संपर्कक्रांतीनंतर जग जवळ आलं आणि आता स्मार्टफोनच्या क्रांतीनंतर तर ते फारच जवळ आलं. प्रेमाचंही तसंच. सतत एकमेकांच्या संपर्कात (सान्निध्यात नव्हे) राहिलो तरी एकमेकांविषयी विश्वास मात्र कमी होत जातोय. म्हणून तर ‘व्हॉट्सअॅप’चा लास्ट सीन जगप्रसिद्ध होतोय. आजचं प्रेम एकमेकांच्या खूप जवळ आलंय हे खरं. पण तेच तर प्रेमामधलं अंतर ठरत नाहीए ना?
एक जिवलग मित्र पहिल्यांदाच आमच्या सोबत ट्रेकिंगला आला होता. गडाच्या सुळक्यावर पोहोचताना मला म्हणाला, ‘भावा, जाम बरं वाटतंय आज..’ मी म्हटलं, ‘हो नं, किती सुंदर दृश्य आहे नाही, कसली शुद्ध हवा आहे यारा इथे. मस्त वाटतंय!’ त्यावर तो उत्तरला, ‘ते आहेच रे, पण मला वेगळ्याच गोष्टीचं बरं वाटतंय!’ ‘कुठल्या?’ त्याने रेंज नसलेला मोबाइल खिशातून काढला आणि म्हणाला, ‘आज एकदाही बोललो नाही रे तिच्याशी, जाम बरं वाटलं. जिवाला शांतता!’ मी क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि घोळक्यात फुटलेल्या हास्यात मीही सामील झालो. खरं तर त्या दिवशी अशा अर्थाने शांत वाटणाऱ्या माझ्या मित्राची आणि तिथे शहरात तगमगणाऱ्या त्याच्या सखीची मनापासून दया आली.
असाच एक दिवस, नेहमीच्या सवयीने बस उशिरा येणार हे गृहीत धरून बसथांब्यावर ओळखीचे चेहरे शोधू लागलो. तेवढय़ात नजर एका जोडप्यावर गेली. दोघांनी स्वत:ला प्रेमात इतकं झोकून दिलं होतं की, ते विसरूनच गेले, ही जागा आपण अद्याप विकत घेतली नाहीये ते. त्या ‘लडिवाळ’पणाला काही अंत नव्हता. परंतु हळूहळू सरडय़ाचा रंग बदलू लागला. त्याच्या हातातला मोबाइल तिच्या मालकीचा असावा, कारण ती तो हिसकावून घ्यायचा अथक प्रयत्न करत होती. शेवटी त्या पठ्ठय़ाने त्याच्या दोन ‘वत्सल’ हातांपैकी एका हाताने तिला अडवलं आणि उरलेला हात खांद्यापासून लांब नेत वरती काहीशा चिकित्सक नजरेने संशोधन करू लागला. आता सरडा खरच काळा-निळा पडण्याची पाळी आली. त्याच्या एकंदर आवेशावरून त्या नाजूक रुपडय़ाचे आता काही खरं नाही असं वाटू लागलं. तेवढय़ात त्यांचा सोशल अँटेना जागृत झाला. आपल्याकडे अनेक डोळे रोखून बघत आहेत हे जाणवून त्यांनी आपापल्या माना कुशीत घेतल्या आणि तिथून पळ ठोकला. बसथांब्यावर प्रौढांनी ‘काय ही नवीन पिढी..!!’ या अर्थाने माना फिरवल्या, तरुणांनी एकमेकाकडे बघून डोळ्यांनीच टाळ्या दिल्या. या दोन्ही प्रसंगांना अनुरूप अशी मंगेश पाडगावकरांच्या कवितेतली चपखल ओळ आठवली.
‘इतके आलो जवळजवळ की जवळपणाचे झाले बंधन
उमटायाला सूर हवे, तर हवेच तारांमधुनी अंतर’
आज एकमेकांना आपण इतके बांधले गेलो आहोत की, या बांधीलपणाचं बंधन कधी झालं कळत नाही.
सोशल मीडियावर वाढलेला संपर्क खरं तर जवळ यायला कारणीभूत ठरणारा. पण हा वाढलेला संपर्क ‘सोशल’ आहे की नजर ठेवण्याचा एक मार्ग म्हणून त्याकडे आपण पाहतोय आज? सर्वपरिचित last seen या व्हॉट्सअॅपच्या द्वाड पिल्लामुळे धारातीर्थी पडलेले कित्येक प्रेमवीर आपल्या ओळखीत असतील यात शंका नाही. आपल्या आवडत्या, प्रेमाच्या माणसावर विश्वास ही एकच गोष्टच आता राहिली नाहीय का, असा प्रश्न पडतो.. आणि याचं कारण एकमेकांच्या स्पेसमध्ये केलेली कुरघोडी हेच दिसतं. परत पाडगावकरांच्या दोन ओळी मदतीला धावून येतात,
‘सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते’
आज कदाचित या ओळींत बदल करून, ‘तू जिथे जाशील तेथे मी तुला misscall’ देते’ असं काहीसं करावं लागेल. आज शेकडो साधनांमुळे संपर्क वाढला, साहजिकच त्यामुळे नाती अधिकाधिक जवळ येणं अपेक्षित आहे. पण इतकीही जवळ येऊ नयेत की, त्याचा एकमेकांत घुसून गुंता व्हावा. फेसबुकवर ‘इन अ रिलेशनशिप’ अशी स्वत:ची ओळख कम् माहिती एक स्टेटस सिम्बॉल बनली आहे. कारण ऑनलाइन चॅटिंगसाठी सतत उपलब्ध असणारे आपण प्रत्यक्ष भेटायला मात्र वेळ नाही सांगतो. त्यातून प्रत्यक्ष भेटतो तेव्हा भेटल्यावर आपापल्याच दुनियेत पुन्हा चॅटिंग करत बसायचं हा कुठला न्याय? दोन गोष्टी नजीक आल्यावर त्यांत फ्रिक्शन वाढणार हे तर विज्ञानही मान्य करेल मग ते वस्तूंबाबत असो किंवा माणसांबाबत आणि म्हणूनच दोघांमध्ये वादाच्या असहय़ ठिणग्या उसळू लागल्या आणि बसथांब्यावरचे ते दोघे आता जागोजागी दिसू लागले. ‘एकमेकांचा श्वास तरी आपापला घेतात ना?’ अशी शंका यावी इतकी नात्यातली स्पेस कमी कमी होत गेली. दोघांमध्ये हवा खेळेनाशी झाली. प्रेमामध्ये केवळ एकमेकांसोबत असण्यापेक्षा एकमेकांबरोबर दिसणं एवढंच महत्त्वाचं वाटू लागलं. प्रेमाचं थोडक्यात ‘शोपीस’ करून टाकलं. यारहो आज आपण!
प्रेमात असं तेलाचा तवंग आल्यासारखं जगायचं की अथांग सागरात खोल खोल शिरायचं ते आजच ठरवू या. प्रेमामध्ये काठावर राहायचं की लाटेवर सर्वस्व झोकून द्यायचं ते आजचं ठरवू. प्रेम करणं हे कदाचित निसर्गाचा भाग असेलही परंतु ते निभावणं याला साधना लागते, ध्यास लागतो, आणि त्याहून महत्त्वाचं समोरच्यावर ‘सच्चं’ प्रेम लागतं आणि ते असेल ना की, आपण सगळेच एकमेकांना म्हणू लागतो, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं.’