गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

टीव्ही पाहण्याच्या आपल्या सवयीमध्ये बदल झाला त्याला शेकडो चॅनल्स कारणीभूत आहेत हा समज चुकीचा आहे. म्हणजे चॅनलपर्यायांमुळे सर्फिगनादात एकाग्रपणे काही तास शांतपणे टीव्ही पाहणे आपल्याला जराही जमत नाही. पण त्याहून अधिक जो कार्यक्रम पाहतो तेव्हा त्यासोबत लागणाऱ्या जाहिरातींच्या आकर्षक घटकांमध्ये अधिक अडकून पडतो. मग मूळ काय पाहत होतो, हेच विसरून जातो. हा बदल खरा आपल्यात झाला आहे. अध्र्या ते दीड मिनिटांच्या या जाहिराती व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या उत्पादनाची टिमकी वाजवताना या जाहिराती अवघ्या काही सेकंदांमध्ये तुम्हाला धरून ठेवणारे दृश्य, लक्षात राहतील असे शब्द, सतत डोक्यात वाजेल असे गाणे किंवा वाद्यसंगीत यांचे एकत्रित ‘पॅकेज’ सादर करतात. मोठा चित्रपट दोन-तीन तासांच्या कालावधीत जितका मनावर परिणाम करतो, तितकीच अगदी छोटुकली लक्षवेधी जाहिरातही करून दाखवू शकते. गेल्या दीड-दोन दशकांमध्ये या जाहिरात क्षेत्रात कल्पकतेचा परमोच्च आविष्कार झालेला दिसतो. मायकेल गॉण्ड्री या फ्रेंच चित्रपट दिग्दर्शकाची कोणतीही छोटुकली जाहिरात पाहणे कलात्मकतेचा प्रचंड मोठा अनुभव असतो. गेल्या दशकात त्याने बनविलेली ‘एअर फ्रान्स’साठीची अवघ्या एकावन्न सेकंदांची जाहिरात कठीण कल्पनेला किती सोप्या पद्घतीने राबविता येते, त्याचे उदाहरण ठरेल. विमान कंपनीच्या जाहिरातींमध्ये त्यातील सेवा-सुविधा, विमानसुंदरींची आपुलकी यांचा देखावा पेरून तुमचा प्रवेश सुरक्षित आणि पैसे वसूल करणारा कसा आहे, या बाबी सांगणे आता टूम बनले आहे.

गॉण्ड्रीने गेल्या दोनेक दशकांत रूढ झालेल्या या भलामण उद्योगाला टाळून सामान्य माणसांच्या रोजच्या व्यवहारातील कित्येक घडामोडींचे चित्रीकरण केले आहे. या प्रत्येक घडामोडीमध्ये आकाशात एअर फ्रान्सचे विमान अत्यंत देखणेपणे उभे केले आहे. संगणकीय चमत्कृतींचा फार आधार न घेता तयार केलेली ही जाहिरात एअर फ्रान्सचे नाते थेट माणसांशी कसे जोडते हे पाहणे गमतीशीर आहे. संगीत, साध्याच घटकांतून सौंदर्य निर्माण करण्याची हातोटी आणि जे सांगायचे आहे, ते एका ओळीच्या लिखित मजकुरात सांगण्याचा यामधील प्रकार जमून कसा आला आहे, हे पाहिल्यावरच कळू शकेल. गॉण्ड्रीच्या जाहिरातविश्वात शिरण्याचा ही जाहिरात म्हणजे उत्तम मार्ग आहे. एका फ्रेन्च म्युझिकल बॅण्डमध्ये ड्रमर म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या गॉण्ड्रीने एमटीव्हीने सुरुवातीला आणलेल्या म्युझिक व्हिडीओसारखा तीन मिनिटांचा कालावधी व्यापणारा व्हिडीओ करण्याचे काम गमतीने हाती घेतले. गॉण्ड्रीचा बॅण्ड पुढे टिकला नाही. पण त्याचे व्हिडीओनिर्मितीचे कौशल्य मात्र त्याला ड्रम वाजविण्याहून अधिक मोठे करिअर देऊन गेले. मोठमोठय़ा पॉपस्टार्सच्या म्युझिक व्हिडीओजना बनवून त्याने हॉलीवूडपर्यंत मजल मारली. त्याचा ‘इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइंड’ नावाच्या जिम कॅरी अभिनित सिनेमाची कल्पना जाणून घेतली, तरी या दिग्दर्शकाच्या डोक्यात चालणाऱ्या अचाट कल्पनांची ओळख पटेल. इथे त्याच्या चित्रपट कारकीर्दीपेक्षा त्याच्या जाहिरातींना महत्त्व आहे. एक ते तीन मिनिटांच्या त्याच्या जाहिराती दृश्य अभ्यासकांसाठी किंवा अल्पावधीत काही चांगले पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पर्वणी आहे. स्मर्नऑफ या मद्याची जाहिरात अवघ्या एक मिनिट बारा सेकंदांची आहे. पण त्यात वेगवान चित्रपटासारखी किती मोठी कहाणी येते हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटायला लागते. गॉण्ड्रीच्या या जाहिरातींदरम्यानच जगभरातील म्युझिक व्हिडीओमध्ये भल्यामोठय़ा कहाण्या कमीत कमी काळात दाखविण्याचा आरंभ झाला. गॉण्ड्री जाहिरात करण्यासाठीच आलेला नसल्यामुळे त्याने या क्षेत्रातील पारंपरिक संकल्पना खुंटीवर टांगून जाहिराती, म्युझिक व्हिडीओज आणि फिल्म्स बनविल्या. त्याची लीवाइज जीन्सच्या जाहिरात मालिकांपैकी कोणती ना कोणती तरी आपण आपल्या टीव्हीवर पाहिलेली आहे. लीवाइज जाहिरातींमधील एका जाहिरातीमध्ये  एक अतिहडकुळा इसम जिन्स घालून फेरफटका मारण्यासाठी जाताना दाखविला आहे. कॅमेरा त्याच्या जिन्सवर रोखल्यानंतर त्या जिन्सचे होणारे नृत्य पाहणाऱ्याला जागच्या जागी खिळवून ठेवते. जाहिरातींमध्ये आज आलेल्या चमत्कृती, कल्पकता यांना तोड नसली, तरी दीड दशकापूर्वी या साऱ्याची सुरुवात करणाऱ्या मायकेल गॉण्ड्रीच्या दृश्यजगताचा फेरफटका मारणे आवश्यक आहे.

मायकेल गॉण्ड्रीच्या काही क्लासी जाहिरातींच्या व्हिडीओ लिंक्स

https://www.youtube.com/watch?v=VmNztYfInOA

https://www.youtube.com/watch?v=qbOGJy3P6rA

https://www.youtube.com/watch?v=dRPLbhrnkVU

viva@expressindia.com