डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!
डाएट डायरी
आई! मावशीचा फोन आलाय.. अमेरिकेवरून.. आई, हाय शमे! काय म्हणतेस.. वगरे वगरे वगरे.. नेहमीची सुरुवात आणि मग आई बोलायची बंद. खूप वेळ फक्त ऐकत होती. इतका वेळ की, मी कान टवकारले. मावशी काय एवढी सीरियस गोष्ट आईला सांगतेय याचा अंदाज घेत कान देऊन ऐकू लागले. माझी ही अमेरिकेतली मावशी एकदम स्टुडिअस होती, कॉम्प्युटरप्रेमी. आता अमेरिकेत एका कंपनीत कुठल्या तरी मोठय़ा पोस्टवर आहे. सुरुवातीला तिकडे तिला दिवसपाळी, रात्रपाळी, भारताची वेळ बघून अवेळी काम करायला लागायचं. या सगळ्या विचित्र वेळा सांभाळणं आणि कामाचा रगाडा यात तिची बिचारीची तारांबळ उडायची. अजूनही प्रचंड वर्कलोड असतं तिला तिथे. आम्ही तिच्या भाच्या म्हणजे मी १७ वर्षांची आणि माझी धाकटी बहीण ११ वर्षांची आहोत आणि ती आमचे प्रचंड लाड करते, त्यामुळे अर्थातच मावशी मला भारी आवडते. ती माझा जीव की प्राण आहे.
माझ्या मावशीला बाळ नाही आहे याचंच काय ते तिला दु:ख आहे. गेली अनेक र्वष ती त्यासाठी प्रयत्न करते आहे. अर्थात या सर्व गोष्टी मला आज आईकडून कळताहेत. मावशीचा फोन संपल्या संपल्या मी आईमागे फिरत भुणभुण लावली होती, काय झालं मावशीला ते सांग म्हणून. तेव्हा आईनं हे सांगितलं आणि वर अॅज युज्वल मोठं लेक्चर दिलं.
तर ही माझी मावशी गेली काही र्वष अमेरिकेत आहे. भारतातून जेव्हा ती अमेरिकेत गेली तेव्हा ती छान बारीक होती. तिला स्वयंपाक जेमतेमच करायला यायचा. जेव्हा ती तिकडे गेली तेव्हा ती आधी पीजी म्हणून राहायची. तिला रोजच बाहेरचं खायची सवय लागली होती. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज् हेच सारखं खावं लागायचं. पहिल्या तीन महिन्यांतच मावशीचं वजन पाच किलोनं वाढलं. दरम्यान तिनं नोकरी बदलली. मोठी पोस्ट मिळाली. कामाचा रगाडा वाढला. तिने काही जास्तीची कामंही घेतली. त्यामुळे अजून ताण वाढला. रात्रीची झोपही पुरेशी मिळेनाशी झाली. आई तिला अधनंमधनं फोनवर बोलताना यावरून ओरडायची- तिच्या खाण्यावरून- झोपेवरून; पण मावशीचं काम ही प्रायोरिटी होती. एकीकडे कामाचा ताण व दुसरीकडे मूल होत नाही, याचा ताण यात ती बिचारी अगदी अडकून गेलीय.
शाळेमध्ये विज्ञानाच्या पुस्तकात दिनचर्या चक्र.. सारकेडियम ऱ्हिदमबद्दल वाचलं होतं. आज आई मावशीला जे समजावून सांगत होती, ते ऐकताना ते स्पष्टपणे मलापण समजलं. रात्रीची पुरेशी आणि वेळेवर झोप, वेळेवर आणि पुरेसं सकस अन्न या गोष्टी सारकेडियम ऱ्हिदम सांभाळायला मदत करतात. मावशीची चिंता करता करता मी थोडीशी अंतर्मुख झाले. तेव्हा जाणवलं- आपणही रात्री झोपत नाही. खरं तर माझ्या मैत्रिणीदेखील माझ्यासारख्याच रात्ररात्र जाग्या असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक, चॅटिंग, इंटरनेट ब्राऊजिंग आणि मग कॉलेजच्या असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स या सगळ्यात वेळ कसा (फुकट) जातो हे समजतच नाही. रात्री जागरण होतं. त्यामुळे अरबटचरबट खाणंही होतं. त्यात वेफर्स, चिवडा, चिप्ससारखे तेलकट, खारावलेले पदार्थ जास्त असतात. हे सर्व वजन वाढायला कारणीभूत ठरतात. हे सगळं आठवलं आणि आईचे मावशीला सांगतानाचे शब्द कानात घुमू लागले – ‘‘झोपेचं गणित चुकतं तेव्हा कळत नाही, पण त्याचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असतो. मासिक पाळीवर परिणाम होतो. अनियमितता येते. याचा अंडाशयावर ताण पडतो आणि एक विचित्र चक्र तयार होतं. त्यामुळेही अजून वजन वाढतं.’’
जागरणं, फास्ट फूड, ताण याचा एवढा वाईट परिणाम होऊ शकतो, हे मावशीच्या केसमुळे मला पहिल्यांदाच जाणवलं. थोडक्यात वडिलोपार्जति चालत आलेल्या गोष्टीच बरोबर आहेत, हे पटलं मला. सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठावं. वेळेत नाश्ता, जेवण घ्यावं, कसरत करावी. रात्रीच्या नियमित वेळेला झोपावं.
आता माझी मावशी लाखो रुपये खर्च करतेय एक मूल होण्यासाठी. ट्रीटमेंट घेतेय. म्हणजे जीवतोड मेहनत करून कमावलेला पैसा शेवटी यासाठीच खर्च होतोय. या जवळच्या उदाहरणातून आता मी मात्र बोध घ्यायचा ठरवलंय. आजच निर्णय घेतलाय मी- लवकर झोपण्याचा. अर्थात केवळ डायरीमध्येच लिहितेय हे. आईला सांगितलं तर काय होईल याची कल्पना आहे ना! परत प्रवचन सुरू होईल.. मी नेहमीच सांगते- लवकर झोपावं.. वगैरे वगैरे.:)
(लेखिका वैद्यकीय तज्ज्ञ आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत.)