कोणी शिक्षणाच्या निमित्ताने तर कोणी कामाच्या निमित्ताने आपलं मूळ गाव सोडून, आई-वडील, आप्तेष्ट, मित्रमंडळींपासून लांब मोठय़ा शहरात वास्तव्याला येतात. या मोठय़ा शहरात असलेली नवीन आव्हानं पेलताना अनेक पातळ्यांवर जुळवून घ्यावं लागतं. जवळच्या मित्रांना, घरच्यांना न सांगता अनेक गोष्टी मनातच ठेवल्या जातात. या गोष्टी सांगाव्यात की नको या संभ्रमात आपण असतो आणि या सगळ्यामधूनच ‘गर्दीतला एकटेपणा’ जाणवायला सुरुवात होते.

मे महिना म्हणजे सुट्टीचा महिना. पण नव्या वळणावर उभ्या तरुणाईसाठी हा महिना म्हणजे नव्या नवलाईचा. उच्चशिक्षणासाठी, नव्या कोर्सच्या अ‍ॅडमिशनसाठी, इंटर्नशिपसाठी किंवा प्रोबेशनसाठी आपलं गाव सोडून याच महिन्यात बहुतेक तरुणाई नव्या शहरात राहायला येते. काही तरी उद्दीष्टं, ध्येय साध्य करण्यासाठी एव्हाना या नव्या वळणावरच्या तरुण मंडळींनी मोठय़ा शहरांची वाट धरलेली असेल. आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपलं उत्तम करिअर घडविण्यासाठी मोठय़ा शहरांशिवाय पर्याय नाही, असंच सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे गजबजलेल्या मेगासिटीमध्ये स्वप्नांचा पाठलाग करत आपण येऊन पोचतो आणि मग या मोठय़ा शहराशी जुळवून घेण्याची धडपड सुरू होते.
इथे आल्यावर दररोज नवीन आव्हानांना तोंड देताना अनेकदा तरुण मनांची घालमेल होते. अनेक गोष्टी अशा घडायला लागतात की, कोणाशीतरी मनातलं प्रांजळपणे बोलावंसं वाटतं. इतके नवे अनुभव एकदम येतात की त्याविषयी सांगायला कुणीतरी आपलं माणूस जवळ असावं असं वाटतं. कधी द्विधा मनस्थिती होते. स्वतचे निर्णय स्वत घ्यावे लागतात. कोणाचं मत घेऊ , कोणाला मनातलं सांगू ? असे प्रश्न मनात निर्माण व्हायला लागतात. कधी नोकरी करतांना येणाऱ्या अडचणी, शिक्षण घेतांना येणाऱ्या समस्या, मोजक्या पैशांत भागवण्याची चिंता तर कधी रिलेशनशिपचा गुंता.. अनेक प्रश्न मनात निर्माण होत राहतात. आता या मोठय़ा शहरात अनेक नवीन लोकांच्या ओळखी झालेल्या असतात. अनेक नवीन मित्रमैत्रिणी शिकत असतांना किंवा मग नोकरीच्या ठिकाणी जोडले जातात. पण यामधल्या कोणत्या व्यक्तीसमोर आपलं मन हलकं करावं, कोणाला आपल्या अडचणी सांगाव्यात अशाप्रकारचा गोंधळ मनात सुरू राहतो. त्यातल्या त्यात तरुण-तरुणी बोलकी असेल तर मनात अगदी काहीच राहू शकत नाही. जवळच्या वाटणाऱ्या विश्वासार्ह मित्र-मैत्रिणाला आपले सगळे प्रॉब्लेम्स भडाभडा सांगितले जातात. परंतु जे संवेदनशील मनाचे असतात, इंट्रोव्हर्ट असतात त्यांची खरी अडचण होते. माझे प्रश्न, माझे प्रॉब्लेम्स समोरच्या व्यक्तीसमोर मांडले तर ती समोरची व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करेल? त्याचं माझ्याबाबतचं मत अगदीच बदलून जाईल. अशा विचाराने ते आतल्या आत कूढत बसतात. आई-बाबा, भाऊ-बहीण यांना काही सांगावं तर त्यांना उगीच टेन्शन येईल, असा विचार असतो. अशा परिस्थितीतून जात असताना शहराच्या गजबजलेल्या गर्दीतही आपल्याला एकटं वाटायला लागतं. सगळी मित्रमैत्रिणी आजूबाजूला असतांना आपण स्वत:ला यामध्ये एकटं समजायला लागतो.
अनिश गांधी हा असाच एक गावाकडचा तरुण. मुंबईत आला आणि गर्दीचा भाग झाला. ‘गावात तुलनेने नोकरीच्या संधी कमी असल्यानं गावाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी हा धाडसी निर्णय होता, कारण कुणी ओळखीचं या शहरात नव्हतं. पण मुंबईत आलो तेव्हा या गर्दीच्या लाटेसोबत केव्हा मिसळून गेलो कळलंसुद्धा नाही. शहरात नवीन आलो तेव्हा सगळे अनोळखी लोक. कोणाबरोबर बोलावं, तर मनात न्यूनगंड. त्यामुळे सहाजिकच मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एकटेपणाचे वारे वाहू लागायला सुरुवात होते..’ अनिश सांगतो.
शिक्षणासाठी पुण्यात राहणारी गौतमी औंधेकर म्हणते, ‘अनेकदा सवयीच्या परिघातून बाहेर पडण्याचा निर्णय आपला असतो. त्यामुळे हा एकटेपणा आपण स्वत:हूनच ओढवून घेतलेला असतो असं म्हणायला हरकत नाही. मोठय़ा शहरात घरच्यांना सोडून राहणं तितकं सोपं नसलं तरी त्याला इलाज नसतो. मन मोकळं करायला खरंच कोणीतरी पाहिजे, असं बऱ्याचदा वाटायला लागतं. पण कधी कधी स्वत:चा पुर्वानुभव किंवा मग दुसऱ्यांचा अनुभव ऐकून चटकन विश्वास ठेवणं अवघड होऊन बसतं.’ यावर इलाज म्हणजे न्यूनगंडावर मात करणे.
मानसोपचारतज्ज्ञ शुभांगी हिस्वनकर म्हणाल्या, ‘बऱ्याचदा अनेक विद्यार्थी छोटय़ा शहरातून मोठय़ा शहरात जातात तेव्हा भाषा, राहणीमान,विचार यामुळे त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. नवीन शहरात या गोष्टींमुळे त्यांना आपल्या भावना कोणासमोर व्यक्त कराव्या असा प्रश्न पडतो. तरुणाईला एकटेपणा जाणवू लागतो. यावर उपाय म्हणजे व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. नवीन शहरात आत्मविश्वासाने जगलं पाहिजे, जेणेकरूण आपल्यात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड निर्माण होणार नाही.’
या एकटेपणाचा परिणाम आपल्या करिअरवर पडायला सुरुवात होते. काही जण यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारतात. मात्र बहुतेक जण या एकटेपणाला आपला सोबती बनवून आपलं जीवन जगत असतात. त्यामुळे अशा एकटेपणाला घालवायचं असेल तर माणसाने समोरच्या व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. आपले प्रश्न आपल्या अडचणी जे आपली विचारपूस करतात, आपल्यावर विश्वास ठेवतात अशा लोकांसोबत शेअर केल्या पाहिजे. आई-बाबा, बहिण-भाऊ यांच्याशी अनेक अवघड विषयांवर मोकळपणाने चर्चा केली पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर नीट विचार करून याचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तरच हा गर्दीतला एकटेपणा आपली कायमची साथ सोडेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader