हॅप्पी न्यू इयर! २०१५ संपलं नि २०१६ सुरूही झालंय. या वर्षांच्या बदलाचा वेळ आणि वेळेच्या वेगाचं नावीन्य यात म्हटलं तर फरक केवळ काही सेकंदांचा. म्हटलं तर अख्ख्या वर्षभराचा. फक्त आपण कोणत्या अँगलनं बघतोय ते महत्त्वाचं.

हा वेळ आपल्या आयुष्यात किती अफाट वेगानं पुढंपुढं सरकतोय.. ‘वेग’ या शब्दाचंच जणू वेड लागलंय आपल्याला. त्याचं प्रतिबिंब सर्वाधिक दिसतंय ते युथफुल लाइफस्टाइलमध्ये. सेलफोनमध्ये टायमिंग बघितलं जातं आणि १२०च्या स्पीडनं ‘धूम मचा के’ बाइक्स उडवल्या जातात. फ्रेण्ड सर्कल किंवा कलिग्जच्या बोलण्याइतकं लक्ष अनेकांच्या मते पकाऊ असणाऱ्या घरच्यांच्या बोलण्याकडं देता येत नाही. का, तर ते ऐकायला वेळच नाहीये. अटेंडन्सपुरती लेक्चर्स गाठून बाकी लाइफ एन्जॉय केलं जातं. काही मूठभर लोक्स अभ्यास आणि फन लाइफ या दोन्ही डगरींवर पाय रोवून उभे राहू शकतात. क्वचित प्रत्यक्ष सामाजिक कार्यात समरस होतात.

कधी जमलंच तर मग रिलेशनशिप स्टेट्स अपडेट होतात. तेही इमोजींच्या साहाय्यानं! कधी जमतंय, कधी बिनसतंय, वगैरे वगैरे. मग ते दु:ख लपवायला आधार घेतला जातो संगीताचा. आनंदाइतकंच दु:खातही संगीत आपल्याला साथ करतंच. त्यामुळं वेगानं जाणाऱ्या एखाद्या कारमधल्या डेकवर मोठय़ानं गाणी ऐकणारे दर वेळी मज्जेतच असतील, असं नाही.

या सगळ्यात एकच गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे वेग नि वेळ. अशा वेळी आठवतो तो ‘रन लोला रन’ हा चित्रपट. त्यात प्रत्येक शक्यतेसाठी जिवाच्या आकांतानं वेगानं पळणारी ‘लोला’ हेच काय ते सत्य. बाकीच्या सगळ्या शक्यता बदलत्या, चांगल्या-वाईट.. माणसं तीच दिसली तरी त्यांचा बदलता अ‍ॅटिटय़ूड.. आपणही सारे ‘लोला’ आहोत का?.. असू तर वेग नि वेळ गाठत पळणं तेवढं आपल्या हाती आहे सध्या. या साऱ्या पळापळीत ससा नि कासवाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी अर्थातच जुनी आणि नवीही.. हाच करू या आता नव्या वर्षांचा संकल्प आणि त्यासाठी शुभेच्छा!

 

बावरा मनं

आपलं आयुष्य वेगवान झालंय हे खरंय. पण या वेगाशी जुळवून घेताना बऱ्याचदा आजच्या तरुणाईचीही प्रचंड मानसिक ओढाताण होतेय. बदललेल्या लाइफमध्ये ताणही वेगळे आहेत. अभ्यास, परीक्षा, रिलेशनशिप, ब्रेक-अप, एकटेपणा, रॅगिंग.. अशा असंख्य गोष्टीत नैराश्याचे क्षण येतात. निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा काय करावं सुचत नसतं. कुणाबरोबर तरी आपला प्रश्न शेअर करावासा वाटतो. असा कुणी तरी त्या वेळी लागतो, जो आपलं म्हणणं ऐकून घेईल, समजून घेईल आणि योग्य तो सल्ला देईल. आपला प्रश्न किती साधा आहे, बाष्कळ आहे, फालतू आहे, असं म्हणून आपल्याला हसणार नाही. मग नवीन वर्षांपासून लोकसत्ता व्हिवामधली ही जागा तुमच्या अशाच बावरलेल्या मनासाठी दिली आहे. तुम्ही इथे मोकळेपणानं व्यक्त व्हा. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील. डॉक्टरांपर्यंत पोचण्यासाठी तुमचे प्रश्न viva@expressindia.com या ई-मेल आयडीवर आम्हाला पाठवा. सब्जेक्ट लाइनमध्ये ‘बावरा मन’ असं जरूर लिहा.

Story img Loader