अभिषेक तेली

तरुणाईमधील सुप्त कलागुणांना वाव आणि कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणारी स्पर्धा म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेकडे पाहिले जाते. बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थी हे अभिनयासह लेखन, दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक गोष्टींची जबाबदारी स्वत: लीलया पेलत आहेत. कलात्मकतेला प्रयोगशीलतेची जोड देऊन तांत्रिकदृष्टय़ा एकांकिका सशक्त करण्यावर तरुणाई भर देते आहे. विद्यार्थी वेशभूषाकार मानसी पाटील सांगते, ‘आमची एकांकिका ही सत्य घटनेवर आधारित असून संहितेच्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अभ्यास तसेच निरीक्षण केले आणि त्यानंतरच वेशभूषा साकारण्यास सुरुवात केली. ही कथा ग्रामीण भागातील असल्यामुळे आम्ही तेथील सोयी-सुविधा आणि एकूण वातावरणाचा अभ्यास केला. काही चित्रपट पाहिले आणि युटय़ूबवर चित्रफिती पाहून निरीक्षण केले. सामाजिक माध्यमांवर जाऊन माहिती वाचली. घटनेसंबंधित वृत्तपत्रातील बातम्या वाचण्यासह, घटनेचे संदर्भ जाणून घेतले. त्या भागातील लोक कोणत्या पद्धतीचे कपडे परिधान करतात, त्यांची भाषा कशी आहे या महत्त्वपूर्ण बाबींचाही बारकाईने अभ्यास केला. प्रत्येक व्यक्तिरेखेचे चित्र रेखाटून वेशभूषा कशी होऊ शकते हे पाहण्यात आले आणि त्यानंतरच वेषभूषेचे काम हे पूर्णत्वास गेले’.

Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम
rebellion of jayashree patil three way contest in the sangli assembly constituency
सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

एकांकिकेच्या आशयामध्ये तसेच मांडणीमध्ये कसे वैविध्य आणता येईल, यासाठी लेखक – दिग्दर्शकांची जोडी ही एकमेकांशी सातत्याने चर्चा करत असते. तर एकांकिकेच्या आशयाला नेपथ्याच्या माध्यमातून कसे प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल, यावर नेपथ्यकार भर देत असतो. सध्याच्या घडीला संहितेला साजेसे नेपथ्य आणि एकांकिकेसाठी आवश्यक भव्यदिव्य ठिकाणे उभारण्याकडे कल वाढतो आहे. ‘तरुण रंगकर्मीचा नेपथ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा बदलत चालला आहे. परिणामी, तांत्रिकदृष्टय़ाही बदल घडत आहेत. नेपथ्य करताना फक्त एकांकिका पाहिली जाते, परंतु एकांकिकेचे नेपथ्य करताना संपूर्ण संहिता वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर नेपथ्यकाराच्या डोक्यात जे विचार येतात त्याबद्दल तो लेखक – दिग्दर्शकासोबत चर्चा करतो. एकांकिका क्षेत्र हे तांत्रिकदृष्टय़ा सशक्त होते आहे, पण विचारमंथन हे अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. अनेकदा रंगमंचावर संपूर्ण नेपथ्याचा वापर हा कमी झालेला पाहायला मिळतो. व्यावसायिक दर्जाचे नेपथ्य जरी उभारले तरी एकांकिकेचा आशय, विचार हा नेपथ्यातून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. सध्या एकांकिकांमध्ये संबंधित ठिकाण उभारण्याचा प्रयत्न केला जातो, पण संपूर्ण एकांकिका पाहिल्यानंतर कळते की कथेच्या अनुषंगाने नेपथ्यातील काही गोष्टींचा उपयोगच नव्हता. उदाहरणार्थ : झाडाशी निगडित प्रसंगामध्ये एक झाड उभारणे ठीक आहे, परंतु त्याठिकाणी अनावश्यक गोष्टी जोडल्यास झाडाचे महत्त्व कमी होते. एखादे ठिकाण संपूर्णरीत्या उभारण्याच्या प्रवाहात आशय पोहोचवण्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होत असते. नेपथ्यकार, लेखक – दिग्दर्शक, कलाकार यांच्यामध्ये सखोल संवाद झाल्यास एकांकिका ही निश्चितच तांत्रिकदृष्टय़ा सशक्त होते’, असे नेपथ्यकार सिद्धेश नांदलस्कर यांनी सांगितले.

मराठी रंगभूमीला संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी विद्यार्थिदशेतील तरुण रंगकर्मी हे संगीत एकांकिका करण्यावर भर देत आहेत.  प्रेक्षकांना सकस नाटय़ानुभव देण्यासाठी सशक्त तांत्रिक गोष्टींसह कथेच्या अनुषंगाने एकांकिकांमधील गाणी लिहून त्यांना संगीतबद्ध केले जाते आहे. विद्यार्थी संगीतकार सुजल गायकवाड याच्या मते, ‘सध्याच्या घडीला संगीत नाटकांची संख्या कमी होत असताना संगीत एकांकिका करणे, आमच्यासाठी आव्हानात्मक होते. एकांकिकेत आम्ही ध्वनिमुद्रित संगीताचा वापर न करता लाईव्ह संगीत सादर करीत आहोत. संगीत एकांकिका ही टीमवर्कनेच उभी राहते. आमच्या एकांकिकेतील गीतांचे लेखन, संगीत, गायन, वादन या सर्व जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांनीच सांभाळल्या आहेत. संहितेला साजेसे आणि काळाचा संदर्भ हा त्याच पद्धतीने सादर होईल, यादृष्टीने गीतलेखन आणि संगीत करण्यात आले. संबंधित काळातील गाणी व चालींचा अभ्यास करून संगीतात कशी सुधारणा करता येईल, याकडे लक्ष दिले. एकांकिकेसाठी ध्वनिमुद्रित संगीताचा वापर केल्यास प्रभावी परिणाम साधता येतात, पण तांत्रिक गडबड होण्याचीही शक्यता असते. तर लाइव्ह संगीताचा वापर केल्यास जागीच चुका सुधारता येतात, कलाकारांनाही संगीताशी पटकन जुळवून घेता येते’.

एकांकिका ही सशक्त करण्यासाठी  आशयाच्या अनुषंगाने लेखक, मांडणीच्या दृष्टीने दिग्दर्शक, अभिनयाच्या माध्यमातून कलाकार मेहनत घेत असतात. तर कलाकार व त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि व्यक्तिरेखा हुबेहूब काळानुरूप साकारण्यासाठी रंगभूषाकारही मेहनत घेत असतो. ‘एकांकिकेसाठी रंगभूषा साकारताना प्रथमत: संहितेचा अभ्यास केला आणि लेखक – दिग्दर्शकांसोबत चर्चाही केली. संहितेमधील व्यक्तिरेखांचे वय, व्यक्तिरेखांची शैली आणि त्यांच्या वास्तव्याचे ठिकाण, काळ या गोष्टींचाही अभ्यास केला. लहान वयाच्या व्यक्तिरेखांना अधिक निरागस कसे दाखवता येईल, यावर भर दिला. लेखकाला नेमकं काय म्हणायचे आहे, याचा अभ्यास केला आणि प्रत्येक व्यक्तिरेखा ही कागदावर रेखाटून पाहिल्यानंतरच रंगभूषा केली. आम्ही साधारण आणि भडक रंगभूषेचा योग्य समतोल राखला आहे. प्रकाशयोजनेचा प्रभाव पडल्यानंतर कलाकारांच्या चेहऱ्यावरील हावभाव प्रेक्षकांपर्यंत कसे स्पष्टपणे पोहोचतील, या गोष्टीचाही रंगभूषा करताना अभ्यास केला. नाटक हे अविरत चालणारे माध्यम असून जसजसे आम्ही एकांकिकांचे प्रयोग करीत जाऊ, तशा आम्हाला विविध गोष्टी कळतील आणि त्याप्रमाणे व्यक्तिरेखा या विकसित होऊन रंगभूषेत बदल होतील’, असे विद्यार्थी रंगभूषाकार जॉय भांबळ सांगतो.

यंदाच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत एकांकिकांचे निरनिराळे आशय ही प्रत्येक महाविद्यालयाची जमेची बाजू ठरली आहे. सभोवताली घडणाऱ्या विविध राजकीय, सामाजिक घटना, वैश्विक पातळीवरील घडामोडी, दैनंदिन जीवनातील घटना आणि काल्पनिक गोष्टींचे प्रतिबिंब हे एकांकिकांमध्ये उमटलेले पाहायला मिळते आहे. कथेच्या अनुषंगाने सखोल अभ्यास करून तांत्रिक गोष्टी सशक्त करण्यावर दिलेला भर यामुळे सादरीकरण लक्षवेधी ठरते आहे. त्यामुळे परीक्षण करताना परीक्षकांचाही चांगलाच कस लागतो आहे. प्राथमिक फेरी आणि काही विभागीय अंतिम फेरी या जवळपास संपत आल्या असून आता महाअंतिम फेरीत कोणते महाविद्यालय बाजी मारते आहे आणि कोणती एकांकिका ही ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ ठरते, याकडे नाटय़वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाटय़वर्तुळात चर्चेची ठरलेली आणि विद्यार्थिदशेतील तरुण रंगकर्मीच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी स्पर्धा म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेकडे पाहिले जाते. सध्या कसदार अभिनय आणि वैविध्यपूर्ण आशयाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्टय़ा एकांकिका सशक्त करण्यावर भर दिला जातो आहे. तरुणाईची विचारस्पंदने  एकांकिकेमध्ये उमटत असून दमदार आशयाला तितक्याच कसदार अभिनयासह वैशिष्टय़पूर्ण नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि संगीत आदी तंत्राची जोड देत सादरीकरणावर भर दिला जातो. 

आशयानुरूप तांत्रिक अंग बदलावी लागतात..

‘आजच्या काळातील पिढीकडे खूप वेगळे विचार असून त्या विचारांच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्टय़ा बदल करावे लागतात. तरुण पिढीच्या ऊर्जेला, विविधांगी कलाकौशल्यांवर आधारित सादरीकरणाशी जुळवून घ्यावे लागते. आशयानुरूप तांत्रिक अंग बदलावी लागतात. एकांकिकेमध्ये मर्यादित वेळ असतो, पण संहितेला अनुसरून मांडणी करणे आवश्यक आहे आणि संहितेला धरून प्रकाशयोजना किंवा इतर तांत्रिक गोष्टी केल्या नाहीत, तर एकांकिकेचा प्रभाव पडत नाही. एकांकिकांची तालीम पाहूनच पुढील नियोजन, प्रकाशयोजनेच्या दृष्टीने तयारी करावी लागते. ’ –  श्याम चव्हाण, प्रकाशयोजनाकार

मुख्य प्रायोजक 

’सॉफ्ट कॉर्नर

सहप्रायोजक

’झी टॉकीज

’भारती विद्यापीठ, पुणे</p>

’शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिग अ‍ॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट

पॉवर्ड बाय 

’केसरी टूर्स

’शिवामृत दूध उत्पादक सहकारी

संघ मर्या, विजयनगर-अकलूज, ता. माळशिरस जि. सोलापूर

’श्री नेमिनाथ ज्वेलर्स

’एन एल दालमिया इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च

साहाय्य

’अस्तित्व

टॅलेंट पार्टनर

’आयरिस प्रॉडक्शन