसांचे हेल्पलाइन नंबरही यात आधीच स्टोअर केले जाणार आहेत, त्यांना कॉल जोडला जाऊ न ‘व्हॉइस रेकॉर्डिंग’ ऐकू जाईल अशाप्रकारची यंत्रणा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जीपीएसद्वारे लोकेशन समजते मात्र अशावेळी जर त्या बॅंडने व्हॉइस रेकॉर्ड केला तर अधिक माहिती मिळून लवकरात लवकर त्या मुलीची सुटका होऊ  शकते. जपानच्या आयटीतज्ज्ञ साबा यांनी या मनगटी बॅंडची रचना केली आहे. यातही अजून अनेक बदल अपेक्षित असून लवकरच अद्ययावत असा बँड मुलींना उपलब्ध होईल.

’ नृत्य हा पारंपरिक कला आणि माध्यम प्रकार आहे. नृत्यात आपण विविध स्टंट पाहतो, शारीरिक हालचाली पाहतो. नृत्याचा तंत्रज्ञानाशी काय संबंध, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण नृत्यात लाइव्ह प्रॉप (प्रॉपर्टी)चा वापर केला जातो. पण आपण बऱ्याचदा चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स) पाहिलेले आहेत. त्याचबरोबर स्टेज शोमध्येसुद्धा आपण बॅकग्राऊंडला नृत्याशी समरूप चलत्चित्र पाहिलेले आहे. याचाच पुढचा भाग म्हणजे प्रोजेक्शन मॅपिंग तंत्र होय. यात पडद्यावर दिसणाऱ्या चलत्चित्रातील दृश्याला सॉफ्टवेअरच्या साहाय्याने टू किंवा थ्री डायमेंशन (२डी, ३ डी) मॉडीफाय केले जाते, तसेच त्यांना व्हिज्युअल इफेक्ट्सही दिले जातात. अशी दृश्ये लाइव्ह नृत्यात महत्त्वाची ठरतात. एकप्रकारे दुसरा नर्तकच स्टेजवर असल्याचा भास या दृश्यामुळे निर्माण होतो. अर्थात, ही संकल्पना रुपेरी पडद्यावर आपण याआधी पाहिली असली तरी ती आता प्रत्यक्षातही दिसणार आहे.

’ सोलार या अपारंपरिक ऊ र्जास्रोताचा वापर आपण कळत नकळतपणे एवढी वर्षे करत आलो आहोत. यात तंत्रज्ञानाच्या वापराने सौरचूल, सोलार वॉटर हीटर असे प्रकार विकसित करण्यात आले. काही हॉटेल व्यावसायिकांनी, संकुलांनी सोलार वॉटर हीटर बसवले. हे खर्चीक असल्यामुळे आणि जागा नसल्यामुळे अनेक जण सोलार पॅनल किंवा चूल बसवणे टाळतात.

सौरचुलीसाठी मोकळी जागा, बाग नसते, सतत सूर्यकिरणांकडे लक्ष ठेवून सौरचुलीची दिशा बदलण्यासाठी तेवढा वेळही नसतो. यावर उपाय म्हणून आयआयटी मुंबईच्या अविनाश प्रभुणे या विद्यार्थ्यांने सौरचुलीची मायक्रोव्हेवप्रमाणे संरचना केली आहे. कोणत्याही दक्षिण दिशेला तोंड असलेल्या खिडकीत हा सौरकुकर ठेवता येऊ शकतो. यात कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवता येईल. याचा आकारही लहान आहे. हा कु कर २० मिनिटांमध्ये १२० अंश सेल्सिअस तापमानाला पोहोचतो. त्यामुळे या संशोधकाचे म्हणणे आहे की किचन विसरा, कदाचित उद्या तुम्ही खिडकीतही जेवण बनवू शकाल.

’ आयआयटी मुंबईच्या टेक फेस्ट प्रदर्शनात यंत्रमानवांचे (रोबोंचे) जगच जणू अवतरले होते. देशोदेशीचे यंत्रमानव प्रदर्शनासाठी आणण्यात आले होते. यात सर्वाधिक गाजला तो स्वीडनचा यंत्रमानव. हा जगातील सर्वात अद्ययावत तंत्रज्ञान असलेला सोशल (माणसांमध्ये मिसळणारा) यंत्रमानव आहे. याचा फक्त चेहरा विकसित करण्यात आलेला आहे. तर अंॅड्रॉइडच्या साहाय्याने विविध मानवासारख्या गोष्टी इन्स्टॉल केलेला यंत्रमानव जपानहून आला होता. हा यंत्रमानव २४ तास सतत वापरात राहू शकतो. याची ऊ र्जा साठवण्याची क्षमताही जास्त आहे.

भारतातील यंत्रमानव मानवासारखे शरीर प्राप्त असलेला पण यंत्रासारखा दिसणारा होता. हा यंत्रमानव अनेक भारतीय भाषांमध्ये बोलतो, त्याला सूचना दिली की तो त्यानुसार काम करतो. डोक्याला मसाज करून देतो, घराची सफाई करतो. अशा काही निवडक घरकामांसाठी त्याला विकसित केले आहे.

रोब्बो हा स्पेनमधील प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्री प्रायमरी शाळेत शिकवण्यासाठी यंत्रमानव तंत्राचा वापर कसा करावा आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना हे तंत्रज्ञान कसे शिकवावे यावर आधारित आहे. प्रावेल फ्रोलोव्ह हे या प्रकल्पाचे प्रमुख असून ते लवकरच भारतात हा प्रकल्प सुरू करणार आहेत.

’ रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानातील रडार या पद्धतीद्वारे अंतराळाचे छायाचित्र घेतले जाते. इस्रो, नासाकडून अंतराळयान पाठवून त्याद्वारे निरीक्षणासाठी छायाचित्र काढतात. हे छायचित्र, माहिती काही देश मोफत देतात. त्यांच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी माहिती खुली असते. याच माहितीचा वापर करून शेत, जंगल वाढवण्याचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

कोणत्या भागात नैसर्गिक आपत्ती येऊ  शकते, त्यानुसार शेतीचे पूर्वनियोजन करणे, कोणत्या मातीत कोणते शेत चांगले उगवू शकते हे देखील त्याद्वारे समजते. जंगल नष्ट होत आहेत ते टिकवण्यासाठी कोणती झाडे लावली पाहिजेत. कमी पाणी असलेल्या भागात कोणती झाडे लावावीत असे सर्व त्याद्वारे समजते. यामुळे शेती या व्यवसायाला वेगळा आयाम मिळेल.

अशाप्रकारचे अनेक प्रकल्प विविध देशांमध्ये सुरू असतील, अनेक प्रयोग होत असतील. जे भविष्यात आपल्या रोजच्या वापरात येऊ  शकतात. या महोत्सवातील हे असे काही प्रकल्प आहेत जे भारतात दिसू शकतात किंवा भारतातील तंत्रज्ञानात भर घालू शकतात.

Story img Loader