लक्झरी फूड्स उच्चभ्रूंच्या फाइन डाइन इव्हेंट्समध्ये आवर्जून समाविष्ट केली जातात. त्यापैकीच एक स्मोक्ड सामनविषयी गेल्या आठवडय़ात आपण पाहिलं. आता लक्झरी फूड्समधल्या ट्रफल्सविषयी थोडंसं..

ट्रूफल्स ही मानवाला मिळालेली नैसर्गिक देण आहे. अर्थात ही देण काही ठिकाणीच मिळत असल्याने तिचा उपभोग फक्त काही थोडेच लोक करू शकतात. निसर्गाने दिलेलं हे खाद्यजगातलं ‘सोनं’ काय आहे ते पाहूया.

ट्रूफल्स ही एक प्रकारची ‘फंगस’ (बुरशी) आहे, अगदी आपल्या ‘मशरूम्स’सारखी. पण मशरूम्स जमिनीच्यावर उगतात आणि त्याचं ‘कल्टिवेशन’ही करता येतं. याच्या उलट, ट्रूफल्स ही जमिनीच्या खाली वाढतात आणि त्याची लागवड किंवा ‘कल्टिवेशन’ जमिनीखाली करणं जरा कठीणच असतं. बरं, जमिनीखाली वाढणाऱ्या इतर गोष्टी माणसाला शोधायला काही ‘हिंट्स’ देतात. एखादं वर आलेलं रोपट, इतर प्राण्यांची- किडय़ांची त्यांच्या भोवती होणारी वर्दळ इत्यादीवरून अंदाज बांधता येतात, पण ट्रूफल्ससाठी असं काहीच करता येत नाही.

जमिनीखालून ट्रूफल्स काढायची झाली तर माणसाला कुत्र्याची नाही तर डुकराची मदत घ्यावी लागते! कारण फक्त या प्राण्यांना, जमिनीत गाडलेल्या त्या ट्रूफल्सचा वास येतो. माणसालाही या गोष्टीचा बोध झाला हेही अजबच आहे!

‘ओक’ झाडाच्या भोवताली जमिनीच्या खाली ही ट्रूफल्स सापडतात. कुत्र्यांना/ किंवा डुकरांना या झाडाच्या भोवती हुंगायला लावतात. जेव्हा त्यांना ट्रूफल्सचा वास येतो, तेव्हा ते त्या विशिष्ट जागी घुटमळतात. हे बघितल्यानंतर त्यांना त्या जागेपासून दूर नेऊन बांधलं जातं आणि मग तिथे उकरायला सुरुवात करतात. जमिनीखाली ही ट्रूफल्स, झाडाच्या पाळामुळांमध्ये सापडतात. काळसर, ओबडधोबड आकाराच्या  ट्रूफल्सना मातकट वास आणि थोडी आगळीच चव असूनही ट्रूफल्स हजारो युरो प्रति पाऊंड दरानं विकली जातात! सफेद ट्रूफल्स काळ्या रंगाच्या ट्रूफल्सपेक्षा आणखी दुर्मीळ असल्याने जास्त महाग असतात. मुख्यत: फ्रान्स आणि इटली या दोन देशांमधून ट्रूफल्स बाजारात येतात.

अनेक वेळा बाजारात येतही नाहीत. मोठय़ा रेस्टराँचे शेफ्स किंवा ट्रूफल्सचे दर्दी हे थेट ट्रूफल्स काढणाऱ्यांनाच गाठून हंगामाच्या आधीच ‘बुक’ करून ठेवतात!

एवढी अबब किंमत असल्याने पदार्थामध्ये ट्रूफल्सचा वापर अगदी मोजक्याच मात्रेत असतो. अगदी पातळ चकत्या करून ट्रूफल्स कोणत्याही पदार्थावर किंवा पदार्थात घातले की त्या पदार्थाची लज्जत वाढवतात.