‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ.
लाइव्ह अॅक्शन शॉर्टफिल्मच्या न आटणाऱ्या समुद्रातले काही मोती.
भारतात ‘पेट’ बाळगण्याच्या संस्कृतीला १९९० नंतर धुमारे फुटले. पक्षी, प्राणी आणि टँकमधील माशांना बाळगण्याचा छंद अजस्र व्यवसायात रूपांतरित झाला. माणसाच्या प्राणीप्रेमाचे दर्शन आपल्याला अवतीभवती दिसत असते. कुत्रा, मांजर, पोपट, कबूतर, ससा हे प्राधान्यक्रमात अग्रभागी असलेली पेट्स आहेत. पेट्स पाळणाऱ्यांना आपल्या प्राण्यांविषयी जितके ममत्व असते, तितकेच प्राण्यांनाही माणसांचा लळा लागलेला असतो. मग तो प्राणी जंगली म्हणून ओळखला जात असला तरीही. १९६८ साली लंडनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये (वन्यरक्षण कायदा तेव्हा लवचिक होता) दोन लहानग्यांनी सिंहाचा बछडा विकत घेतला. ‘ख्रिश्चन’ नामकरण झालेला हा बछडा त्यांच्यासोबतच वाढू लागला. हॉटेलमध्ये जेवायला जाण्यापासून चर्चच्या मैदानात खेळण्यार्पयपर्यंत तो त्याचे मालक एस बोर्क आणि जॉन रॅण्डेल यांच्यासोबत राहू लागला. वर्षां-दोन वर्षांतच त्याचे शरीर आवाढव्य बनले आणि मालकांना लक्षात आले की लंडन शहरात आता या वन्यजीवाला सांभाळणे सोपे नाही. ते त्याला आपल्या फर्निचरच्या दुकानात ठेवू लागले. पण कालांतराने त्याची वाढ इतकी झाली, की त्याला पाहून कुणाचीही छाती दडपावी. विविध मार्गानी या मालकांनी त्याला आफ्रिकेच्या जंगलात सोडण्याचा कार्यक्रम आखला. लंडनमधील मानवी पाहुणचार आटोपून हा तरुण सिंह आफ्रिकेतल्या जंगलामध्ये विसावला. तिकडे जंगलही त्याने आपलेसे केले. आता कित्येक वर्ष या सिंहापासून ताटातूट झालेल्या मालकांनी एक दिवस त्याला पाहण्यासाठी आफ्रिकी सफारी आयोजित केली. आपल्याला इतक्या वर्षांनंतर ‘ख्रिश्चन’ ओळखेल की नाही, ही धाकधूक मनात होती. या धाकधुकीसह संभाव्य सिंहाची भेट चित्रित करण्यासाठी एका वृत्तप्रतिनिधीने सोबत आणलेले कॅमेरे ऑन केले. या दोघांना कैक वर्षांनंतर आफ्रिकी जंगलामध्ये पाहिल्यानंतर सिंहाने जी प्रतिक्रिया दिली, ती आज जगातल्या सर्वोत्तम व्हिडीओजमध्ये गणली जाते. प्राण्यांच्या माणूसप्रेमाची ही झलक ‘ख्रिश्चन द लायन’ या डॉक्युमेण्ट्रीमध्ये पाहायला मिळते. २००८ साली हा झलकतुकडा यूटय़ूबवर प्रसारित झाला आणि सिंह आणि त्याचे मालक पुन्हा प्रकाशझोतात आले. प्राण्यांच्या माणूसप्रेमाचे गोडवे गायले गेले. कित्येक वर्षे जंगलात राहूनही या चेहरे बदललेल्या मालकांना न विसरलेल्या आणि माणसांहून अधिक तीव्रतेने गळाभेट घेणाऱ्या सिंहाची चित्रबद्ध झालेली प्रतिक्रिया आपल्या साऱ्या संवेदनांना ढवळून टाकणारी आहे. या सिंहाने आपला सारा कुटुंबकबिला या मालकांना भेटायला आणला आणि गंमत म्हणजे जंगलातच वाढलेल्या सिंहाच्या कुटुंबानेही पहिल्यांदाच दिसलेल्या या माणसांशी साधलेला सौहार्द व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो. या चित्रफितीमुळे अनेक प्रश्न प्राणीमानसशास्त्रज्ञ, प्राणीप्रेमी यांना पडले. त्यावर आजतागायत चर्चा आणि संशोधन होत आहे.
ख्रिश्चन या सिंहाच्या व्हिडीओला पाहून झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील केव्हिन रिचर्डसन या प्राणिसंग्रहालय मालकाविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. या माणसाला सिंहाविषयी कणभरही भीती नाही आणि सिंहांनाही त्याविषयी अपार प्रेम. या प्रेमाचे दाखले त्याच्या कैक मुलाखतींमधून आणि सिंहासोबतच्या आनंद क्षणांतून दिसते. केव्हिन रिचर्डसनसारखे जातिवंत प्राणीप्रेमी लोकजागृतीचे व्रत घेऊन काम करीत आहेत. त्याचे सारे व्हिडीओ आपली जंगली प्राण्यांविषयीच्या अपसमजांना बदलू शकतील.
ख्रिश्चनची गोष्ट यूटय़ूबवर आली त्यानंतर वर्षां-दोन वर्षांतच ब्राझिलमध्ये अरी मार्कस बोर्जेस या असामीने सर्कसमध्ये हालाखीत वाढणाऱ्या एका वाघाच्या बछडय़ाची सुटका करून त्याला चक्क घरी आणले. घरातील व्यक्तींनी दबकत या जंगलसम्राटाला स्वीकारले. आज त्यांच्या घरामध्ये चक्क सात वाघांची फौज माणसांसारखीच वावरताना दिसते. घरातील व्यक्तींवरचे या प्राण्यांचे प्रेम वृत्तलेख आणि चमत्कारिक बातम्यांचा विषय झाले आहे.
अमेरिकेतील एका घरामध्ये वाघाचा बछडा आणि कुत्र्यांच्या पिल्लांची वाढ एकत्र झाली. त्यामुळे वाघ कुत्राळलेल्या तर कुत्रे वाघाळलेल्या अवस्थेत गेली. यूटय़ूबवर एका लहान व्हिडीओमध्ये एका सकाळी या प्राण्यांच्या मैत्रीची गंमत पाहायला मिळते. या व्हिडीओला अफाट हिट्स मिळाल्या असले, तरी प्रतिक्रियांमध्ये माणसांचे हिंस्त्र शब्दभांडणही झालेले पाहायला मिळते.
मानवी सभ्यता आणि संस्कृतीचे धडे बालपणापासून घोकवत ठेवण्याची आपल्या पारंपरिक शिक्षणपद्धतीसारखी कोणतीही यंत्रणा नसतानाही प्राण्यांमध्ये माणूसप्रेम कसे आणि किती असू शकते, याची उदाहरणे या व्हिडीओजमध्ये पाहायला मिळतील.
मस्ट वॉच व्हिडीओ लिंक्स