असं म्हणतात, की प्रेम ही एक वैश्विक भावना आहे. जगाच्या पाठीवर प्रत्येक सजीवाठायी ही भावना असतेच. म्हणूनच कदाचित पाडगांवकरांना सगळ्यांचं प्रेम सेम वाटलं असेल. पण प्रत्येक सजीवाची आपलं प्रेम व्यक्त करण्याची स्वत:ची पद्धत असते. फक्त वेगवेगळ्या सजीवांचीच नाही, तर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या प्रांतात प्रेम व्यक्त करण्याच्या माणसांच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. याच पद्धतींचा एक भाग म्हणजे अमेरिकेतच सेंट व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू झालेला व्हॅलेंटाइन डे. कालांतराने हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून मानला जाऊ लागला. एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रियकर प्रेयसी लालगुलाबी रंगांचा उधळण करीत हा दिवस साजरा करतात. साध्याशा गुलाबाच्या फुलापासून आपापल्या परीने गिफ्ट्स, डेट, डिनरचा आनंद घेत हा दिवस साजरा करतात. त्यातही वैविध्य दिसतं.
व्हिएतनाम आणि जपानमध्ये हा दिवस दोनदा साजरा करतात. व्हिएतनाम मधे १४ फेब्रुवारीला तरुणी आपल्याला आवडणाऱ्या मित्राला डार्क चॉकलेट देतात, तर १४ मार्चला तरुण त्यांच्या मैत्रिणींना चॉकलेट देतात. जपानमध्ये याच्या उलट घडतं. जपानच्या वाकोशी शहरात शिक्षणासाठी राहणारी रूपा धरमट्टी सांगते, ‘इथे १४ फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाइन डेला तरुण आपल्या मैत्रिणींना चॉकलेट देतात आणि तरुणीबरोबर महिन्याभराने त्याचं उत्तर देतात. १४ मार्चला त्या आपल्या मित्रांना चॉकलेट देतात. १४ मार्च इथे व्हाइट डे म्हणून साजरा करतात.’. अमेरिकेत व्हॅलेंटाइन डेसाठी लालगुलाबी रंगांनी खिडक्या रंगवल्या जातात. क्युपिड किंवा प्रेमाची इतर प्रतीकं, प्रेमाचे संदेश लालगुलाबी रंगांनी खिडक्यांवर रेखाटले जातात. ते बघायला फार छान दिसतं, असं कॅलिफोर्नियाला शिकणारी सायुरी गावस्कर सांगते. पण, अलीकडे याचं स्वरूप व्यापक होऊन हा दिवस गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड पुरता न राहता सार्वत्रिक प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो. त्यामुळेच जगभरातल्या अनेक देशांतही तो सार्वत्रिक प्रेमाचा दिवस म्हणूनच साजरा केला जातो.
आपल्याकडेही व्हॅलेंटाइन डे आपापल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडबरोबर साजरा करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा केला जाऊ लागला आहे. मैत्रिणी मैत्रिणी मिळून या दिवसाचं सेलिब्रेशन करतात तर कधी आजी-आजोबांवरचं प्रेम व्यक्त करायला त्यांनाही सेलिब्रेशनमध्ये सामील करून घेतात.
आपल्याला फक्त एखाद्या माणसाबद्दलंच नाही, तर एखाद्या संकल्पनेविषयी, एखाद्या घटकाविषयी, समूहाविषयी वाटत असलेलं प्रेम कृतीतून व्यक्त केलं जावं, असा विचार रुजताना दिसतो आहे. व्हॅलेंटाइन डे हा फक्त तरुण-तरुणी, प्रियकर-प्रेयसीचा नाही, तर जगण्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे. म्हणूनच जगण्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला हॅपी व्हॅलेंटाइन डे!
इथे जपान मध्ये १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे आणि १४ मार्च ला व्हाइट डे असा डबल धमाका असतो.
– रूपा धरमट्टी, वाकोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा