विनय नारकर

या मालिकेतील धार्मिक वस्त्रे या लेखामध्ये ‘वृंदावनी वस्त्रांचा’ उल्लेख आला आहे. या वस्त्रकलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्यांची कथाही अतिशय सुरस आहे. श्रीमंत शंकरदेव हे आसाममधील प्रख्यात संत होते. आजही त्यांचे अनुयायी आसामचे मोठय़ा प्रमाणात आहेत. साधारणपणे इ.स. १५६५ च्या सुमारास शंकरदेवांचे वास्तव्य बारपेटा येथे असताना राजा नरनारायण आणि युवराज चिलराय त्यांना भेटायला गेले. त्यांनी शंकरदेवांना कृष्णलीला आणि वृंदावनातील कृष्ण वास्तव्याबद्दलच्या कथा कथन करण्याची विनंती केली. शंकरदेवांनी त्यांना रसपूर्णतेने वृंदावनातील कृष्णवास्तव्याच्या कथा सांगितल्या. त्या भारावलेल्या मन:स्थितीत त्यांनी या कथा चितारण्यात येतील का?, अशी शंकरदेवांकडे विचारणा केली.

शंकरदेवांनी उत्साहाने राजाला सांगितले की या कृष्णकथा आपल्याला रेशमाने विणता येतील. चार महिन्यांचा अवधी लागेल आणि ते साहित्य मिळाले तर आपण हे करू शकू असेही सांगितले. राजा नरनारायणाने आनंदाने तसे वचन दिले. इतकेच नाही तर त्याने कूचबिहार राज्यातील, कामापुरा प्रांतातल्या ‘तांतीकुची’ या सुभ्याचे मुख्य प्रशासक, ‘बर भूयान’ म्हणून शंकरदेवांची नेमणूक केली.

शंकरदेवानी तिथल्या विणकरांची बैठक बोलावून त्यांना राजाच्या इच्छेबद्दल सांगितले. अनेक स्त्री-पुरुष विणकरांना त्यांनी या कामासाठी तयार केले. माधवदेव नावाच्या विणकराची मुख्य विणकर म्हणून नियुक्ती केली. तिथल्या हातमाग कारखान्यात, ज्याला ‘कारसाना घर’ म्हणतात, हे प्रचंड आकाराचे वस्त्र विणण्यास सुरुवात झाली. कृष्णलीलेतील प्रसंग कशा प्रकारे विणले जातील हे शंकरदेवांनी व्यवस्थितपणे नियोजन करून, विणकरांना प्रात्यक्षिकही दाखवले.

शंकरदेव रोज आपल्या अनुयायांसोबत तांतीकुचीतल्या कारसान घराला भेट देऊ न विणकामाची पाहणी करीत. रोज सहा इंच वस्त्र विणून होत असे. एके  दिवशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शंकरदेव तिथे जाऊ  शकले नाहीत. त्या दिवशी माधवदेवने पूर्ण काम पाहिले. त्या दिवशी ‘ब्रह्ममोहन लीला’ ही कथा विणण्याचे काम सुरू होते. माधवदेवाच्या देखरेखीखाली त्या दिवशी वस्त्र चार इंच जास्त विणून झाले. यावर खूश होऊ न त्यांनी माधवदेवांना ‘बधार पो’ या उपाधीने गौरविले.

हे वस्त्र प्रामुख्याने पिवळ्या, काळ्या, लाल रंगांच्या धाग्यांनी विणले गेले. कृष्ण जन्मापासून ते कंस वधापर्यंतचे प्रसंग यात विणण्यात आले. प्रत्येक प्रसंगाखाली त्याची त्याबद्दल माहिती सांगणारी एक-एक ओळही विणण्यात आली होती. प्रत्येक कथेसाठी त्यांनी निराळी रंगसंगती वापरली. हे वस्त्र साठ मीटर लांब आणि तीस मीटर रुंद झाले होते. हे वस्त्र शंकरदेव आधी त्यांच्या आश्रमात घेऊन आले. ते अजस्र वस्त्र गुंडाळायला, अंथरायला, उचलायला साठ माणसे लागत होती. गावातले लोक ते अचाट आणि अद्भुत काम पाहून विस्मयचकित झाले. या कामासाठी शंकरदेवांना त्यांच्या भागवत पुराणाच्या अभ्यासाचा, चित्रकलेच्या ज्ञानाचा खूप उपयोग झाला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वस्त्र विणले होते, ‘लम्पा’ या विणण्याच्या पद्धतीने. ही वस्त्रकला निर्माण झाली सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी. इराण आणि चीनमध्ये साधारण एकाच सुमारास पण स्वतंत्रपणे ही पद्धत शोधली गेली. दोन्हीमध्ये थोडा फार फरक आहे. यात दोन ताने व दोन बाने असतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आकृत्यांची आवर्तीरचना करता यावी, यासाठी हे तंत्र शोधले गेले. भारताने इराणचा वारसा घेतला तर युरोपने चीनचा. हे विणकाम ‘ड्रॉ लूम’ या विशिष्ट पद्धतीच्या मागावर होते. वस्त्रकलेतल्या सर्वात अवघड तंत्रांपैकी हे एक समजले जाते. भारतातले जे काही जुने टेक्स्टाइल शिल्लक आहेत त्यातल्या सगळ्यात उच्च दर्जाच्या कलाकृती या ‘लम्पा’ पद्धतीने विणलेल्या आहेत. भारतात सातव्या-आठव्या शतकापासून या पद्धतीने वस्त्रे विणली जाऊ  लागली असे म्हणतात. पण शिल्लक असलेली वस्त्रे पंधराव्या-सोळाव्या शतकातली आहेत.

शंकरदेव ते वस्त्र कूचबिहारला नावेतून घेऊन गेले. वस्त्राचा तो अपूर्व आविष्कार पाहून राजा आणि त्याच्या भावाचेही डोळे दिपून गेले. शंकरदेवांनी त्यांना या विणकामाबद्दल पूर्ण माहिती दिली. त्यातल्या सर्व प्रसंगांचे विस्तृत वर्णन केले. राजा या कामावर बेहद्द खूश होता. त्याने शंकरदेवांना बारपेटाचे वतन देऊ  केले. मात्र शंकरदेवानी त्यास नम्र नकार दिला. मग राजाने शंकरदेवाच्या भावाला ती जहागिरी देऊ  केली.

वस्त्रकलेत मानव किती प्रगती करू शकतो, त्याची कलात्मकता आणि कसब हे कोणता दर्जा गाठू शकतो याचे मूर्तिमंत प्रतीक असणारा हा ठेवा, पण हे शंकरदेवांचे ‘वृंदावनी वस्त्र’ हरवले. कूचबिहारमधल्या मधुपूर सत्रमध्ये हे शेवटचे पाहिले गेले. आसाममध्येही वृंदावनी वस्त्राची परंपराच निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकानंतर ही अस्तंगत झाली. युरोप आणि अमेरिकेतल्या काही संग्रहालयात काही वृंदावनी वस्त्रांचे अवशेष बघायला मिळतात. पर्सिव्हल लॅण्डन या ब्रिटिश पत्रकाराला १९०३-०४ च्या सुमारास तिबेटमधील गोब्शी या गावात काही वृंदावनी वस्त्रे मिळाली. त्यांचे महत्त्व लक्षात आल्याने त्याने ते ब्रिटिश म्युझियमकडे सूपूर्द केले. दोन वर्षांपूर्वी ब्रिटिश म्युझियमने यांचे खास प्रदर्शन आयोजित केले होते. जगभरातल्या वृंदावनी वस्त्राच्या अवशेषांपैकी लॉस एंजेलिस काऊंटी म्युझियमधील अवशेष सर्वश्रेष्ठ समजले जातात, त्यामुळे ते शंकरदेवांचे वृंदावनी वस्त्र असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

viva@expressindia.com