एखाद्या प्रवासाला निघाल्यावर उत्सुकता, आनंद, अधीरता अशा भावना आपसूक मनात दाटून येतात. खूप काही अनुभवायची इच्छा असते. ती काही वेळा पूर्ण होते काही वेळा अपूर्णतेची हुरहुर राहते, पण प्रवास मात्र कायमचा मनावर कोरला जातो. गेल्या वर्षभरात खाऊच्या शोधकथांचा प्रवास अशाच सगळ्या स्थित्यंतरांतून गेला.  या शोधकथा म्हणजे शक्य तितका वास्तवाच्या जवळ जाण्याचा छोटासा प्रयत्न होता. कपोलकल्पित रंजकतेला जवळ न करता संदर्भाचे धागे गोळा करत पदार्थाच्या मुळापर्यंत वीण कोठे जाते हे तपासून पाहण्याची उत्सुकता होती. काही पदार्थ अगदी ठामपणे आपल्या अस्तित्वाचे पुरावे घेऊन समोर आले. सांबार, मैसूर पाक यांनी तो अनुभव दिला तर काही पदार्थानी मात्र, ‘बसा शोधत आमचं मूळ’ अशा वाकुल्या दाखवल्या. तरीही या सगळ्यात गंमत होती. या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली की, भारतीय असो वा पाश्चिमात्य पाककला, मानवी संस्कृतीच्या मुळापर्यंत नेण्याची ताकद या कलेत आहे. विस्तवावर मांस खरपूस भाजून खाणारा आदिमानव ते आताचा बार्बेक्यू खाणारा खवय्या अशा दीर्घपल्ल्यात या कलेने मानवाला किती विविध अंगाने समृद्ध केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संपूर्ण प्रवासात वाचकांच्या प्रतिसादाने खरंच रंगत आणली. त्यात कौतुकाच्या जोडीला खंडनमंडनही होते. पावभाजी मुंबईची का पुण्याची यावर झालेला खल असो किंवा एखाद्या पदार्थाच्या कालमानाबद्दलची शंका असो या सर्व चर्चानी त्या पदार्थाबद्दलच्या सगळ्या पैलूंचा आढावा घ्यायची उत्तम संधी दिली. वाचकांकडून प्रतिसाद मिळत गेला. सातारा येथून विश्वास दांडेकर यांनी तर अनेक पदार्थाबद्दल पूरक माहिती दिली. ही परस्पर देवाणघेवाण समृद्ध करणारी होती. खाऊच्या शोधकथा वाचल्यावर तो पदार्थ खायची तीव्र इच्छा झाली अशाही प्रतिक्रिया मिळाल्या. अनेक पदार्थाचं कूळ व मूळ शोधलं गेलं पण त्याहूनही खूप साऱ्या पदार्थाबद्दल लिहायचं राहिलं. ही हुरहुर आहेच. पण गोडी अपूर्णतेचीही चाखायला हवीच नाही का? त्यामुळे आज या शोधकथांची पूर्तता आपण करत असलो तरी पुढच्या प्रवासात या साऱ्या कथा, हे रंजक दाखले आपल्या सोबतीला असतीलच. म्हणजे समोसा खाताना संबुसक किंवा जिलेबीचा तुकडा मोडताना जलवल्लिका आठवणारच.

आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवींच्या आठवणींचा हा खजिना घेऊन खाऊच्या शोधकथांची कथापूर्ती करताना इतकंच म्हणावंसं वाटतंय की, हजारो वर्षांच्या समृद्ध खाद्यजीवनाचं सार सांगणाऱ्या या पदार्थामुळे तुमचं आयुष्यही तितकंच चवदार, रोचक, खमंग, खुसखुशीत होवो आणि जीवनाची चव उत्तरोतर रंगत जावो. राम राम !  (समाप्त)

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The end of emotional food journey