गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

पट्टीच्या किंवा हाडाच्या वाचकांना आपल्या आवडत्या किंवा सर्वात नावडत्या लेखकाची सगळीच पुस्तके वाचण्याची असोशी असते. लेखकाबद्दल स्तुती करायची असो किंवा त्याच्यावर घणाघाती टीका करायची असो, त्यासाठी सारे वाचलेच पाहिजे हा नियम त्यांच्याकडून पाळला जातो. यूटय़ूबवर खासगी व्हिडीओच्या पसाऱ्यात आपल्या छंदोव्यसनाला दाखवून देण्याची यूटय़ूबर्सची सर्वात शेवटची लोकप्रिय गोष्ट म्हणजे लेखकांच्या माहितीने भरलेले व्हिडीओज प्रसिद्ध करण्याची. ही माहिती आपल्याला लेखक कसा आवडतो याविषयी बाळबोध स्वरूपात सांगण्यापासून ते या लेखकाची आपण सगळीच पुस्तके कशी वाचली या फुशारकीने देखील भरलेली असू शकते.

या चित्रफितींमधील निवेदक भवताली पुस्तकांचा अर्निबध पसारा कॅमेऱ्यात कैद होईल याची दक्षता घेतली जाते. यातील बहुतांश सादरकर्ते भारावून गेलेले अथवा अध्र्या हळकुंडात पिवळे झालेलेही मिळू शकतात. पण खूप संशोधन केले तर प्रामाणिकपणे आपल्याला विशिष्ट लेखकांच्या पुस्तकांतून मिळणाऱ्या आनंदाला इतरांसोबत वाटण्यासाठी उत्साही असलेल्या वाचनवेडय़ांचाही लाभ होतो. गेली दहा ते पंधरा वर्षे बदलत्या मानसिकतेच्या सर्वच तरुणाईमध्ये आश्चर्यकारकरीत्या आपण हारुकी मुराकामी या जपानी लेखकाचे वाचनभक्त असल्याची आवर्तने घडत आहेत. जपानमध्ये या लेखकाचा प्रत्येक नव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राष्ट्रीय सणासारखा साजरा होतो. लोक पुस्तकाचे दुकान उघडल्यानंतर पहिल्या आवृत्तीची प्रत घेण्यासाठी रात्रभर दुकानाभोवती गर्दी करतात. कथा-कादंबरी लिहिणाऱ्या जगभरातील कोणत्याही लेखकाला हारुकी मुराकामी यांच्याइतका मान-सन्मान मिळाला नसेल. तर या लेखकाचे अजिबात काही न वाचलेल्यांना त्यांनी मुराकामीचे वाचन कुठून करावे हे सांगणारा एक छान व्हिडीओ आहे. त्यात अर्थातच व्हिडीओकर्त्यां मुलीची वैयक्तिक मतांचा वकुब हजर आहे. तिने वाचलेल्या आणि तिला आकलन झालेला मुराकामी दुसऱ्या एखाद्या व्हिडीओकर्त्यांला वेगळा वाटू शकतो. याच व्हिडीओकर्तीने तेरा कादंबऱ्या (२०१६ पर्यंतच्या) वाचून त्यांची गुणवत्तेनुसार एक ते १३ अशी वैयक्तिक मांडणी करणारी  एक क्लीप अपलोड केली आहे. यातील मते संपूर्ण मुराकामी वाचलेल्या व्यक्तीला कदाचित वेगळी वाटू शकतील. बहुतांश तरुणींनी हारुकी मुराकामीच्या लेखनावरचे उस्फूर्त प्रेम व्यक्त केले आहे. मात्र एका व्हिडीओमध्ये त्याला वाचून त्याच्या कादंबऱ्यांत येणाऱ्या मांजर आणि जॅझच्या मुद्दय़ावर गमतीशीररीत्या टीका केली आहे. अर्थात हे व्हिडीओ लेखकांविषयी आपल्याला परिपूर्ण माहिती देणारे नसले तरीही त्यातून हाती काहीच लागणार नाही असे नाही. मुराकामीच्या शोधात एक छानसा पन्नासेक मिनिटांचा माहितीपट उपलब्ध आहे. मुराकामीचे साहित्य ज्या भागात घडले, त्या भागात निवेदकासह घेऊन जाणारा हा व्हिडीओ या लेखकाच्या साहित्यावर असलेल्या वेडय़ा प्रेमापोटी असला तरी खूप चांगला झाला आहे. त्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या भवतालाचे दर्शन यात करण्यात आले आहे. जपानी मुराकामीइतका अमेरिकी फिलीप रॉथ हादेखील लाखो वाचनभक्तांचा लाडका लेखक आहे. सवरेत्कृष्ट अमेरिकी लेखकांच्या पंगतीमध्ये स्थान असलेल्या या लेखकावर बीबीसीने केलेल्या दोन भागांच्या लांबलचक मालिका नुसत्या या लेखकाचीच माहिती देत नाहीत तर गेल्या पाच दशकांतील जागतिक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटनांचा आढावा घेतात. ‘न्यूयॉर्कर’ या साप्ताहिकाच्या विद्यमान आणि माजी संपादकांनी या लेखकाच्या घेतलेल्या दोन मुलाखतीही आवर्जून पाहाव्यात अशा आहेत. वर्तमानात लोकप्रिय असलेल्या अमेरिकी लेखक जोनाथन फ्रॅन्झन आणि कित्येक ताज्या जागतिक लेखकांवरच्या मुलाखती, अभिवाचन आणि जलशांचे चित्रीकरण यूटय़ूबवर प्रसारित करण्यात आले आहे. भारतीय लेखकांबद्दल सांगणाऱ्या व्हिडीओजचाही यात समावेश आहे. पॅरिस शहरामधील शेक्सपिअर अ‍ॅण्ड कंपनी हे पुस्तकालय गेल्या शतकभरापासून साहित्य आणि साहित्यिकांनी गौरविलेले आहे. पुस्तकांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये या दुकानाचा उल्लेख असतोच असतो. तर या पुस्तकालयातील नार्वे या देशातील एका प्रचंड लोकप्रिय लेखकाची मुलाखत आणि अभिवाचन आवर्जून ऐकावे आणि पाहावे. लेखक समजून घेताना त्याचे वाचक जाणून घेणेही महत्त्वाचे असते.

यूटय़ूबमुळे अनेक गोष्टींसोबत ही गोष्टही सुकर झाली आहे. तेव्हा या माध्यमाचा वापर सजगपणे झाला तर या विद्यापीठातील ज्ञान आयुष्यभर पुरून उरेल.

viva@expressindia.com

Story img Loader