वैष्णवी वैद्य मराठे

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या दिवसापासून भारताने संविधानाचा स्वीकार केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान तयार होणं हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. स्वातंत्र्य देशात रुजलं आणि रुळलं. भारतात समृद्ध समाज आणि समुदायाचा उगम होत गेला तसं लोकांनी आपापल्या पद्धतीने स्वातंत्र्य स्वीकारलं आणि आत्मसात केलं. त्यातलाच एक तरुणाईच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य!

constitution of india special provisions for Maharashtra Gujarat
संविधानभान : महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
article 370 jammu and kashmir
संविधानभान : पूल, भिंत की बोगदा?
Thane, Chitrarath, Constitution, New Year Swagat Yatra,
ठाणे : यंदाच्या नववर्षे स्वागत यात्रेत ‘संविधान’ विषयावर चित्ररथ
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
issue of Kashmir
संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा

आर्थिक स्वातंत्र्य हा एकमेव मुद्दा आहे जो त्याच्या समीकरणांसकट प्रत्येक पिढीसोबत बदलतोय. नवीन वर्षांची पायाभरणी आता बऱ्यापैकी झाली आहे. तरुण पिढीची जीवनशैली बघता आर्थिक स्वातंत्र्य व त्याचे फायदे – तोटे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याबद्दल घेतलेला हा आढावा. पैसे कमावणं हे समीकरणच सध्या बदललेलं आहे. ते म्हटलं तर सोप्पं आणि म्हटलं तर अवघड असंही आहे. फक्त आधीच्या आणि आत्ताच्या पिढीत फरक एवढाच की पैसे कमावण्याचा ध्यास आजच्या पिढीमध्ये पराकोटीच्या प्रमाणात पाहायला मिळतो. आयटी आणि प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय केल्याने आजच्या पिढीचं वार्षिक उत्पन्न लाखांच्याच घरात असतं. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत होणाऱ्या खर्चाची बाजू लक्षात घेतली तर या ध्यासाला, अर्थसंचयाच्या शिस्तीची जोड मिळणं फार महत्त्वाचं ठरू लागलं आहे.

आपल्या पैशाचा वापर कसा करावा, निवेश कसा करावा या गोष्टी सर्व युवांसाठी  महत्त्वाच्या आहेत. सध्या तरुणांना जे आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पैसे कमावणं आणि त्याचा योग्य तो विनियोग, बचत करण्यासाठी विशेष प्रयत्न तरुणाईकडून होताना दिसतो. मात्र ज्यांना धाडसी गुंतवणूक करण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही आहे, ज्यांना ज्ञान आहे त्यांचा कल शेअर मार्केट आणि म्युचुअल फंड्सकडे अधिक आहे. गोल्ड बॉण्ड्स ही अतिशय सुयोग्य सरकारी योजना असल्याचं सांगत बऱ्याच तरुणांनी त्यात गुंतवणूक केल्याचं पाहायला मिळतं. पारंपरिक सोन्याच्या भिशीपेक्षा ही जास्त फायद्याची आहे, असं या तरुणाईचं म्हणणं आहे. या दोन्हीच्या जोडीलाच तरुणांची आधुनिक गुंतवणूक म्हणजे एसआयपी. या सगळय़ा नवीन माध्यमांची व्याख्या अशी की तुम्हाला जर दीर्घकालीन आणि अति धाडसाची पद्धत अजमवायची असेल तर या २-३ पद्धती महत्त्वाच्या आहेत. तुमच्याकडे असलेल्या वार्षिक उत्पन्नापैकी, या पद्धतींमध्ये थोडी तरी गुंतवणूक व्हायला हवी. जेणेकरून ती आपल्या सेवानिवृत्तीची पुंजी ठरेल, असं त्यांचं म्हणणं आहे. 

आर्थिक स्वातंत्र्य आणि पैसे कमावणं यातला अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या पिढीकडे पैसे कमावण्याची भरपूर वेगवेगळी साधनं आहेत. पूर्वी आपण जे शिक्षण घेतलंय त्याआधारे उपलब्ध नोकरी-व्यवसायाचे पर्याय निवडणं, त्यातून येणारं उत्पन्न, पुढे पगारवाढ व त्यातूनच उदरनिर्वाह व्हायचा. पण आज मुळातच मिळणारं उत्पन्न भरपूर असतं आणि प्राथमिक नोकरीव्यतिरिक्तही तुम्ही अनेक पर्याय अवलंबू शकता. आज असे फार कमी तरुण असतील जे फक्त नोकरी करतायेत, त्यांचं समांतर असं आर्थिक उत्पन्नाचे वेगळे पर्याय अजमावून पाहणं सुरू असतं. जेवढं जास्त उत्पन्न, तेवढा जास्त कर हा नियम ओघाओघात आलाच! परंतु पुन्हा तेच की नवनवीन माध्यमांमुळे त्यातले पैलू आणि पळवाटा इतक्या आहेत की कर कसा कमी करायचा यासाठीही वेगवेगळे पर्याय मिळू शकतात.

अजून एक जमेची बाजू म्हणजे आज आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने आयुष्य जगू शकतोय. मनासारखी गाडी घेणं, घर घेणं, हवं तिथे फिरायला जाणं, खरेदी करणं या सगळय़ा गोष्टी करायला आपल्या आधीच्या पिढीला खूप वेळ लागला. पण सध्याच्या पिढीला हे सगळं अगदी पहिल्या पगारापासूनच करता येतं.  आधी म्हटलं तसं ज्यांना धाडस करणं शक्य आहे ते तशा पद्धतीची गुंतवणूक करतात, पण आजच्या पिढीतसुद्धा काही तरुण असे आहेत ज्यांना आधुनिक पद्धतींची फार माहिती नाही, पैशाची जोखीम हाती घेण्याची इच्छा नाही, पण गुंतवणूक करणं तेवढंच महत्त्वाचंही वाटतं. मग ते एफ.डी, आर.डी, पीपीएफ अशा आपल्या जुन्या पद्धतीत समाधानी असतात. आपली जुनी पिढी ही पैसे कमावणं आणि त्याचं नियोजन करणं याबाबतीत आपल्यापेक्षा नक्कीच चार पावलं पुढे होती, त्यामुळे त्यांच्या पद्धती डोळे झाकून आत्मसात करता येऊ शकतात असंही मानणाऱ्या युवांची संख्या मोठी आहे. 

सध्याच्या पिढीचा आर्थिक स्वातंत्र्यामुळे झालेला एक मोठा तोटा नक्कीच जाणवतो तो म्हणजे जीवनशैलीत अवाजवी सुधारणा करणं! ते वाईट नक्कीच नाही, पण ते करण्याचा जो अट्टहासी ध्यास आहे तो नक्कीच घातक ठरू शकतो. मित्र-मैत्रिणींनी आयफोन घेतला, मर्सिडीझ घेतली म्हणून मलाही हवीच हा विचार चुकीचा असू शकतो. कारण एकदा तुम्ही एक जीवनशैली आत्मसात केलीत की तिथून पुन्हा खालच्या पायरीवर येणं अवघड होऊन बसतं आणि तो समतोल टिकवून ठेवणं कालांतराने कठीण जाऊ शकतं.

आर्थिक स्वैराचार होण्यामागे एक मोठं कारण म्हणजे पैशाच्या होणाऱ्या डिजिटल ट्रान्झ्ॉक्शन्स! ती सुविधा किंवा सुखसोय जी दिली आहे त्याचा वापर कसा आणि किती करायचा यावर आपलं नियोजन हवंचं. झिरो कॉस्ट ईएमआय, बाय नाऊ पे लेटर अशा सुविधांमुळे आपण हातात न आलेल्या पैशावरही कर्ज घेऊन ठेवलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आपला जो खर्चच नसतो तो आपण यामुळे ओढवून घेतो. त्याला थोडय़ा अभ्यासपूर्ण भाषेत आवेगपूर्ण खरेदी म्हणता येईल.

केवळ पैसे साठवणं पुरणार नाही, तर पैसे वाढवणं आजच्या पिढीची गरज आहे. स्पष्टच सांगायचं तर आजच्या जीवनशैलीमुळे आणि प्रायव्हेट क्षेत्रातल्या नोकऱ्यांमुळे फार किरकोळ तरुणवर्ग उरला आहे ज्यांना पेन्शनची सुविधा असणार आहे. त्यामुळे आपण आताच जे साठवू तेच आपलं भविष्याचं साधन असणार आहे. स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारात होऊ द्यायचं नसेल तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो फार दुर्लक्षित राहतो तो म्हणजे आपत्कालीन निधी! आपल्या धावत्या आणि सतत बदलत्या जीवनशैलीमुळे असा निधी आपल्याला कधीही लागू शकण्याची दाट शक्यता असते. पूर्वीच्या पिढीचा अजून एक धडा जो आपण गांभीर्याने घ्यायला हवा तो म्हणजे पैशाचं सोंग आणणं शक्य नाही!ह्ण थोडीफार लक्षणीय रक्कम या निधीमध्ये आपल्यापाशी असायलाच हवी.

आपल्या गरजा आणि इच्छा यातला फरक ओळखून पैशाचं नियोजन करणं हे तरुण पिढीसाठी सध्या फार महत्त्वाचं आहे.

पैसा म्हणजे काय हे साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे – आपल्या गरजा भागवण्याचं साधन. मग या गरजा कशा, किती ठेवायच्या, त्या खरंच गरजा आहेत की इच्छा, स्वप्न, आकांक्षा? यातला समतोल साधणं बहुतेक तरुणांना कठीण जातंय आणि त्यातूनच आर्थिक स्वातंत्र्याचे तोटे उद्भवतात. सामाजिक तसंच सार्वजनिक जीवनात सजगरीत्या वावरायचं असेल तर संविधान जसं योग्य मार्गदर्शन करतं तसंच हा लेखप्रपंच तरुणांना अर्थसाक्षर वगैरे करण्याचा नसून फक्त थोडी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि असलेल्यांना ती वाढवण्यासाठी आहे. या प्रजासकत्ताक दिन्याच्या मुहूर्तावर सगळय़ांनीच आर्थिक स्वातंत्र्याचा स्वैराचार न होण्याचा संकल्प करूया.

Story img Loader