वेदवती चिपळूणकर परांजपे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्षांतून दोन वेळा होणारा फॅशनचा ग्लॅमरस सोहळा म्हणजे लॅक्मे फॅशन वीक. या वर्षीचा समर सीझनचा लॅक्मे फॅशन वीक १४ मार्च ते १९ मार्च २०२४ दरम्यान मुंबईच्या जिओ वल्र्ड गार्डनला आयोजित केला गेला. लॅक्मे फॅशन वीक ही सर्व बॉलीवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटींना पाहण्याची जणू सुवर्णसंधीच असते. ओळखीच्या, आवडीच्या, नेहमीच्या डिझायनर्सचे शो पाहायला तर सेलिब्रिटी रेड कार्पेटवर हजेरी लावतातच, मात्र अनेक मोठय़ा डिझाइनर्ससाठी अनेक सेलिब्रिटी रॅम्प वॉकसुद्धा करतात. सेलिब्रिटी शो-स्टॉपर असण्याची चढाओढ कोणत्याही फॅशन शोजमध्ये नेहमीच पाहायला मिळते. सेलिब्रिटी शो-स्टॉपरने प्रेझेंट केलेली डिझाइन्स ही लगेच ट्रेण्ड होतात आणि सगळय़ा सोशल मीडियावर चर्चेचा हॉट टॉपिक बनतात. या वर्षीच्या लॅक्मे फॅशन वीकलासुद्धा अनेक सेलिब्रिटी वेगवेगळय़ा डिझाइनर्ससाठी रॅम्पवर आले.

या वेळच्या सेलिब्रिटी शो-स्टॉपर्सनी परिधान केलेल्या डिझाइन्समध्ये महत्त्वाचा समान धागा दिसून आला तो म्हणजे प्रामुख्याने काळा किंवा गडद रंग! बहुतेक सेलिब्रिटींनी समर कलेक्शन असूनसुद्धा काळय़ा रंगाची डिझाइन्स प्रेझेंट केली. अनन्या पांडेने लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये राहुल मिश्रासाठी काळय़ा रंगाचा बॉडीफिट स्कल्प्ट ड्रेस घातला होता. शहनाज गिलने दीक्षा खन्नासाठी डेनिम ब्लू रंगाचा धोती वन पीस घातला होता, ज्यावर डेनिमचं लॉन्ग जॅकेट पेअर केलं होतं. माधुरी दीक्षितने राणा गिलसाठी ब्लॅक सूट प्रेझेंट केला ज्यावर फ्लोरल पेंट आणि सिक्वेन्स आहे. फातिमा सना शेखने जांभळा एम्ब्रॉयडरीचा घागरा-चोली, सारा अली खानने पेस्टल ग्रीन रंगाचा लेहंगा आणि श्रुती हसनने पेस्टल ग्रे रंगाचा लेहंगा घातला होता. तापसी पन्नू, रकुल प्रीत सिंग, दिव्या खोसला, नेहा धुपिया, कोंकणा सेन, दिया मिर्झा, करिश्मा तन्ना, तृप्ती डिमरी यांनी ब्लॅक अँड व्हाइटमध्ये डिझाइन्स वेअर करून रॅम्प वॉक केला. जान्हवी कपूरने वेल्वेट रेड रंगाचं सिक्वेन्स असलेलं डिझाइन प्रेझेंट केलं. 

केवळ सेलेब्रिटी हिरॉइन्स नव्हे तर आदित्य रॉय कपूरनेदेखील शो-स्टॉपर म्हणून कल्की या लेबलसाठी रॅम्प वॉक केलं. शनाया कपूर आणि मीरा कपूर यांनी व्हाइट शॉर्ट ड्रेस आणि व्हाइट टॉपमध्ये अनामिका खन्नासाठी रॅम्प वॉक केला. कल्की कोचलिनने गोल्डन आणि सिल्व्हर धोती ड्रेसमध्ये आइकेयाह या लेबलसाठी वॉक केला. क्रिती सनॉनने स्केचर्सच्या स्ट्रीटवेअर कलेक्शन ‘रेट्रोव्हर्स’साठी शॉर्ट स्पोर्ट्स ड्रेस घालून वॉक केला. थोडक्यात, नेहमीप्रमाणे या वर्षीसुद्धा लॅक्मे फॅशन वीक सेलिब्रिटी शो-स्टॉपर्सच्या वॉकने झगमगून गेला होता.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta viva a glamorous celebration of fashion lakme fashion week geo world garden amy