विजेत्या (डावीकडून) अनामिका दुसरा क्रमांक, नित्या प्रथम क्रमांक आणि सोनिया तृतीय क्रमांक
‘कोणालाही आपलंसं करून घ्यायचं असेल, तर तो मार्ग पोटातून जातो’, या मराठीतल्या ठोकळेबाज विधानात आजही तितकंच तथ्य आहे. म्हणूनच तर अनेकदा समोरच्या माणसाला खूश करायचं असेल तर त्याला स्वादिष्ट जेवण ऑफर केलं जातं. मग काहींना यातून ‘बढती’चा मार्ग दिसतो, तर काहींना आपल्या लाइफ पार्टनरच्या पसंतीचा.. हिच्या हातचं जेवणं जेवलो आणि माझी विकेटच पडली, असंही सांगणारे काही कमी नाहीत..
आपण खाण्यासाठी जगत नाही, जगण्यासाठी खातो, असं असलं तरी आजीच्या हातची तलम मुलायम पुरणपोळी, मोदकाच्या कळीदार पाकळ्या आणि आईच्या हातचं चमचमीत लोणचं आठवलं की तोंडाला नकळत पाणी सुटतं किंवा या पदार्थाच्या आठवणींनीही पोटाला दिलासा मिळतो.
आज काळ बदलला. स्त्रियांचं साम्राज्य फक्त स्वयंपाकघरापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते निश्चितच विस्तारलं आहे. कधी कधी करिअरमुळे स्वयंपाकघरात प्रवेश करण्याइतकाही वेळ नसतो. तरीही कुठेतरी स्वयंपाकाविषयी मनात एक कुतूहल असतं..
नेमकं हेच हेरून गृहिणी आणि करिअर करणाऱ्या महिलांना एक ग्राहक म्हणून आकर्षित करून घेण्यासाठी ‘एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया’तर्फे मायक्रोवेव्हमध्ये कुकिंग करणाऱ्या महिलांसाठी ‘मलिका-ए-किचन’ ही कुकिंग स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचं या स्पध्रेचं पाचवं वर्ष आणि दरवर्षी या स्पध्रेला खच्चून प्रतिसाद मिळतो. या स्पध्रेच्या या वर्षीची पहिली विजेती ठरली ती कोइम्बतूरची के. एन. नित्या, तर दुसऱ्या क्रमांकावर होती पुण्याची अनामिका सिंग आणि कोलकात्याची सोनिया भट्टाचार्यजीला तिसरा क्रमांक मिळाला. या तिघीही २१ ते ३० वयोगटांतल्या आणि सुशिक्षित. एकूण ११ विभागांमधून निवडलेल्या ११ महिलांमधून या तिघी विजेत्या ठरल्या.
नित्या वकील आहे, पण मुलांसाठी तिने करिअर बाजूला ठेवलंय. मग मिळणारा बराचसा वेळ हा किचनमध्ये जातो. केवळ स्वयंपाक करून मोकळं न होता पौष्टिक आहारावर तिचा भर असतो. अनेक नवनवीन प्रयोग करून टीव्हीवरील कुकरी शोमध्ये तिने बक्षिसं मिळवली आहेत. ‘मी या स्पध्रेत उतरले ते जिंकण्याच्या उद्देशानेच आणि मी त्यात यशस्वी झाले, यामुळे मला निश्चितच आनंद होतोय. पहिल्यापासूनच कुकिंग हे माझं पॅशन राहिलंय. नवनवीन पदार्थ करायचे आणि ते इतरांना खाऊ घालायचे, हा माझ्यासाठी एक आनंदाचा सोहळा असतो. माझ्या पदार्थामधील वैविध्यामुळेच मला हे यश मिळालं, असं ती ठामपणे सांगते. या स्पध्रेतील पहिल्या क्रमांकामुळे मला केपटाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळणार असल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे आणि याची मला जाणीव आहे, असं ती सांगते.
अनामिका सिंगनेही मुलांसाठी आपलं करिअर बाजूला ठेवलं. लग्नापूर्वी किचनशी फारसा संबंध आला नाही, अशी प्रांजळ कबुली देतानाच लग्नानंतर विशेषत: मुलांना नवनवीन पदार्थ करून घालण्याच्या इच्छेनेच ती स्वयंपाकघरात रस घेऊ लागली. मात्र तिच्या हाताला एक वेगळी ‘चव’ आहे, अशी दादही तिला मिळत होती. कुकिंग ही एक कलाच आहे, ती सहज कोणालाही जमू शकेल असं काम नाही, यावर तिचा गाढ विश्वास आहे. त्यामुळे अनेकजण स्वयंपाककलेला दुय्यम मानतात, ते तिला अजिबात मान्य नाही. या स्पध्रेमुळे आपल्यातील या छुप्या कलेला वाव मिळाला असून, त्याचा सदुपयोग करण्यासाठी आपण कुकिंग क्लास सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं ती सांगते. या निमित्ताने आपलं कुकिंगमधलं करिअर सुरू होईल, ज्यात मला गतीही आहे आणि आनंदही, असं ती मोठय़ा विश्वासाने सांगते.
या स्पध्रेतील तिसरी विजेती सोनिया भट्टाचार्यजी ही बीडीएसच्या शेवटच्या वर्षांला आहे. एक डेंटिस्ट म्हणून नाव कमावण्याइतकंच एक कुकिंगमधलं करिअर मला तितकंच महत्त्वाचं वाटतं. कुकिंगमुळे दृष्टी, चव आणि गंध ही इंद्रिये अधिक बळकट होतात. कुकिंग ही एक क्रिएटिव्ह आर्ट आहे. माझा हा छंद आहे, ज्याकडे मी खूपच सकारात्मक दृष्टीने पाहते. या स्पर्धेमुळे आपल्याला कुकिंगमध्ये करिअर करण्याची दारं किलकिली झाली आहेत, असं ती म्हणते.
अशा प्रकारच्या स्पर्धामुळे स्वयंपाक कलेला मानाचे स्थान मिळेल आणि त्याकडे गृहिणीही अधिक सकारात्मक दृष्टीने पाहतील असं या तिघींचं म्हणणं आहे.
मलिका – ए – किचन
‘कोणालाही आपलंसं करून घ्यायचं असेल, तर तो मार्ग पोटातून जातो’, या मराठीतल्या ठोकळेबाज विधानात आजही तितकंच तथ्य आहे. म्हणूनच तर अनेकदा समोरच्या माणसाला खूश करायचं असेल तर...
First published on: 29-11-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lg mallika e kitchen cooking contest