‘टिंडर’ या परदेशांत लोकप्रिय असणाऱ्या डेटिंग अॅपचा भारतात बोलबाला सुरू झाला, तेव्हा सगळ्यात प्रथम त्याची दखल घेतली गेली ‘यूटय़ूब’वर. ‘टिंडर इन इंडिया’ असा सर्च दिलात तर गेल्या वर्षभरात यूटय़ूबवर याविषयी अपलोड झालेले अनेक व्हिडीओ दिसतील. त्यातल्या बऱ्याच व्हिडीओंमध्ये डेटिंग अॅप कसं वापरायचं, याबाबत माहिती आहे. पण अनेक व्हिडीओंमध्ये डेटिंगबाबतच्या भारतीय मानसिकतेचा गमतीशीर उल्लेख करीत विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. भारतीय मुली डेटिंग अॅप वापरताना काय विचार करतात आणि मुलं काय विचार करतात, डेटिंग अॅप कशासाठी हवं, भारतातलं ‘संस्कारी’ डेटिंग याचा खुसखुशीत समाचार घेण्यात आहे.
‘टीव्हीएफ’, ‘बीइंग इंडियन’, ‘अनुवब पाल’, ‘ट्रेण्ड कॉमेडी’, ‘फेम कॉमेडी’, ‘वी बी लाइक दॅट’सारख्या अनेक यूटय़ूब चॅनल्सनी विविध पद्धतीनं डेटिंग साइट्सचं भारतात येणं मांडलं आहे. टिंडर वापरणाऱ्यांवर कमेंट्स, त्यांचे अनुभव, हास्यास्पद फसगतींचं चित्रणही यूटय़ूबवर गाजलं आणि वाजलंसुद्धा. टिंडर म्हणजे काय? इथपासून तुम्ही कोणाला डेट केलंय का? किंवा मग टिंडर तुम्हाला कितपत पटतं? आईवडिलांच्या वर्तुळात टिंडर कितपत बसतं इथपर्यंतची हलक्याफुलक्या शैलीतली माहिती या व्हिडीओंमधून मिळते. ‘आर यू ऑन टिंडर..?’ असं विचारत मुंबईकरांच्या धम्माल प्रतिक्रिया आणि डेटिंग अॅपवरचे अनुभव ‘बीइंग इंडिअन’च्या साहिल ठक्करने यूटय़ूबकरांसाठी पेश केले. त्याला मिळालेली ‘नो’पासून ‘इट्स ऑल बुलशीट’, ‘येस आय वॉज’ अशी उत्तरं; त्या उत्तरांना साहिलच्या धम्माल कमेंट्सची जोड आहेच. गेलं वर्षभर या प्रकारचे व्हिडीओ यूटय़ूबवर येत आहेत. डेटिंग अॅपची सुरुवात झाली तेव्हापासून त्याची ओळख, टवाळी, अनुभवाचे खडे बोल ऑनलाइन पसरत आहेत.
डेटिंग अॅप्ससंदर्भातले हे व्हिडीओ तुफान लोकप्रिय आहेत. याची प्रसिद्धी, सकारात्मक प्रतिक्रिया, हे सारं पाहताना टिंडरसारखी डेटिंग अॅप्स आणखी वाढणार हे दिसतंय. टिंडरच्या या वंडरपासून तुम्ही अजूनही दूर असाल तर या व्हिडीओंमधून तुम्हाला याचा अंदाज नक्की येईल. जमाना बदल रहा है, हे यातून नक्कीच समजेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सायली पाटील

– सायली पाटील