११ मार्च २०२० , जागतिक आरोग्य संघटनेने कोविड -१९ ला अधिकृतपणे जागतिक महामारी म्हणून घोषित केले. भारतासह संपूर्ण जगात लॉकडाऊन लागून सगळ्यांना घरात कोंडून घ्यावं लागलं. लॉकडाऊनमुळे मिळलेल्या सक्तीच्या कैदेत बाहेरच्या जगाची क्षणाक्षणाची स्थिती जाणून घेण्याची तीव्र इच्छा वाढीस लागली. या काळात मोबाइल २४ तासांसाठी हातात आला. कोविडच्या भयातून नकारात्मक वातावरण बनत गेलं. याचे पडसाद तरुणाईच्या नेट सर्फिंगवरदेखील उमटले. सोशल मीडियावर, बातम्यांत सतत कोविडमुळे झालेले मृत्यू, हाताबाहेर चाललेली परिस्थिती, लोकांचे होणारे हाल यांचेच अपडेट पाहिले जाऊ लागले. टीव्हीवरील बातम्या आणि सोशल मीडियावरील कन्टेन्टमध्येदेखील सतत रुग्णांची वाढती संख्या, हॉस्पिटलमध्ये शिल्लक नसलेल्या जागा, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, रोज वाढणारी मृत्युसंख्या याच घडामोडी दाखवत होत्या. यातून सतत अशाच नकारात्मक बातम्या पाहण्याची इतकी सवय लागली की स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रांग, जीवनावश्यक वस्तूंअभावी होणारे हाल अशा बातम्यादेखील चवीने पाहिल्या जाऊ लागल्या. आता संपूर्ण जग या महामारीतून सावरून पूर्ववत झालं आहे खरं, पण इंटरनेटवर नकारात्मक गोष्टी पाहण्याची अनेकांची सवय अजूनही तशीच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनेट आणि सोशल मीडियावर सतत नकारात्मक बातम्या, पोस्ट पाहत राहण्याची ही सवय म्हणजे डूमस्क्रोलिंग किंवा डूमसर्फिंग. डिजिटल जीवनातली एक नवी मानसिक समस्या म्हणून डूमस्क्रोलिंग हळूहळू वाढताना आढळते आहे. सुरुवातीला एखादी अशी बातमी किंवा पोस्ट पाहिली जाते. आणि मग अशा त्रासदायक गोष्टी बघायची जणू सवय लागते. २०२० च्या दरम्यान कोविडमुळे डूमस्क्रोलिंग अचानक चर्चेत आलं असलं, तरी या शब्दाचा उपयोग आधीपासूनच सोशल मीडियावर होत आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबर सोशल मीडियावर नकारात्मक पोस्टचा भडिमार झाल्याने होणाऱ्या मन:स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. अनेक मानसशास्त्र अभ्यासकांनी याची तुलना १९७० च्या दशकातील मीन वर्ल्ड सिंड्रोम या संकल्पनेशी केली. तेव्हा टीव्ही आणि पेपरमधील रोजच्या खून दरोड्याच्या बातम्या सतत पाहून अनेकांना जग अत्यंत भयानक आहे, असं वाटू लागलं होतं. २०१८ पासून डूमस्क्रोलिंग हा शब्द ट्रेंडिंगमध्ये आला. २०२० च्या अखेरीस, मेरियम-वेबस्टर आणि ऑक्सफर्ड लँग्वेजेससह प्रमुख शब्दकोशांनी या शब्दाला वर्षातील ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून मान्यता दिली.

कोविडच्या काळात भीतीपोटी सुरू झालेली डूमस्क्रोलिंगची सवय ४ वर्षे उलटून गेली तरी कायम असून उलट वाढत चालली आहे. २०२४ मध्ये, मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात जवळजवळ ३१ टक्के अमेरिकन दररोज अशा प्रकारे डूमस्क्रोलिंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आणि यात तरुणाई मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहे. अमेरिकेतील ४६ टक्के मिलेनियल्स आणि ५१ टक्के जनरेशन झेड डूमस्क्रोलिंगच्या आहारी गेल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. डूमस्क्रोलिंग फक्त अमेरिकेपुरते मर्यादित नाही. गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर झालेल्या देशाच्या आर्थिक सर्वेक्षण २०२३-२४ च्या अहवालातील सामाजिक कल्याणाच्या प्रकरणात भारतीय तरुणाईतील वाढत्या डूमस्क्रोलिंगविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

या नकारात्मक कन्टेन्टमध्ये अनेक बाबींचा समावेश आहे. नजीकच्या काळातील निपाह आणि इतर अशा विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांच्या प्राथमिक बातम्या येऊ लागल्यावर अनेकांनी कोविडच्या भयावह अनुभवांमुळे सतत या बातम्यांवर नजर ठेवली होती. कोविडसारखी परिस्थिती पुन्हा येऊ शकते, या भीतीने अनेकांची झोप उडाली होती. देशाच्या काही भागांत चालू असणारे हिंसाचार, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींमध्ये होणारे शाब्दिक वादविवाद, सेलिब्रेटींच्या आत्महत्या, काही सेलिब्रेटींवर झालेले आरोप आणि अटक अशा अनेक नकारात्मक विषयांवर सतत नवी माहिती घेण्यासाठी स्क्रोलिंग सुरू असते. कोविडनंतरच्या काळात अनेक आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली. या दरम्यान आयटी क्षेत्रात काम करणारी अनेक मंडळी सतत अशाच बातम्यांवर लक्ष ठेवून होती. याच बातम्या सतत चघळून अनेकांना अॅन्झायटी अॅटॅक आल्याचे आढळून आले. शेअर मार्केटमधील उलथापालथी, रशिया-युक्रेन युद्ध, मधल्या काळात विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापलेले राजकीय वातावरण, विविध निदर्शने अशा अनेक घडामोडींमुळे डूमस्क्रोलिंग वाढीस लागले.

बऱ्याच वेळेला घडामोडींविषयी अपडेटेड राहण्याची गरज ही डूमस्क्रोलिंगची जननी ठरते. सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या ट्रेंड्समध्ये अपडेटेड राहण्यासाठी घडलेल्या विविध घटनांची माहिती घेण्यात ‘न्यूज जंकीज’ तत्पर असतात. व्हर्जिनिया विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापक बेथानी टीचमन म्हणतात, ‘अपडेटेड राहण्याचा हा फोमो आणि डूमस्क्रोलिंगचा जवळचा संबंध आहे. ‘सबसे पहले सबसे तेज’च्या नादात हळूहळू फक्त नकारात्मक गोष्टींवर भर दिला जातो. आणि यातून कळत नकळत आपणदेखील डूमस्क्रोलिंगची शिकार होत असतो. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना, राजकीय नेत्यांची टीकाटिप्पणी, घडणारे गुन्हे यांची बित्तंबातमी मिळवायच्या नादात याच गोष्टी वारंवार पाहिल्या जातात. नकारात्मक घटनांबद्दल अधिक माहिती घेतल्याने त्याबद्दल निर्णय घेण्यात मदत होईल, असाही विचार केला जातो. अनेक जेष्ठ मंडळी कायम विविध आजार आणि त्यांचे उपाय याविषयी माहिती शोधतात. शेअर बाजारात रस असणारी मंडळी बाजाराच्या संभाव्य मंदीविषयी तर आपल्या जीवनात वाईट प्रसंग आले तर आपण तयार असायला हवे या सुप्त इच्छेतून अपहरण, खून, दरोडे विषयक बातम्या, अपडेट, टीव्ही शोदेखील आवडीने पाहिले जातात. सोशल मीडिया, न्यूज अॅप्स यांचे अल्गोरिथम आपल्याला जास्तीत जास्त वेळ गुंतवून ठेवण्यासाठी बनवले गेलेले असतात. त्यामुळे एकदा का अशा नकारात्मक पोस्ट पाहिल्या की वारंवार तशाच पोस्ट दाखवल्या जातात. आणि मग नकळत डूमस्क्रोलिंग वाढत जाते.

सततच्या डूमस्क्रोलिंगचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होतात. हेल्थ कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या २०२२ च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे, वारंवार नकारात्मक पोस्ट पाहणाऱ्यांमध्ये ताणतणाव आणि चिंता यांचे प्रमाण अधिक आहे. अस्वस्थ करणाऱ्या बातम्या पाहिल्यावर शरीरात स्ट्रेस हॉर्मोन अॅड्रेनलाइन स्रावले जाते. मेंदूचा ‘फाइट ऑर फ्लाइट’ मोड ऑन होतो. शरीराला सज्ज करणाऱ्या संप्रेरक कॉर्टिसोलची पातळी वाढते. बऱ्याच जणांना आपल्याला खरंच काही धोका असल्यास हृदयाची गती वाढणे, घाम फुटणे अशी काही लक्षणे निर्माण होतात, तशीच लक्षणे फक्त अशा पोस्ट वाचूनदेखील होऊ शकतात. आपलं शरीर आणि मेंदू असा परिस्थितीजन्य ताण फक्त थोडा वेळ हाताळू शकतात. डूमस्क्रोलिंगमुळे वारंवार, दीर्घकाळ शरीराला असा तणाव देण्याचे परिणाम रोजच्या जीवनात दिसू लागतात.

नकारात्मक गोष्टी वाचून मेंदू संभाव्य धोक्यांबद्दल अति-जागरूक होतो. सतत असे होत राहिल्यास काही लोकांना सुरक्षित वातावरणातही असुरक्षित वाटू लागते. ‘हफिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वृत्तसंस्थेच्या सहाय्याने मानसशास्त्र संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की सकाळी तीन मिनिटे नकारात्मक बातम्या पाहिलेल्या लोकांमध्ये नंतर मूड खराब होऊन दिवस वाईट जाण्याची शक्यता २७ टक्के अधिक आहे. ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर’ या प्रसिद्ध जर्नलमधील एप्रिल २०२४ च्या अंकातील एका शोधनिबंधानुसार ऑफिसमध्ये डूमस्क्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामात लक्ष कमी होऊन कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

इतके सगळे परिणाम माहिती असूनही आपण नकारात्मक गोष्टींकडे आकर्षित का होतो याचे उत्तर मेंदूच्या ‘वायरिंग’मध्ये आहे. आपल्या आदिम पूर्वजांना रोजच्या जीवनात जगण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. सभोवतालच्या असुरक्षित वातावरणामुळे सतत सावध राहावे लागायचे. त्यामुळे आपले आदिम पूर्वज एखाद्या झुडपावरचे सुंदर फूल पाहून आनंदित होण्याऐवजी त्या झुडपामागे एखादा वाघ तर दबा धरून बसला नसेल ना या शंकेने विचार करू लागायचे. परिणामी मेंदूला संभाव्य धोके पाहण्याची सवय लागली. ही ‘वायरिंग’ आजही तशीच आहे. डॉ. पॉल मॅक्लीन यांनी मांडलेल्या त्रिस्तरीय मेंदू सिद्धांतानुसार (ट्रय़ून ब्रेन थिअरी) आपल्या ‘सरपट मेंदू’चे (रेप्टिलिअन ब्रेन) महत्त्वाचे कार्य आहे, आपले अस्तित्व टिकवून ठेवणे. त्यासाठी मेंदू आपल्याला नकारात्मक गोष्टी आधी दाखवतो. आज हिंस्रा श्वापदे, वणवा, पूर अशा नैसर्गिक आपदा, इतर टोळ्यांची आक्रमणं, युद्ध यांचा आपल्याला रोजच्या जीवनात सामना करावा लागत नाही, पण त्यांची जागा सोशल मीडियावरील नकारात्मक बातम्यांनी घेतली आहे.

सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील नकारात्मक गोष्टींकडे चटकन लक्ष वेधलं जाणं ही मेंदूची नैसर्गिक प्रतिक्रिया असली तरी त्यात गुंतून राहून मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम मात्र चिंतेचा विषय आहे. आणि यासाठी उपाय करण्याची गरज मानसशास्त्र अभ्यासक व्यक्त करतात. समाजातील किंवा आपल्या क्षेत्रातील घडामोडींविषयी अपडेटेड राहण्याची गरज असली तरी त्यासाठी टाइम लिमिट ठरवून घेता येईल. ज्यामुळे या विषयातील इंफायनाईट स्क्रोलिंग थांबू शकेल. एखाद्या विषयातील इतकी माहिती खरंच गरजेची आहे का? हा प्रश्न सतत मनात घोळवणंही गरजेचं आहे. ‘अगा जे घडलेच नाही’ अशा घटनेविषयी उगाच विचार, चिंता करून काय उपयोग? आणि घडलेल्या नकारात्मक घटनेविषयीदेखील उगाच सतत वाचत राहणं किंवा व्यक्त होत राहणं याविषयीही विचार करायची गरज आहे.

बऱ्याच वेळा आपल्या राजकीय विचारधारेच्या विरुद्ध विचारसरणी असणारे पक्ष, राजकीय नेते यांच्याविषयीच्या रागातून त्यांच्याबद्दल नकारात्मक बातम्या, पोस्ट सतत शोधल्या जातात. अशा पोस्ट सतत लिहिणारे सोशल मीडिया लेखक, व्हिडीओ बनवणारे इन्फ्लूएन्सर, पॉडकास्टर यांना फॉलो केले जाते. त्यातून वारंवार नकारात्मक गोष्टी पहिल्या जातात, सोशल मीडियावरचा हा विखार आपलं मानसिक स्वास्थ्य अस्वस्थ करून सोडतो. या गोष्टीचा विवेकीपणे विचार करणं अगत्याचं ठरतं. सोशल मीडियावर सतत अशा नकारात्मक पोस्टचा रतीब पाडणाऱ्या मंडळींना, वेब पोर्टल्सला अनफॉलोचा नारळ देणंच आपल्या मानसिक आरोग्यासाठी योग्य ठरू शकतं.

विविध वेबसाइट्स, सोशल मीडिया, न्यूज पोर्टल्स यांच्यावरून होणाऱ्या नकारात्मक गोष्टींच्या भडिमाराने नकारात्मक होत जाणाऱ्या मनाला समर्थ रामदास स्वामींचा ‘अकस्मात होणार होऊनि जाते॥ मतीमंद तें खेद मानी वियोगे’ हा ३५० वर्षांपूर्वी केलेला उपदेश आजही उपयुक्त आहे. आपल्या आजूबाजूच्या समाजात नक्कीच काही भल्याबुऱ्या गोष्टी घडतच राहतील, पण त्यांचंच सतत चिंतन करत मनाला खेद देणं शहाणपणाचं नक्कीच नाही. डूमस्क्रोलिंगमूळे नकारात्मक झालेल्या मनाला सकारात्मकतेचे श्लोक शिकवणे गरजेचे ठरते!

viva@expressindia.com