‘त्याच्या’ येण्याकडे डोळे लावून बसलेली ती आणि यंदासुद्धा उशिराचाच मुहूर्त शोधणारा ‘तो’. आता प्रेमाच्या ओलावा नव्हे तर धबधब्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आपल्या सर्वानाच रिझवणारा हा प्री-मान्सून चिटचॅट..
तसं काही फार एकटंबिकटं वाटत नाहीये मला. ‘एकटंबिकटं’ असलं काही वाटूनच घ्यायचं नसतं हे शिकलेय मी आता. पण तरीही माझं अस्तित्व पुरेपूर जाणवू देणारा एकान्त मात्र हवाहवासा वाटतो. ही त्याच एकान्ताची वेळ ! तुझं येणं-जाणं काय ठरवूनच असतं म्हणा! माझ्यासारख्या वक्त‘उशीर’ बापडय़ांना असली ठरवाठरवी कुठली जमायची! त्यामुळे माझं जे काही चालूए.. तुझ्याशी बोलणं वगैरे वगैरे.. ती काही ठरवूनबिरवून सुरू केलेली बात नाही. मूड आला, केली वटवट! आता तुला काय.. तू म्हणशील मागच्या वर्षीसारखं या ध्यानाला पुन्हा याड लागलं की काय.. पण एक्सक्यूज मी मिस्टर पाऊस! असली जुनी, शिळी पाल्हाळं लावण्याइतकी काही मी बोिरग नाही. अर्थात, कुणा इतरांना तशी वाटत असले तर ते गेले उडत. मात्र तुला मी बोिरग वाटण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे गप्पच बैस.. आणि आज्ञाधारक मुलासारखं माझं सगळं ऐकून घे!
हां तर मी काय म्हणत होते मघाशी? एकटंबिकटं.. तर ते तसं काही वाटत नाहीये मला आणि तुझ्या सुपीक डोक्याचा लेट करंट पेटण्यापूर्वीच सांगते.. अॅज युजवल मी सूर्यावर डाफरलेय. त्याला जरा माझ्या वतीने सणसणीत काही तरी सुनावून टाक बरं. इथे या टीव्हीवाल्यांना पण ‘सूरज के तिखे तेवर’ असलं काही तरी बडबडायचा ऊत आलाय. जाम शॉट लावतात रे! सो या वेळी जे काही फूल अॅण्ड फायनल ऐकवायचंय ते तू येण्यापूर्वीच आणि डोण्ट काफ्यूज धिस विथ ‘प्रतीक्षा’. ओय ओय.. ओह माय गॉड.. काय धन्यवाद आहेस तू ! असेल रे तुझी कुठली तरी मैत्रीण प्रतीक्षाबितीक्षा नावाची.. मला काय तिचं ! आणि आता ‘ती’ बरी आठवली तुला! प्रतीक्षा म्हणजे ‘मी इथे वाट पाहणं’ या अर्थाने म्हटलं.. जी मी गेल्या वर्षी तुझी पाहत होते. पण आता काही तुला इतका भाव द्यावासा वाटत नाहीये मला. हं..आता म्हणशील, ‘एका वर्षांत इतका का बरं ड्रास्टिक चेंज?’ साधं लॉजिक आहे. गेल्या वर्षी आलास तेव्हा चांगले ८-१० दिवस धो-धो कोसळलास. नंतर आम्हाला काय.. ठेंगा! वर जाताना सगळ्याचे भाव महागडे करून गेलास ते वेगळंच. सो, तुला मी या वेळी भावबिव देईन असं समजूच नकोस. तर कुठे होतो आपण? हां.. म्हणजे मी काही तुझी वाट पाहत नाहीये. त्यामुळे तू जसं जमेल तसं येऊन जा. वाटेल तसं पडून जा. नुसताच गडगडून जा. (उपरोध कशाशी खातात माहितीये का ? माहीत असेल तर जीवनाचं सार्थकच रे बाबा माझ्या! ) त्यामुळे काय, कसं करायचं ते तुझं तू ठरव.

मी तुझी शाळा घेतेय असं समजायला नकोय लगेच. तुझ्यावर फिदा होण्याची अधूनमधून लहर येतच असते की मला. पण ते काय.. मॅच कोहलीमय झाली की पोरी कशा – ‘कोहली – पुढे हार्ट शेप स्माइली .. लव यू’ असं अपडेट करतात किंवा कोहली प्रेमापोटी ब्लॉग आणि व्यक्त होण्याच्या तत्सम माध्यमांवर काहीच्या काही खरडतात..तसलं नसतं. आपलं जे काही आयुष्यात ते थेट तुला जाऊन भिडणार. क्रशेसबद्दल असलं चुल्लूभर काही तरी वाटणारे तर सोडच.. अगदी सो कॉल्ड प्रेमात असलेले कपल्सही माझं इश्क काय जाणणार! इथे पोरींना स्वत:ची झुल्फं कशी नि काय याची पडलेली आहे. मी बघ कसा केसांचा चंबू बांधलाय. १०० टक्के एकही मुलगा वळून बघायचा नाही आता या क्षणी माझ्याकडे. तसंही इथे कुणाला काय पडलंय कोण काय करतंय याचं! हा जो प्रयत्नपूर्वक गोळा केलेला एकान्त आहे, तो सत्कारणी लावतेय ते फक्त तुझ्याशी बोलून. तू कसं इतरांसारखं बोलणं मध्ये-मध्ये तोडतही नाहीस आणि मला तू का आवडतोस याची कुठली पांचट कारणंही माझ्याकडे नाहीत. त्यामुळे तुला कितीही, काहीही बोलले, रागावले तरी तुझी जागा घेणारं या भूतलावर कुणी आहे का? तूच सांग. जे तुझ्याविषयी मला वाटतं ते ब्रह्मदेवही बदलू शकायचा नाही बघ. तुला भाव द्यायचा नाही असं जरी मी ठरवलेलं असलं तरी तुझ्यावरचं प्रेम आटत नाही बाबा.. त्याचं काय करायचं? तरीही मला ते गेल्या वेळचं आर्जव परत करायचं नाहीये आता. आर्जवं झुरत ठेवतात रे ! निदान आपल्यात तरी ते झुरणंबिरणं नकोय मला. म्हणून खरोखरच तुझी वाट पाहत नाहीये मी. आणि जरा स्पष्टच आठवण करून देते.. मला अजिबात एकटंबिकटं वाटत नाहीये. इथे शुष्क आहे ते काही मी नाकारत नाही; पण त्या शुष्कपणातून मी माझ्यापुरतं हिरवं काहूर वेचून काढलंय. तू निश्चिंत राहा.

– लीना दातार

Story img Loader