शेफ वरुण इनामदार

बघता बघता वर्ष सरायला आलंही. म्हणजे एका अर्थाने हे वर्ष जुनं व्हायला आलं. तेव्हा आता नव्याचे स्वागत करणे आलेच. वर्षांच्या शेवटच्या दिवशी खूप सारी धम्माल आणि खाणंपिणं असतंच. तरीही वर्षांतला बारावा महिना. म्हणजे डिसेंबर पाटर्य़ाचाच असतो. साधारण या महिन्याच्या मध्यावधीस अंगातला सारा उत्साह असा फसफसून बाहेर येतो आणि लोक बाहेर पडतात, म्हणजे फिरायला! आवडत्या ठिकाणी जाऊन मनसोक्त हुंदडायचं आणि खाण्या-पिण्याची मजा लुटायची, असं साधारण हे असतं. पण या महिन्यात पाटर्य़ाही काही कमी नसतात. दर पाच ते दहा दिवसांनी मित्रांकडे वा नातेवाईकांकडे जाऊन मेजवान्या झोडण्याची संधी तशी कुणी सोडत नाही. पण त्यातली एक पार्टी कदाचित तुमच्या घरीही असू शकते.. नक्कीच!!

तर पार्टी ही अशी साधीसुधी कधीच नसते. म्हणजे एका अर्थाने जो पार्टी देणार आहे, त्याला ती दमवणारी असते. काय करू, काय नको, कोण आलंय, कोण यायचं आहे, असे प्रश्न एकाच वेळी डोक्यात पाहुण्यांसारखीच गर्दी करतात. मग त्याची उत्तरे वेळोवेळी शोधावी लागतातच. तेवढय़ावर थांबून चालत नाही. पार्टीतल्या सर्वच गोष्टींची व्यवस्था लावून द्यावी लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेवण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारू. त्यानंतर इतर गोष्टी येतात. पण घरातल्या पार्टीत तशी काही शिस्त असायला हवी असे काहींचे मत नसते. पण ती जर का ठेवली तर मात्र पाहुण्यांची बडदास्त ठेवता येते आणि यजमानांनाही पार्टीची खरी मजा चाखता येते. त्यामुळे या लेखात मी तुम्हाला काही खास टिप्स देणार आहे.

पार्टी देणाऱ्याला, मघाशी म्हटल्याप्रमाणे, ताण असतोच. म्हणजे तो काहीच गोष्टींवर एकाच वेळी लक्ष देऊ शकतो. प्रत्येक पाहुणा आणि मित्रमंडळी येणार म्हणजे ते त्यांच्या काही अपेक्षा घेऊनच तुमच्या घरी प्रवेश करीत असतात. त्यांना काय हवं, नको काही क्षणांत ओळखणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी पार्टीच्या काही दिवस आधी चांगला गृहपाठ करणं गरजेचं असतं. त्यामुळे होतं काय की पार्टीत अनपेक्षित येणाऱ्या गोंधळाला उंबऱ्याबाहेरच ठेवता येतं. आणि सगळं अगदी कसं छान जमून जातं. प्रत्येक पेयाच्या घुटक्यानिशी चर्चेची गोडी वाढत जाते.

पार्टीचे यजमानपद मिरविणं तसं सोपं नाही. यासाठी प्रत्येक गोष्टींबाबत नियोजन असणं आवश्यक असतं. यातील पहिली गोष्ट म्हणजे घरभर उभ्या असलेल्या पाहुण्यांना पुरेशी जागा करून देणे. बरं ते पार्टीला येणार म्हणजे, तसे सडय़ानंच येतील असं नाही. मुंबईतल्या दमट हवामानाचं सोडा. महाराष्ट्रात इतर ठिकाणी डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका सहन करण्यापलीकडचा असतो. त्यामुळे त्यांच्यासोबत शाली असणार. स्वेटर असणार कानटोप्या असणार आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी जे जे काही सोबत आणता येईल ते त्यांच्याकडे असेल. त्यांनी घरात पाऊल ठेवलं की ते काय करतील, तर हातातलं सारं सामान आणि गळ्याभोवतीचं, अंगातली ऊबदार वस्त्रे म्हणजे, कोट्स, जॅकेट्स इत्यादी काढून टेबलावर ठेवतील. पण तो टेबल त्या दिवसासाठी टेबलच असेल असे नाही. तो छान पद्धतीने सजवलेला असेल. काही सेकंदांत तो टेबल महिलांच्या पर्स, मोबाइल फोन आणि  इतर सामानाने भरलेला असेल. तीच गत हॉलच्या दरवाजातील असेल तिथं तर चपलांचा भरणा असेल. म्हणजे अगदी ढीगच. त्यामुळे तेथील काही चप्पल दरवाजापासून काही अंतर दूर ठेवा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येकासाठी ती एक सूचनाच असेल. दरवाजात बूट-चपलांची गर्दी होणार नाही.

पाटर्य़ात बाटल्यांची जागा म्हणजे रेफ्रिजरेटर. जिथून उत्साहाचा सारा प्रवाह वाहत साऱ्या घरभर पसरत असतो. म्हणजे तिथे अनेक मद्यांच्या बाटल्या थंडाव्यासाठी विसावलेल्या असतात. पण फ्रिज त्या काळात इतका गच्च भरलेला असतो की हात घालायलाही जागा उरत नाही. काही काढावे तर केवळ अशक्य गोष्ट होऊन बसते. त्यामुळे फ्रिजमधील काही गोष्टी बाहेरच काढाव्या लागतील. यात म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच्या जेवणाला तेथून हलवावे लागेल. मग थोडीफार जागा बाटल्यांसाठी करता येईल. यातील काही फ्रिजरमधील जातील. म्हणजे अजून काही थंड मद्याचे पेले घशाखाली रिकामे करता येईल. यातील वाइन ही लवकर थंड करता येईल तितकी चांगली. त्यासाठी फ्रिजमधील जागेचा उपयोग करता येईल. याशिवाय हाताशी बर्फ असलेला बरा. यातही आणखी एक कला तुम्हाला आत्मसात करता येईल. म्हणजे बर्फाचे ट्रे बाहेर काढून त्याजागी पाण्याने भरलेले नवे ट्रे ठेवल्यास बर्फासाठी खणखणणारे ग्लास सुके राहणार नाहीत.

पार्टीच्या आधी दोन दिवस काय करता येईल, हे सांगतो.. घरात कुठेही अस्वच्छता राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. विशेषकरून हॉलमधील जागा व्यापणाऱ्या सोफा, मोठाल्या खुर्च्या त्या दिवसासाठी तरी बाहेरील मोकळ्या जागेत ठेवाव्यात. जे सामान टेबलांच्या खणात बसेल ते तातडीने भरावे. म्हणजे टेलिफोन, वीज आणि मेन्टेनन्स बिले खणांमध्ये चटकन सरकवता येतील.

खुद्द पार्टीच्या दिवशी किचन आणि बाथरूम या दोन गोष्टी खूपच वापरल्या जातात. या दोनच जागी तुम्हाला जास्त सावध राहावे लागते. त्यासाठी बाथरूममध्ये पुरेसे नॅपकीन आणि टिश्श्यू पेपर ठेवावे लागतील, तेही दिसतील अशा ठिकाणी.

स्वयंपाकाची गोष्ट खूपच धीराने घ्यावी लागते. म्हणजे त्यात मोठी गुंतागुंत असतेच. ती फार कौशल्याने सोडवावी लागते. म्हणजे आधी तुम्ही किती जेवण बनवणार याचा विचार करावा लागतो. त्यानुसार हाताशी लागणारी भांडी आणि ताटे काढून ठेवता येतील. स्वयंपाक आटोपला की काही जण ‘चकन्या’चा बेत आखतात. तो तयार करताना अगदी पार्टीच्या वेळीच शक्य होणार नाही. त्यासाठी सकाळीच तयारी करून ठेवावी लागेल. अगदी आयत्या वेळी हे असं काही करण्याचं टाळा. कारण त्यातील चवदार हा गुण तुम्ही कशातच उतरवू शकणार नाही. त्यासाठी पूर्वतयारी उपयोगी पडेल. यासाठी घरी अगदीच लवकर येणाऱ्या मित्रांची मदत घेता येईल. त्यांना काही गोष्टी करण्यासाठी देता येईल. म्हणजे जेवणातील काही गोष्टी चिरून देण्यात ते मदत करू शकतील. एक शेफ म्हणून सांगतो. मी माझ्या मित्रांचा अशा कामांसाठी फार चांगल्या पद्धतीने वापर करून घेतो.

खाता, पिता आता एक गोष्ट करता येऊ शकेल. ती म्हणजे तुमच्या घरच्या ‘वाय-फाय’चा पासवर्ड सगळ्यांना ‘शेअर’ करण्यासाठी तो भिंतीवर चिकटवता येईल. हे सारं करताना बीअरचे काही बॉक्स दरवाजाकडे ठेवता येईल. त्यात मोकळ्या बाटल्या ठेवता येतील वा भरलेल्या ठेवता येतील. बर्फाने भरलेल्या ट्रेमध्ये वाइन थंड करीत ठेवता येईल. काही स्वादिस्ट कॉकटेल्स बनवता येतील आणि येणाऱ्या नव्या पाहुण्यांना सव्‍‌र्ह करता येतील. विशेष म्हणजे बाटल्यांना सुका कागद गुंडाळून द्या. कारण त्यामुळे हाताच्या ऊबेने ग्लासातील वा बाटलीतील पेय तसेच थंड राहण्यास मदत होईल.

जेवणात मद्याचा अंश कधीही चवदारपणाच आणतो. त्यामुळे तुम्हाला जेवणाची अशी भलतीच आवड असेल तर असा प्रयोग करून पाहा. कारण जेवताना त्यातील मजा अधिकच वाढलेली असेल. याशिवाय केक ही एक मजा देणारी गोष्ट असेल. मात्र केकसोबत मद्याचा वाटा असेल तर ती अधिकच खुलेल. या साऱ्या रससोहळ्यात व्होडकाची साथ तर सोडता कामा नये. तुमच्या नेहमीच्या फळांमध्ये व्होडका घालायची झाल्यास कॉकटेल्स अधिकच रसदार करता येईल.

तरीही वर्षांची शेवटची पार्टी म्हणून दारू जबाबदारीने प्यावी हेच सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. खासकरून पार्टी आटोपून घरी परतताना सोबत न प्यायलेल्या मित्राला घ्यावे वा टॅक्सीवाल्याला थांबवून बिनधोक प्रवास करावा.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)