लग्न आणि त्याचा पेहराव हा खरंतर भारतीयांचा जिवाभावाचा विषय. यातही घराणेबाजी शिरली नसेल, तर आश्चर्य मानावं लागेल. लग्नाची ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी भारतीय डिझायनर्सची चढाओढ सुरू झाली आहे. त्यातूनच नव्या वधूंना त्यांच्या डिझायनर्सच्या निवडीवरून नवी ओळख मिळायला सुरुवात झाली आहे.
११ डिसेंबर या तारखेची आठवणसुद्धा झाली, तरी अंगावर काटा येईल अशी भारतातील तरुणवर्गाची अवस्था झाली आहे. इकडे भारत-श्रीलंका क्रिकेट मालिकेची चाहते वाट बघत आहेत. दुसरीकडे अनुष्का शर्माच्या कुटुंबीयांसोबत एक भटजी इटलीला जात असल्याची छायाचित्रे वाहिन्यांवर झळकत आहेत. ‘लग्न होणार की नाही?’ यावर वाद होताना एक कप चहाचा घुटका घेत ‘या अफवांशिवाय काही बातम्या नाहीत का..’, म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. दुसऱ्याच दिवशी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकू लागली. नाजूक कलाकुसर केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि डोक्यावरून पारदर्शी दुपट्टा घेतलेली अनुष्का आणि पांढराशुभ्र कुर्ता आणि गुलाबी साफ्यात तिला शोभून दिसणारा विराट यांच्या छायाचित्रांची, कपडय़ांची चर्चा समाजमाध्यमांपासून कॉलेज कट्टे, ऑफिस कॅन्टीनपर्यंत रंगली. अर्थात गेले काही दिवस वेगवेगळ्या पद्धतीने या गोष्टीची चर्चा होतेच आहे, त्यात आपण पुन्हा वेगळं बोलण्यासारखं खरंतर काहीच नाही. पण यानिमित्ताने लग्न बाजारातील एक वेगळा बदल पुन्हा अधोरेखित झाला. त्याची दखल घेणं मात्र गरजेचं आहे. तो म्हणजे लग्न पेहरावात शिरू पाहणारी डिझायनर्सची घराणेशाही. त्यातून नववधूंना मिळणारी ओळख.
अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत बॉलीवूड म्हणजे मनीष मल्होत्रा हे समीकरण बॉलीवूड मांदियाळी आणि सर्वसामान्यांमध्ये घट्ट बसलेलं. त्यात ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खमुशी कभी गम’ अशा सिनेमांमधून मनीष मल्होत्राने पडद्यावरील नववधूंना साजरं रूप द्यायला सुरुवात केली. त्याआधी पडद्यावरची वधू म्हणजे लाल साडी हीच ओळख होती. पण ‘हम आप के है कौन’ सिनेमातील माधुरीने ही प्रतिमा मोडायचा प्रयत्न केला. त्यानंतर करीना कपूर, काजोल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा सुंदर लेहेंगा घालून लग्नमंडपात येऊ लागल्या. हीच परंपरा नंतर आलिया, अनुष्का शर्मा, परिणिती यांनी पुढे नेली. साहजिकच पडद्यावरील या अभिनेत्रींच्या मोहक रूपाची भुरळ प्रत्यक्ष नियोजित वधूंना पडली नसेल तर नवल. त्यामुळे लग्नात करीनाचा लेहेंगा हवा हा हट्ट घराघरांत होऊ लागला. त्यातून मनीष मल्होत्रा वेडिंग ब्रॅण्ड उदयाला येऊ लागला. ज्यांना थेट त्याचे कपडे परवडत नसत त्यांच्यासाठी बाजारात नकलाकारांची मोठी साखळी तयार होऊ लागली. नंतरच्या काळात बॉलीवूडच्या बडय़ा लग्नांमध्ये मनीषची कलेक्शन्स दिमाखात मिरवली जाऊ लागली. अर्थात बाकीच्या डिझायनर्सनी या बदलत्या बाजारपेठेकडे लक्ष वळवलं नाही हे शक्यच नव्हतं. याआधी इतर डिझायनर्स वेडिंग कलेक्शन्स करत नव्हते असं नाही. अबू जानी, संदीप खोसला, रितू कुमार, अनिता डोंगरे, सब्यासाची अशी बडी नावे वेडिंग कलेक्शन्समध्ये प्रस्थापित होती. बच्चन कुटुंबीय आणि अबू जानी ही जोडी किंवा राणी मुखर्जी, विद्या बालन यांचं सब्यासाचीवरील प्रेम हे सर्वाना ठाऊ क होतंच. पण त्यांची मनीषइतकी चर्चा नव्हती. ती वाढवण्याची सुरुवात हळूहळू होऊ लागली. समाजमाध्यमांवरील तरुणांची संख्या पाहता डिझायनर्सनी आपल्या कलेक्शन्सची त्यावर जोरदार चर्चा करण्यास सुरुवात केली. अनेकानेक बॉलीवूड सेलेब्रिटी मनीषसोबतच सब्यासाची, अनिता डोंगरे, अबू जानी यांची कलेक्शन्स घालून रेड कार्पेट, लग्न समारंभाला येऊ लागले. या डिझायनर्सचे कपडे घातलेल्या नववधूचे फोटो समाजमाध्यमांवर गाजू लागले. त्यातून पेहरावातील या घराणेशाहीच्या जन्माला सुरुवात झाली.
आज कोणत्याही बडय़ा सेलेब्रिटी किंवा नामांकित कुटुंबामधील लग्न असो सगळ्यात आधी चर्चा होते ती वधूच्या कपडय़ांची. ही चर्चा लग्न मंडपातून थेट समाजमाध्यमांमध्ये पोहोचते हे त्याचं विशेष. अनुष्का-विराटच्या लग्नाची छायाचित्रे त्यांनी प्रसिद्ध केल्यावर सब्यासाचीच्या इन्स्टाग्रामवर झळकले, हे त्याचंच एक उदाहरण. या सगळ्यातून या वधूचं वर्गीकरण होऊ लागलं. ‘मनीष मल्होत्राची वधू’, ‘सब्यासाचीची वधू’, ‘अनिता डोंगरेची वधू’, अशी आकर्षक नावं त्यांना दिली गेली. फक्त लग्नाचा पोशाख आणि त्यावरचं लेबल ही इतकीच त्यांची ओळख मर्यादित नव्हती. त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि पोशाख यावरूनही त्याचं वर्गीकरण झालं. अनुष्काच्याच बाबतीत बोलायचं झालं, तर सब्यासाचीची निवड करताना तिने लग्नात मिरवण्यापेक्षा परंपरांना अधिक महत्त्व दिल्याचं अधोरेखित झालं होतं. मुळात सब्यासाचीच्या डिझाइनची मुख्य संकल्पना ही पारंपरिक कलाकुसर, पद्धती आणि नव्या स्टाइल यांना जोडणारी असते. त्यामुळेच सब्यासाचीचा लेहेंगा किंवा साडी नेसलेल्या नववधूंचे फोटो पाहिल्यास त्यात नजाकत, सहजता दिसून येते. डोक्यावरून पदर, नाजूक चाल, सुंदर दागिने हे त्याच्या प्रत्येक वधूचं वैशिष्टय़ असतं. त्यालाच अनुसरून ड्रेसेसचे रंगही पारंपरिक लग्न समारंभाला शोभणारे असतात. मध्यंतरीच्या काळात ब्राइड ग्रुमिंगच्या एका टीव्ही शोच्या निमित्ताने सब्यासाचीने त्यांचा खास ब्राइडल वर्ग प्रस्थापित केला होता. ते केवळ नववधूचा पेहराव याकडे लक्ष देत नाही, तर त्याला अनुसरून दागिनेही बनवून देतात.
मनीष मल्होत्राच्या वधूची प्रतिमा याहून अगदी वेगळी आहे. अर्थात मनीष आणि बॉलीवूडचा संबंध लक्षात घेता या वधूमध्ये ‘फिल्मीपणा’ पुरेपूर भरलेला असतो. संगीत, हळदीसारख्या समारंभात ही वधू उत्साहाने भाग घेते. तिला ब्राईट रंग आवडतात. पारंपरिक एम्ब्रॉयडरीपेक्षा नवीन कलाकुसर तिला आवडते. गोल्ड, सिल्व्हर, गुलाबी, नारंगी, लाल, पिवळा हे तिचे आवडते रंग. लग्नात स्वॅग, बिनधास्त फोटोशूट करणारी ही तरुणी असते. त्यामुळे तिच्या लग्नात बॉलीवूडचा ड्रामा पूर्णपणे भरलेला असतो. अबू जानी-संदीप खोसला हे तसं शाही परिवारात रुळणारं नाव. त्यांच्या वधूची प्रतिमाही तशीच. तिच्या वागणुकीत एक आब असतो. नजाकत असते पण रॉयलपणाही असतो. तेच अनिता डोंगरेची ब्राइड मात्र काहीशी बंडखोर असते. तिला लग्नात मिरवणं आवडतं पण सुटसुटीतपणासुद्धा तिच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे इतर डिझायनर्सचे वजनदार लेहेंगे तिला आवडत नाहीत. साहजिकच कपडय़ांचे वेगवेगळे लेअर, लांब वाहणारे दुपट्टे, भरजरी एम्ब्रॉयडरी यापासून ती काहीशी दूर असते. तिच्या रंगांची निवडसुद्धा वेगळी असते. निळा, हिरवा, जांभळा असे वेगळे रंग आपल्या लग्नात वापरायला ती घाबरत नाही. वेगवेगळ्या प्रिंट्स, कट्ससोबत ती प्रयोग करते.
या कलेक्शनमधील विविधतेमुळे ब्राइडल कलेक्शनमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड पर्याय तयार झाले आहेत. अर्थात इतक्या डिझायनर्सनी या बाजारपेठेत लक्ष घालायची गरज ही भारतीय मानसिकतेची ओळख आहे. भारतीयांना लग्न समारंभांची प्रचंड हौस असते. त्यामुळे वेळ पडल्यास कर्ज काढून मोठाली लग्न करण्याकडे त्यांचा कल असतो. अशा समाजात ब्राइडल कलेक्शनला कधीच मरण नसतं. हजारापासून सुरू होऊन काही लाखांचे डिझायनर ड्रेस लग्नासाठी घेतले जातात. हे कौतुक फक्त वधूचं होतं असं नाही. प्रत्येकालाच या समारंभात मिरवायचं असतं. त्यामुळे यासाठी पैसे खर्च करायची तयारी असते. साहजिकच बाजारपेठ अशाच मानसिकतेतून जन्माला येते. आता तुम्हाला फक्त ठरवायचं आहे तुम्हाला डिझायनर्सच्या कोणत्या गटात सामील व्हायचं आहे..
viva@expressindia.com