पर्वतश्रेणीत खडक खोदून तयार केलेली गुहागृहे वा प्रस्तरालये म्हणजे लेणी होय. नासिकजवळच्या पांडव लेण्यातील लेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ‘एतच लेण महादेवी महाराज मातामहाराज पतामही ददाति…’ लेण हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे. लेण्यांना गुहा, गुंफा, शैलगृहे, शिलामंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावेही आहेत. गुहांची ठिकाणे डोंगरकपारीत नैसर्गिकरीत्या तयार झालेली असतात किंवा मानवाने डोंगर खोदून ती तयार केलेली असतात. काही निवडक गुहास्थानांमधल्या खडकांच्या भिंतींवर आदिमानवाने चित्रे खोदून आपल्या उत्कृष्ट चित्रकलेचे नमुने मागे ठेवलेले आहेत.

लेण्यांमधील चित्रांतून किंवा तिथल्या कोरीवकामातून ज्या काळात या लेण्यांची निर्मिती झाली त्या काळातील राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक जीवनाचे चित्रण केलेले आढळून येते. आपल्या पूर्वजांचे राहणीमान समजून घेण्यासाठी तयार केलेले हे एखादे टाइम मशीनच आहे जणू… म्हणूनच लेण्यांना भेट देऊन आवर्जून भटकंती करावी असे मत, ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयातील इतिहास विभागाचे सहप्राध्यापक अंकुर काणे यांनी व्यक्त केले. ‘आजच्या युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही इतक्या भव्य आणि आखीव रेखीव लेण्या तयार करता येणार नाहीत. प्राचीन काळात संसाधने मर्यादित असताना आणि तंत्रज्ञान विकसित झालेले नसतानाही ज्यांनी या लेण्यांची निर्मिती केली त्यांच्या कार्यकुशलतेला आणि योजनाबद्धतेला सलाम करण्यासाठी म्हणून लेण्यांना जरूर भेट द्यावी. कलारसिकांसाठी लेण्यांमधील चित्रे आणि नक्षीकाम ही खरे तर मेजवानी असते. कागदावर चित्रे काढताना किंवा मातीच्या मूर्ती बनवताना एखादी चूक घडली तर ती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध असते, परंतु लेण्यांमध्ये असलेल्या सुंदर मूर्ती कोरताना केलेली एखादी चूक संपूर्ण लेण्याचे सौंदर्य बिघडवू शकते आणि त्यात दुरुस्तीही करता येत नाही. इथे खरोखर चुकीला माफी नाही. आपल्या कामात तरबेज असलेल्या अशा अनाम कलाकारांनी त्यांची निर्मिती केली आहे. त्यांच्या कलात्मक कौशल्याची अनुभूती घेण्यासाठी लेण्या बघायला जरूर जावे’, असे काणे सांगतात.

पर्यटकाने लेणी कशी पाहावी याविषयीचे मार्गदर्शन करताना प्रा.अंकुर काणे म्हणतात, ‘लेण्या पाहायला जाताना घाईगडबड न करता भरपूर वेळ काढून जावे आणि त्या कलाकृतीचा उत्तम रसास्वाद घ्यावा. ज्या भागातील लेण्या आपण पाहायला जाणार आहोत, त्या भागाचा इतिहास थोडा तरी वाचून जावे. लेण्यांवर अनेक मोठ्या अभ्यासकांनी उत्तम पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा अभ्यास केलेला असेल तरच त्यातील सुंदर शिल्पाकृती आणि चित्रांचा अर्थ तुम्हाला समजेल. असा अभ्यास करून जाणे शक्य नसेल तर सरळ वारसा स्थळांच्या सहली आयोजित करणाऱ्या मंडळींबरोबर जावे.’ लेण्यांमधील कलाकृतींचे अवशेषच अनेक ठिकाणी पाहायला मिळतात, याकडे लक्ष वेधत त्यांचा शोध कसा घ्यावा याचीही सविस्तर माहिती त्यांनी दिली. ‘अजिंठा येथील चित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. कोरून तयार केलेल्या खडबडीत भिंतीवर भाताचे तूस, शेण, माती आदी कालवून त्याचे लेपन केले जात असे. त्यावर चुन्याचा लेप देऊन मग नैसर्गिक रंग वापरून चित्रकाम केले जात असे. कान्हेरी व वेरुळ येथे आपल्याला काही रेखाचित्रे काढलेली दिसतात. त्यात रंग भरण्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे चित्रकलेची प्रक्रिया आपल्याला कळते. त्यामुळे अशा लेणी पाहण्यासाठी गेल्यावर कुठे चित्रकलेचे अवशेष दिसतात का याचा जरूर शोध घ्यावा. आडवाटेवरच्या लेण्या पाहायला जाताना स्थानिक लोकांची मदत घ्यावी. अनेक लेण्यांमध्ये मधमाशांची पोळी किंवा आतल्या बाजूला वटवाघळे असतात. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्यावी’, असा सल्लाही प्रा. अंकुर यांनी दिला.

लेण्यांमध्ये अनेक शिलालेख कोरलेले आढळून येतात. तत्कालीन भाषा आणि लिपी, त्यांचा विकास आणि त्यात होणारे बदल आणि या प्राचीन भाषांचा आजच्या मराठी भाषेशी असलेला संबंध समजून घेणे अतिशय रोचक आहे, असे मत ‘दुर्गवाटा’ या संस्थेच्या अथर्व बेडेकरने व्यक्त केले. ‘ध्यानधारणा, चिंतन आणि मनन यासाठी शांतता उपलब्ध होईल आणि मनुष्य वस्तीपासून फार दूरही असणार नाही अशा ठिकाणी लेण्यांची निर्मिती झालेली दिसते. आजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निवांत मिळून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी या लेण्यांपेक्षा समर्पक जागा शोधून देखील मिळणार नाही. अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे आणि कान्हेरी यासारख्या काही पर्यटकांनी गजबजलेल्या लेण्या सोडल्या, तर आडवाटेवरच्या लेण्यांमधे अशी शांतता आपल्याला सहज मिळू शकते’, असं अथर्व सांगतो.

लेणी उत्खनित करण्याच्या तंत्राची माहिती महाराष्ट्रातील वेरुळ आणि मध्य प्रदेशातील बाघ येथील लेण्यांच्या अभ्यासावरून समजून येते. प्रथम प्रस्तरांचा एकेक भाग छिन्नीने तासल्यासारखा करून घेत. पुढे तो भाग आजूबाजूंच्या प्रस्तरापासून वेगळा करण्यात येई व त्यातून मंदिर कोरले जात असे. भारतातील प्राचीन मंदिरे व चैत्यगृहे लाकडाची बनविलेली असत. त्यांचे अनुकरण सुरुवातीच्या लेण्यांमध्ये केलेले आढळून येते. सांप्रत हिंदू मंदिरातील गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व प्रदक्षिणापथ हळूहळू कसे उत्क्रांत होत गेले, हे समजण्यासाठी बौद्ध लेण्यांशिवाय अन्य साधन नाही. स्थापत्याप्रमाणे शिल्पकला व चित्रकला हीसुद्धा कशी उत्क्रांत झाली, हे या लेण्यांतील शिल्पांवरून व चित्रांवरून समजते. या शिल्प-चित्रांमध्ये वस्त्रप्रावरणांचे, अलंकारांचे व केशरचनेचे बहुविध नमुने दृग्गोचर होतात. कालमानानुसार पेहरावात कसे बदल घडले, इत्यादींची कल्पना यांतील शिल्पचित्रादींतून स्पष्ट जाणवते. महाराष्ट्रातील स्त्रिया कोणती शीरोभूषणे, अलंकार व वस्त्रे वापरीत असत, यांविषयी तपशीलवार माहिती त्यांतून मिळते.

या लेण्यांवरून व त्यांतील लेखांवरून भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर प्रकाश पडतो. लेण्यांतील अनेक लेखांत तत्कालीन राजे व त्यांची कारकीर्द यांचे उल्लेख आहेत. त्यावरून राजकीय घडामोडी आणि तत्कालीन आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. पुराणांतून गौतमीपुत्र पुळुमावी, यज्ञश्री सातकर्णी यांची नावे ज्ञात झाली आहेत, पण नहपान, ऋषभदत्त वगैरे क्षत्रपांची व त्यांच्या कुटुंबीयांची नावे लेण्यांतील लेखांद्वारेच ज्ञात झाली. या लेण्यांवरून महाराष्ट्रातील बौद्ध धर्मप्रसाराची कल्पना येते. लेण्यांतील लेखांत अनेक धंद्यांचा व त्यांच्या श्रेणींचा उल्लेख येतो. ह्या लेण्यांवरून प्राचीन काळी भारतात स्थापत्याची उत्क्रांती कशी होत गेली, हे समजते. इतिहास, धर्म, समाज असा विविधांगी अभ्यासाचा रंजक खजिना असलेली ही लेणी म्हणूनच अधिक डोळसपणे अनुभवण्यात खरी गंमत आहे.

viva@expressindia.com