वेदवती चिपळूणकर

कोणतीही गोष्ट घरगुती प्रमाणावर करणं आणि व्यावसायिक प्रमाणावर करणं यात फरक असतो हा कायमचा समज आहे. त्यामुळे घरगुती प्रमाणावर कोणी केटरिंग, ब्युटी पार्लर, इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे करीत असेल तर त्याला फारशी किंमत दिली जात नाही. मात्र हेच सगळं ‘प्रोफेशनल’ म्हणून किंवा व्यवसाय म्हणून केलं जात असेल तर मात्र त्याचं कौतुक होतं. यामागे हा समजही आहे की, घरगुती प्रमाणावर आहे म्हणजे कदाचित त्या कामाचा दर्जा उत्तम नसावा म्हणून ते घरगुती प्रमाणावरच राहिलं. यातूनही ही धारणादेखील कायम झाली की, घरगुती प्रमाणावर आहे म्हणजेच त्याची क्वॉलिटी तितकी उत्तम असणार नाही. प्रत्यक्ष दुकान न टाकता किंवा ऑफिस न मांडताही सव्‍‌र्हिसेस चांगल्या देता येऊ  शकतात ही वस्तुस्थिती काही पचनी पडणारी नव्हती. कोणत्या ठिकाणाहून सव्‍‌र्हिस मिळतेय याच्या पलीकडे जाऊन ती काय ‘लेव्हल’ची मिळतेय हे पाहायला सहसा कोणी तयार नसे. हे सगळं सांगायचं कारण या परिस्थितीतून आजच्या शब्दाचा उगम झाला आहे.

मोठा व्यवसाय म्हणून नसेल पण एखाद्याची एखाद्या गोष्टीतली ‘एक्स्पर्टीज’ सांगायला म्हणून ‘प्रो’ हा शब्द अस्तित्वात आला आहे. ‘प्रो’ हा प्रोफेशनलचा शॉर्टफॉर्म म्हणता येईल. मात्र त्याचा मथितार्थ तो नाही. ‘प्रो’ ही संज्ञा क्वॉलिटी दाखवणारी आणि तरीही व्यवसाय नसणारी अशी आहे. ज्याला घरगुती आणि व्यावसायिक यांच्या मध्यावर म्हणता येईल असा काहीसा या ‘प्रो’चा अर्थ होतो. एखादी मुलगी मेकअपमध्ये ‘प्रो’ आहे याचा अर्थ ती त्यातली प्रोफेशनल आहे किंवा ते तिचं प्रोफेशन आहे असा होत नाही, तर तिची मेकअप स्किल्स एखाद्या शिकलेल्या आणि प्रोफेशनल असलेल्या मेकअप आर्टिस्टच्या दर्जाची आहेत असा होतो. एखाद्या मुलाने केकचं प्रत्यक्ष दुकान टाकलं नसेल किंवा बेकरीही सुरू केली नसेल, मात्र त्याची बेकिंग स्किल्स ही प्रोफेशनलच्या तोडीची आहेत, म्हणजेच ‘ही इज अ प्रो’!

हा शब्द या पिढीने स्वत:च्या स्किलसेट्सना एक संज्ञा मिळवून देण्यासाठी शोधून काढला आहे. प्रत्येक गोष्टीच्या केवळ स्वरूपावरून त्याच्या दर्जाची पारख करण्याच्या ‘जजमेंटल’ वृत्तीला दिलेलं हे भाषिक उत्तर म्हणता येईल.

viva@expressindia.com

Story img Loader