थंडी म्हटल्यावर खूप साऱ्या गोष्टी कराव्या असं आपल्याला वाटत असतं. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेकिंग. अस्सल ट्रेकरला वर्षांचे ३६५ दिवस गडकिल्ले खुणावत असतात. परंतु हौशी ट्रेकर्सना थंडीच्या दिवसांत गडाच्या दिशेने जायची हुक्की निर्माण होते. धुक्यात हरवलेल्या वाटा आणि डोंगर शोधताना त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो.
‘चला ट्रेकिंगला जाऊ..‘ हे वाक्य ‘चला जेजुरीला जाऊ‘च्या चालीवर घोळवत घोळवत नील कट्टय़ावर येऊन थडकला. त्याचे हे बोल ऐकून सुस्तावलेला कट्टा खडबडून जागा झाला. ‘हे काय अवचित नवल घडे’च्या आविर्भावात सगळे त्याच्याकडं बघू लागले. ‘अरे सोशल साइट्सवरचे आणि ‘क्लिक’मधले ट्रेकिंगचे फोटोज बघणं बास्स झालं आता. हम भी किसी से कम नहीं. कर के दिखाएंगे..’ नील संतापला की राष्ट्रभाषेचा आधार घेतो. ते ओळखून ऋचा म्हणाली ‘हो हो. जाऊया.’ मग ट्रेकिंगवरच्या एका महाचच्रेतून ट्रेकिंगला जायचंच असा निष्कर्ष निघाला.
ट्रेकिंगला जाऊन काय काय करायचं याबाबत चिक्कार डोकॅलिटी लढत होती. पण नेमकं कुठं जायचं याचा कुणीच विचार केला नव्हता. नेटवर सर्च मारला तर कितीतरी किल्ल्यांची माहिती दिसली. पण कोणता निवडावा, ते कळेना. मग ट्रेकिंगला जाणाऱ्या सोहमच्या दाला विचारायचं ठरलं. खूप मस्काचस्का लावल्यानंतर व्योमदानं राजमाचीवर जा, असा सल्ला दिला. या सल्ल्यामुळं आमचं वॉलेट, वेळ आणि घरच्यांची परवानगी हे सगळे फॅक्टर्स जमेस झाले. मग ट्रेकिंगची तयारी करता करता त्या दिवसाची वाट पाहणं सुरू झालं.
आणि आमच्या ट्रेकिंगचा दिवस उजाडला. लोणावळ्याहून तुंगार्लीमाग्रे राजमाची गावात पोहोचलो. गावाच्या वेशीजवळच एका योद्धय़ाचं स्मारक, दरवाज्याचे अवशेष, गणपती आणि मारुतीची मूर्ती आहे. गावात जरासा विसावा घेऊन गडाची वाट चालू लागलो. सोबतीला होती नेटवरून सर्च केलेली माहिती आणि तसंच सगळं दिसू लागलं होतं.. ते असं.. राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा असं म्हटलं जाई. कल्याणच्या स्वारीनंतर शिवाजी महाराजांनी राजमाचीसह काही किल्ले स्वराजात दाखल करून घेतले. पेशवाईनंतर हा किल्ला इंग्रजांकडं गेला.. वगरे वगरे.. राजमाचीवरून तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, पेठ, भीमाशंकर, गोरखगड, चंदेरी असा परिसर नजरेस पडतो.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खोपोली आणि लोणावळ्यादरम्यान हा किल्ला सहजगत्या दिसतो. राजमाचीची दरी तळदरा म्हणून ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. राजमाचीचं खरे वैशिष्टय़े म्हणजे त्याचे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन. बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या सखल पट्टीवर भरवनाथाचं मंदिर आहे. किल्ल्याच्या माचीवर उधेवाडी आहे. मनरंजन हा उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान आहे. या परिसरात किल्लेदारांच्या वाडय़ांचे अवशेष दिसतात. समोरच्या दगडी मंदिराच्या दरवाजावर गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. इथून कर्नाळा, प्रबळगड, इर्शाळगड. श्रीवर्धनची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याच्या दोन टाक्या? पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे.
राजमाची किल्ल्याच्या पोटात असलेली लेणी सातवाहन काळाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या लेणी समूहात चत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. शिरोटा तलावाच्या पश्चिमेला एक शंकराचं मंदिर आहे. उदयसागर तलावासमोरील टेकडी खाली उतरून गेल्यावर एक मोठं पठार लागतं.
एवढं सगळं फिरल्यावर जाम दमायला झालं होतं. थोडी पेटपूजा झाल्यावर फोटोसेशन झालं. हो, नीलराजांनी तसा ‘पण’च केला होता. गडावरची ही स्वारी त्याला सोशल साइट्सवर झळकवायची होती. बघता बघता उन्हं कलू लागली. आता परतीला लागणं भाग होतं. घरची ओढ लागलेल्या वासराप्रमाणं आम्हीही पटापटा उतरू लागलो. गावात पोहोचल्यावर एक टपरी दिसली, तिथं कटिंग घेतला. गरमागरम पोहेही हादडले. मग एसटीनं कर्जत स्टेशन गाठून लोकल पकडली. लोकलमध्ये बसल्यावर एरवी अशा वेळी सॉलिड पीजेगिरी आणि गाण्याबजावण्यांना ऊत आला असता. पण आजचा दिवस काही वेगळाच होता.. आमचा हा पहिलाच ट्रेक.. पाय बोलू लागले होते खरे, पण एक भन्नाट फििलग होतं.. आज एक गड प्रत्यक्षात पाहिला.. चढला होता.. स्लाइटली अनुभवला होता.. कसे असतील बाकीचे गड.. तिथला इतिहास.. तिथला वर्तमान.. व्योमदाला भेटायला पाहिजे.. त्याच्याकडून जाणून घ्यायला पाहिजे.. आता सीझनही छान थंडीचा आहे. गडावरचं धुकं विरल्यावर दिसणारा व्ह्यूही छान असेल.. मनभर पसरणारा आनंद असेल.. सगळ्यांच्या मनात बहुतेक याच फिलिंग्ज असाव्यात. कारण एकमेकांकडं बघत क्षणार्धात सूर आळवले गेले.. चला ट्रेकिंगला जाऊ..

Story img Loader