वैष्णवी वैद्य मराठे
२०२३ च्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. वर्षांचा शेवटचा महिना हा भटकंतीचा महिना असतो. सुट्टय़ा भरपूर मिळतात आणि वेगवगेळय़ा ठिकाणी फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करता येते. भारतात आणि महाराष्ट्रातही अशी अनेक ठिकाणे, प्रांत, राज्य आहेत जिथे थंडीतल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेता येऊ शकतो. योगायोगाने यावेळी नाताळ आणि ३१ डिसेंबर दोन्ही वेळेस वीकएंड असल्याने लोकांची जय्यत तयारी एव्हाना सुरू झाली असेल. हळूहळू सर्वत्र थंडीची चाहूल लागते आहे, त्यामुळे फिरण्यासाठी पोषक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.
तुम्ही अजून सुट्टीतील भटकंतीचं प्लॅनिंग करत असाल तर यातली काही ऑफबीट ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा.
गुजरात
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या गुजरात राज्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक स्थळे आणि वैविध्यपूर्ण लँडस्केपसह सजलेले गुजरात पाहण्यासाठी किमान ३ ते ८ दिवसांचे नियोजन करणे गरजेचे आहे. अहमदाबाद, वडोदरा, द्वारका, रण ऑफ कच्छ अशा अनेक जागा गुजरातमध्ये फिरण्यासारख्या आहेत. इथे तुम्हाला निसर्गरम्य जागांपासून सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, अक्षरधाम आश्रम, सयाजी बागसारखी ऐतिहासिक मंदिरं आणि अनेक प्रकारच्या जागा एक्सप्लोर करायला वाव मिळतो. वर्षांच्या कोणत्याही महिन्यात गुजरातच्या इतर भागांत फिरू शकता, परंतु कच्छला भेट देण्यासाठी डिसेंबर महिन्यापेक्षा कोणताही चांगला महिना नाही. या काळात तीन महिने चालणारा रण उत्सव आकर्षणाचा भाग आहे. तुम्हाला फक्त रण उत्सवाला जायचे असेल तर आता तसेही पॅकेज मिळते. अॅडव्हेंचर आणि ट्रेकिंग प्रकार हवे असतील तर गीर नॅशनल पार्क हासुद्धा उत्तम पर्याय आहे. पाटणमध्ये तुम्ही पटोला साडीचे विणकाम केंद्रही पाहू शकता.
राजस्थान
राजस्थान हा वाळवंटी भाग असल्याने थंडी हा तिथे फिरण्याचा सर्वोत्तम मोसम आहे. इतर वेळी तिथले तापमान आपल्याला सहन होऊ शकत नाही. कमीत कमी ६ ते ८ दिवसांची योजना आखून तुम्ही इथे फिरायला जाऊ शकता. जयपूरमध्ये २ दिवस, जैसलमेरमध्ये २ दिवस, जोधपूरमध्ये १ दिवस आणि उदयपूरमध्ये १ दिवस अशी ही ट्रीप होऊ शकते. राजस्थानला जाण्यासाठी आता डायरेक्ट फ्लाइट असल्याने प्रवासाचा वेळही वाचतो. तिथलं स्थानिक जीवन, खाद्य, सगळं अनुभवण्यासारखे आहे. तसेच तरुणांना फॅशन आणि स्टाइल शॉिपगची मेजवानी इथे मिळते. इथे फार निसर्गरम्य किंवा साहसी जागा नाहीत, तर महाल, किल्ले, मंदिरं जास्त आहेत. उदयपूरला बऱ्यापैकी सुंदर जागा पाहायला मिळतील. जयपूर, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, पुष्कर, उदयपूर, रणथंबोर नॅशनल पार्क या जागा आणि तिथले विविध पॉइंट्स न चुकविण्यासारखे आहेत. तिथले एकमेव सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणजे माउंट आबू जिथे थंडीतच जायला मज्जा येते.
नॉर्थ-ईस्ट
डिसेंबरमध्ये भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागात प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव असू शकतो. भारताचा हा प्रदेश देशाचा एक वैविध्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध भाग आहे, ज्यामध्ये आठ राज्ये आहेत. भौगोलिक निसर्गसंपत्ती डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगले आणि असंख्य नद्यांद्वारे वैशिष्टय़ीकृत आणि परिपूर्ण असा हा प्रदेश आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड या सगळय़ा परिसरांमध्ये निसर्गाची एक वेगळी कृपादृष्टी आहे. इथे वेळ काढून किमान ८ दिवसांसाठी तरी जाणे करावे, जेणेकरून निसर्गाचे सौंदर्य म्हणजे काय ते कळेल. हा प्रदेश त्याच्या सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो, प्रत्येक राज्याची स्वत:ची वेगळी परंपरा, भाषा आणि सण आहेत. पावसाळा सोडून इतर मौसमात इथे जाऊ शकता. पावसाळय़ात इथले वातावरण जरा धोक्याचे असते. इथले वैशिष्टय़पूर्ण पदार्थ आणि खाद्यसंस्कृती सध्या फार आकर्षणाचा मुद्दा झाली आहे. व्लॉगर्ससाठी नॉर्थ-ईस्ट म्हणजे पर्वणी आहे.
दक्षिण भारत
दक्षिण भारतातही विविध प्रकारचे निसर्गसौंदर्य पाहायला मिळते. विशेषत: समुद्रकिनारपट्टी आणि जैवविविधता याचे इथे अनोखे आकर्षण आहे. डिसेंबरमध्ये दक्षिण भारतातील हवामान सामान्यत: आल्हाददायक असते, त्यामुळे दक्षिणी प्रदेश एक्सप्लोर करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. दक्षिण भारतात ऊटी, मैसूर, पाँडिचेरी, कूर्ग, मदुराई, कन्याकुमारी हे सगळंच फार सुंदर आणि बघण्यासारखं आहे. विशेषत: समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी ही सगळीच ठिकाणं उत्तम आहेत. नॉर्थ-ईस्टसारखी आता इथल्या ठिकाणांनाही तरुण व्लॉगर्सची पसंती मिळताना दिसते. हंपी, पाँडिचेरी, अंदमान निकोबार ही ठिकाणं एक पूर्णपणे स्वतंत्र ट्रीप काढण्यासारखी ठिकाणं आहेत. इथे फ्रेंच आणि पोर्तुगीज संस्कृती प्रामुख्याने पाहायला मिळते. आपल्या आवडीप्रमाणे डेस्टिनेशन तुम्ही निवडू शकता.
थंडीत फिरताना काय काळजी घ्याल:
अॅडव्हान्स बुकिंग : थंडीचा मौसम हा फिरण्यासाठी सर्वोत्तम असतो, त्यामुळे प्रवासाचे आणि राहण्याच्या खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे. आगाऊ बुकिंग करून ठेवले तर खर्च वाचू शकतो. तसेच तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ट्रीप होऊ शकते.
हवामाचा अंदाज घ्या : प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सगळय़ा स्थानकांच्या हवामानाची चौकशी करा. आताशा सगळेच विमानप्रवास करत असल्याने सगळी माहिती मिळते, पण तरीही आपण सजग असणे गरजेचे आहे.
गरम कपडे सोबत घ्या : थंडीचे वातावरण जितके प्रसन्न वाटते तितकेच आपल्याला बाधू शकते. तसेच वेगवेगळय़ा प्रांतात थंडीचे तापमान कमी जास्त असते. दक्षिणेकडील वातारण सौम्य असते तर उत्तरेकडे अतिथंड असते, त्यामुळे स्वेटर, सॉक्स, स्कार्फ, कानटोप्या, बूट, हातमोजे, थर्मल्स, हवी तशी अंथरूणे अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्याकडे असणे फार गरजेचे आहे. आजकाल हॉटेल्समध्ये हीटरची सोय असते तरीही आपण स्वत:ची काळजी घ्यावी.
त्वचेची काळजी घ्या : उन्हाळय़ापेक्षाही थंडीचा त्वचेवर जास्त परिणाम होतो. कोरडय़ा त्वचेचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मॉश्चरायझर, लीप बाम, सनस्क्रीन, हे तुमच्याजवळ असणे आणि तुम्ही वापरणे गरजेचे आहे.
आपत्कालीन पुरवठा ठेवा : प्रथमोपचार किट, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी आणि स्नॅक्स यांसारख्या आवश्यक गोष्टी सोबत ठेवा. तुम्ही दुर्गम भागात प्रवास करत असल्यास, काही मूलभूत साधने आणि आणीबाणीच्या परिस्थितीत गरजेच्या गोष्टी असणे शहाणपणाचे आहे.
उत्तरेकडे अजून काश्मीर, हिमाचल, चंदीगड, उत्तराखंड, दक्षिण भागात गोवा, केरळ, आपल्या महाराष्ट्रात तर अख्खा कोकण आणि रायगड भाग, कोल्हापूर ही सगळीच ठिकाणं तरुणांच्या हॉट लिस्टमध्ये आहेत. पण वरची ऑफबीट लोकेशन नक्की यावेळी फिरून पाहा. या जागा नेहमीच्या बकेट लिस्टमध्ये नसल्या तरी पाहण्यासारख्या आहेत आणि सध्याच्या सीझनमध्ये अगदी मस्ट-व्हिजिट आहेत.
viva@expressindia.com