अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे. पौष महिन्यात येणारा हा सण म्हणजे सूर्याचा उत्सव मानला जातो, कारण या दिवसांमध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करतो; म्हणून मकर संक्रांत हे नाव. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो व आपली पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजे वर जाते. यालाच उत्तरायण असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होतो. सध्या वातावरण बदलांमुळे थंडी कमी-जास्त प्रमाणात असते, परंतु पूर्वीच्या काळी मकर-संक्रांतीचा दिवस हा सगळ्यात थंड दिवस असायचा ज्यामुळे काळे कपडे घालण्याची पद्धत लोकांनी अवलंबवली, कारण काळा रंग थंडीचा प्रतिकार करतो.

असे मानले जाते की मकर संक्रांती हा सूर्याच्या मकर राशीतील संक्रमणाचा पहिला दिवस असतो. या सणापासून दिवस तीळ तीळ मोठा होतो. मकर संक्रांती हा एकमेव भारतीय सण आहे, जो सौर चक्रानुसार साजरा केला जातो, तर बहुतेक सण हिंदू कॅलेंडरच्या चंद्र चक्रांचे पालन करतात. म्हणून, संक्रांत जवळजवळ नेहमी दरवर्षी त्याच तारखेला येते, कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारीला हा सण साजरा केला जातो. भारताची संस्कृती इतकी संपन्न आहे की हा सण भारताच्या विविध भागांमध्ये फार सुंदर पद्धतीने साजरा केला जातो. भोगी, पोंगल, लोहरी, माघी अशा अनेक नावांनी हा सण ओळखला जातो. बहुप्रचलित प्रथा ज्याची सुरुवात झाली गुजरात राज्यापासून… पण आता जी मकर संक्रांतीला भारतभर उत्साहात पाळली जाते ती म्हणजे पतंग उडवणं. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या भागांत पतंगबाजी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवसानंतर शेतातली कापणी संपते, या दिवसानंतर थंडीसुद्धा कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होऊ लागतो. सूर्यदेवाचे स्वागत करण्याची ही पद्धत असते, ती म्हणजे सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात पतंगबाजी करणे.

nisargalipi A sign of arrival of spring season
निसर्गलिपी : वसंतागमनाची चाहूल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
egg freezing rising
ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या सीईओ करिश्मा मेहतांनी गोठवलं बीजांड ; तरुणींमध्ये ‘Egg Freezing’ची लोकप्रियता का वाढत आहे?
Man Uses Washing Machine For Drying Wheat Desi Jugaad funny Video Goes Viral on social media
पुणे-मुंबईतल्या महिलांचं टेंशनच गेलं; ओले गहू सुकवण्यासाठी तरुणानं शोधला जबरदस्त जुगाड, VIDEO एकदा पाहाच
Dog Winter Clothes
तुमच्या पाळीव प्राण्याला थंडीचा सामना करण्यासाठी स्वेटर घालणे गरजेचे आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Shocking video Sheep Killed A Leopard On Snow Mountain Animal Video goes Viral on social media
शिकारीच झाला शिकार! मेंढीनं केली खतरनाक बिबट्याची शिकार, मरता मरता ५ सेकंदात फिरवला गेम; Video पाहून अंगावर येईल काटा

भारतीय उपखंडाच्या वायव्येकडचा हा भाग निसर्ग आणि सांस्कृतिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. मकर संक्रांतीच्या दरम्यान तिथे आणखी जिवंतपणा येतो. जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर येथे राजस्थानी सुंदर बैठ्या घरांमध्ये सगळेच लोक आपापल्या घरातील गच्चीवर जाऊन रंगीबेरंगी पतंग उडवत पतंगबाजीचा आनंद घेत असतात. हजारो रंगीबेरंगी पतंगांनी सकाळचे व्यापलेले आकाश नजरेत भरून घ्यावेसे वाटते. तिथेही तीळ आणि गुळापासून बनवलेले गोड़ पदार्थ खाल्ले जातात ज्याला ‘पिन्नी’ असे म्हणतात, हा लाडूसाठी वापरला जाणारा पंजाबी शब्दप्रयोग आहे. यासोबतच डाळींची खिचडी तिथे फार मोठ्या प्रमाणात या दिवसांत खाल्ली जाते, कारण तिथे थंडीचा पारा महाराष्ट्रापेक्षा भरपूर जास्त असतो.

पतंगबाजी करण्यात कोणाचाच हात न धरू शकणारे राज्य म्हणजे मुख्यत: गुजरात. गुजरातमधल्या अहमदाबाद येथे सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय पतंग उत्सव होतो जो ७ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत म्हणजे आठवडाभर सुरू असतो. हा भारतातील सर्वात प्रसिद्ध पतंगोत्सव आहे. पतंगबाजीच्या स्पर्धेसाठी जगभरातून लोक अहमदाबादमध्ये येतात. इथे फक्त घरांच्या छतावरचे पतंग दिसत नाहीत, तर महाकाय बॅनर पतंग, उडणारे ड्रॅगन पतंग, रोक्काकू फायटर पतंग, असे आणखी नावीन्यपूर्ण पतंग दिसून येतात. इथे भला मोठा पतंग बाजार भरतो आणि तो या आठवड्यात २४ तास सुरू असतो. पतंगांच्या या राजधानीत पतंग विक्रीच्या स्टॉल्सच्या रांगा लागलेल्या असतात.

या उत्सवात पहाटे पाच वाजता पतंगबाजी सुरू होते आणि मध्यरात्रीपर्यंत चालते. गुजरात भागात मकर संक्रांतीला महाराष्ट्राप्रमाणे उंधियो आणि तिळगुळाची वडी, लाडू असे पदार्थ केले जातात.

पतंग उत्साव बहुतांश प्रमाणात पूर्वेकडे आणि उत्तरेकडे साजरा केला जातो, दक्षिण आणि इतर भागातही हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो आणि अतिशय अनोख्या प्रथा साजऱ्या केल्या जातात; त्या जाणून घेणे फार छान अनुभव असतो, चला जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या वेगवेगळ्या प्रथा:

भारताच्या दक्षिण भागाकडेही या सणासाठी जय्यत तयारी केली जाते. कर्नाटकात याला सुग्गी म्हणतात. इथले शेतकरी आपलं शेत आणि गुरं छान सजवतात, रात्री शेकोटी करून त्याभोवती पारंपरिक गाणी म्हणतात. इथे उसाची शेती बरीच प्रमाणात होते, तेव्हा इथल्या बायका तिळगुळासोबतच ऊससुद्धा एकमेकींना वाटतात. महाराष्ट्रासारखेच इथेही नवविवाहित दाम्पत्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

केरळ मध्ये याला ‘मकर विलक्कु’ म्हणतात. या दिवसात शबरीमाला मंदिराजवळ एक यात्रा आयोजित केली जाते जेव्हा हजारो लोक मकर ज्योती हे अवकाश चांदणे पाहायला येतात, जे अय्यप्पा स्वामींचं रूप आहे असं मानलं जातं. इथे देशभरातून लोक येतात. पश्चिम बंगालच्या भागात पौष संक्रांत साजरी केली जाते, कारण हा सण पौष महिन्यात येतो, बंगाली दिनदर्शिकेत सुद्धा पौष महिना असतो. इथे शेतकरी आपली घरं, शेत यांची साफसफाई करतात, अंगणात रांगोळ्या काढतात, या रांगोळ्या तांदळाच्या पीठाने काढल्या जातात, घरात आंब्यांच्या डहाळ्यांनी छान सजावट करतात.

बिहार आणि झारखंडमध्ये संक्रांत सणासाठी २ दिवस महत्त्वाचे मानले जातात. पहिल्या दिवशी नदी आणि तलावात आंघोळ करतात आणि या वर्षी चांगली कापणी झाल्यामुळे देवाचे आभार मानतात. इथेही मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. दुसरा दिवस ‘मकरत’ म्हणून साजरा केला जातो, जेव्हा लोक विशेष अशी खिचडी (मसूर-तांदूळ, फुलकोबी, वाटाणे आणि बटाटे अशा प्रकारे केली जाते) बनवतात, जी चोखा (भाजलेल्या भाज्या), पापड, तूप आणि लोणच्यासोबत खाल्ली जाते. आसाम हे राज्य निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मकर संक्रांत इथे विविध प्रकारची मेजवानी आणि शेकोटी करून साजरी केली जाते. इथे हा सण ‘माघ बिहू’ या नावाने साजरा केला जातो. या काळात शेतात घरं बनवतात आणि तिथे मेजवानी, शेकोटीचा मनमुराद आनंद घेतला जातो. या घरांना मेजी किंवा भेलाघर असे म्हणतात. या दिवसांत इथे गावरान पद्धतीचे खेळ खेळले जातात, ज्याला तेकेली भोंगा असे म्हणतात. तामिळनाडू मध्ये ४ दिवसांचा पोंगल अतिशय दिमाखात साजरा केला जातो. पहिला दिवस भोगी मानला जातो, ज्यामध्ये जुने कपडे आणि वस्तू लोक होळीसारखे शेकोटीमध्ये नष्ट करतात. दुसरा दिवस थाई पोंगल म्हणून साजरा केला जातो, त्यावेळी पोंगल हा गोड पदार्थ बनवतात. हा पदार्थ भात, दूध, गूळ, ड्रायफ्रुटस यातून बनवला जातो. पंजाबमध्येसुद्धा मकर संक्रांत माघी म्हणून साजरी करतात. या दिवशी पहाटे नदीत स्नान करतात आणि संपूर्ण घरात तिळाच्या तेलाचे दिवे लावतात. शीख इतिहासातील एका ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून माघी रोजी श्री मुक्तसर साहिब येथे एक मोठी जत्रा आयोजित केली जाते. भांगडा आणि गिड्डा सादर केला जातो, त्यानंतर सर्वजण एकत्र खिचडी आणि गुळाची खीर खातात. संक्रांतीच्या किंवा माघीच्या आदल्या रात्री लोहरी साजरी केली जाते. माघीच्या दुसऱ्या दिवसापासून शेतकऱ्यांचे आर्थिक वर्ष सुरू होते.

मकर संक्रांत केवळ भारतातच नव्हे तर नेपाळ, इंडोनेशिया यांसारख्या देशात देखील साजरी केली जाते. सलग ३ दिवस साजरा केला जाणारा हा सण वैज्ञानिक आणि आहारशास्त्राच्या दृष्टीनेदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक भाषेत सूर्याचे दक्षिणायन पूर्ण होऊन उत्तरायणात सुरू होते आणि हेच परिभ्रमण मकर संक्रांत म्हणून साजरे केले जाते. मकर संक्रांत हा सण पतंगबाजी आणि नैसर्गिक दृष्ट्या विशेष आहेच, परंतु सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्रातही फार विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या उत्तराणयात रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू समारंभ साजरा केला जातो. नवविवाहित दाम्पत्यांसाठी हा सण विशेष पद्धतीने साजरा केला जातो. त्यांना हलव्याचे दागिने, काळे कपडे अशा काही वस्तू भेट दिल्या जातात. लहान बाळांनादेखील हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. संक्रांतीचा शेवटचा दिवस हा किंक्रांतीचा असतो. या दिवशी संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसात शेती आणि मळ्यांत आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. मकर संक्रांती अशा काळात येते, जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने आपले घर अन्नधान्याने, समृद्धीने भरून जाते. एकूणच देशभरात सर्वच ठिकाणी हा सण अतिशय सकारात्मक पद्धतीने आणि आनंदात साजरा केला जातो. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव याच अर्थाने हा सण साजरा केला जातो. आपणही म्हणूया तिळगुळ घ्या, गोड़ बोला…!

viva@expressindia.com

Story img Loader