नवा उद्योग सुरू करण्यासाठी वय, पैसा, शहर, शिक्षण, भाषा या कशाचंच बंधन नसतं. महत्त्वाची असते ती जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि चिकाटी. गेल्या आठवडय़ात व्हिवा लाउंजमध्ये नंदुरबारपासून विदेशापर्यंत पोहोचलेल्या एका उद्योजिकेची यशोगाथा ऐकताना याचीच जाणीव झाली. ‘स्पा आणि वेलनेस’ या तुलनेने अल्प परिचित क्षेत्रातील आघाडीच्या उद्योजिका आणि ‘ग्लोबल वेलनेस अॅम्बॅसीडर’ म्हणून ओळख मिळालेल्या रेखा चौधरी यांचा विस्मयकारक प्रवास उलगडला त्यांच्याबरोबरच्या संवादातून उलगडला. अरुंधती जोशी आणि रोहन टिल्लू यांनी त्यांना बोलते केले.
प्रयत्नांती मेकओव्हर
आम्ही नवी मुंबईत राहायचो. या शहराबद्दल फारशी माहिती नव्हती. मुंबईतले रस्ते कळत नव्हते. तेव्हा गुगल मॅप्स नव्हते आणि असते तरी मला ते वापरायचं ज्ञान नव्हतं. मग स्कूटर काढून शहर पालथं घालायचे. शहरातली ब्युटी पार्लर बघायचे, निरीक्षण करायचे. मुंबई जाणून घ्यायला ही अशी सुरुवात केली. सोबत थोडं थोडं इंग्रजी शिकायला लागले होते. अर्थात क्लास लावायला वेळ नव्हता. मुलांकडूनच शिकत होते, बोलायचा प्रयत्न करत होते. माझ्याकडे बघून, माझं बोलणं ऐकून तेव्हा लोक हसतही होते. तरीही मी न लाजता, न घाबरता बोलत होते. इंग्रजी येत नाही म्हणून प्रगती थांबत असेल तर तो न्यूनगंड काढून टाकायला हवा, हे तेव्हाच कळलं होतं. ही केवळ एक भाषा आहे आणि सवयीने ती आत्मसात करता येते. कुठलं गोल्ड मेडल मिळवण्यासाठी नाही, तर स्वत:ला यावं म्हणून शिकलं पाहिजे. त्या वेळी लोकांना असंही वाटायचं, मी उगाच इंग्रजीत बोलून शो ऑफ करते; पण ते तसं नव्हतं. त्यामधलं कौशल्य वाढवण्यासाठी त्या भाषेमध्ये बोलायला हवं होतं. कुणी हसलं तरी बेहत्तर. माझ्या अपीअरन्समधला बदलही एका रात्रीत आलेला नाही. बघून बघून हळूहळू हा बदल मी घडवला. कुणाकडेही त्यासाठी गेले नाही. कुठले मॅनेजमेंटचे धडे घेतले नाहीत. फक्त न डगमगता काम करत राहिले.
नंदुरबारपासूनचा प्रवास
तीस वर्षांपूर्वी नंदुरबारमध्ये सौंदर्यविषयक जागरूकता नव्हती. ब्युटी पार्लर मी पाहिलंदेखील नव्हतं. तरीही वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्या एका बहिणीचा मेक-अप मी केला होता. मेक-अप म्हणजे रंगरंगोटीच ती. मला चित्रकलेची लहानपणापासून आवड होती. टीव्ही वगैरे माध्यमं नसतानाही सौंदर्यप्रसाधन, मेक-अप यांचं ज्ञान अनुभवाने चुकतमाकत मिळवत गेले. अठराव्या वर्षी माझं लग्न झालं. मी धुळ्याला आले. एकोणिसाव्या वर्षी पहिली मुलगी झाली. एक आई म्हणून मुलीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. संसारात रमलेली असतानाच मला काही तरी वेगळं करावं हे सतत वाटत होतं. सौंदर्यसाधनेच्या क्षेत्रातच काही तरी करावं, हेही निश्चित होतं. मग ब्युटी पार्लरचा कोर्स करण्यासाठी घरच्यांची परवानगी घेतली. त्यासाठी नवऱ्याला, सासूबाईंना पटवलं. हे काम तेव्हा एवढं प्रतिष्ठेचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला सगळ्यांचा विरोध होता. माझे वडील सामाजिक क्षेत्रात होते. अशा घरातून आलेली एखादी मुलगी, गृहिणी वेगळं व्यक्तिमत्त्व घडवायचं ठरवते आणि असं फारसं अॅक्सेप्टेबल नसलेलं क्षेत्र त्यासाठी निवडते, हे सगळंच तेव्हा नवीन होतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा