एक होता नार्सिसस. देखणा, राजबिंडा. लोक त्याची स्तुती करत, ती त्याला फार आवडे. याने हळूहळू तो गर्विष्ठ होत गेला. कायम तो स्वत:बद्दलच विचार करत राही. चारचौघात कायम सर्वोत्कृष्ट दिसण्याची त्याची धडपड चाले. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आकर्षित होऊन लोक त्याच्याशी बोलू पाहात, पण अहंकारी नार्सिसस सगळ्यांशी तुसडेपणाने वागे. याची शिक्षा म्हणून त्याला स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडण्याचा शाप मिळाला. एका तळ्यात नार्सिससला स्वत:चंच प्रतिबिंब दिसलं आणि जग विसरून तो स्वत:ची प्रतिमा बघण्यात तल्लीन झाला. तहानभूक हरपून अखेर तिथेच मरण पावला. रोमन कवी ओव्हिड याच्या ‘मेटामॉर्फोसिस’ या प्रसिद्ध लॅटिन काव्यातली ही एक गोष्ट. यातून स्वत:वरच प्रेम करण्याच्या प्रवृत्तीला ‘नार्सिसिझम’ हा शब्द मानसशास्त्रात वापरला जातो. आजही हा नार्सिसस आपल्यात अधूनमधून डोकावतो आहे. फक्त आजच्या युगात ही प्रतिमा डिजिटल आहे. आपल्या ऑन स्क्रीन प्रतिमेच्या प्रेमात वाढता डिजिटल नार्सिसिझम हा जगभरात नवा चिंतेचा विषय ठरतो आहे.
आत्ममुग्धता म्हणजे नार्सिसिझम ही प्रवृत्ती आहे. आपण कुणीतरी सेलेब्रिटी आहोत असं वागणं, स्वत:च्या मनात स्वत:विषयी वाढीव प्रतिमा बाळगणं, इतरांच्या भावनांची किंमत न करणं, कायम स्वत:चाच विचार करणं ही याची काही लक्षणं सांगता येतील. नार्सिसिझमचे काही स्तर सामान्य आणि निरुपद्रवी असू शकतात, पण विशिष्ट पातळीनंतर मात्र हे त्रासदायक ठरू शकतं. अर्थात, ‘नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ हा मनोविकार आणि नार्सिसिझम हा स्वभाव यात फरक आहे.
‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकॉलॉजी’च्या २०२३ मधील एका शोधनिबंधानुसार किशोरावस्थेत नार्सिसिझम ही प्रवृत्ती असण्याचं प्रमाण जास्त असतं. मानसशास्त्रज्ञ जीन ट्वेंगे आणि डब्ल्यू. कीथ कॅम्पबेल यांना ३७,००० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यापक सर्वेक्षणातून नार्सिसिझम हा दर पिढीत वाढत चालल्याचं आढळून आलं. अभ्यासकांच्या मते याचं सर्वात प्रमुख कारण सोशल मीडिया आणि इंटरनेट आहे. नार्सिसिझम आणि सोशल मीडिया यांचा सहसंबंध मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा विषय झाला आहे. नार्सिसिस्ट व्यक्तीचा स्वभाव त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवरून ओळखता येतो, पण सोशल मीडियामुळे सामान्यांच्या स्वभावातही नकळत नार्सिसिझम येऊ लागला आहे. दक्षिण कॅरोलिना विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या २०२१ च्या अभ्यासात सेल्फीद्वारे नार्सिसिझम शोधता येतो, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सतत आणि मोठ्या प्रमाणात स्वत:चे फोटो शेअर करणं याचं लक्षण असू शकतं. आपला डीपी भारी, आपली पोस्ट भारी… आपलं सगळंच लय भारी… असं या मंडळींना वाटत असतं.
फ्लोरेन्स विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाच्या सिल्व्हिया कॅसेल यांनी केलेल्या अभ्यासातून असंही आढळून आलं आहे की नार्सिसिझम आणि सोशल मीडिया यांच्यातील संबंध दुष्टचक्रासारखा आहे. नार्सिसिस्टिक गुण असलेले लोक अधिक सेल्फी पोस्ट करण्याची शक्यता असते, आणि त्याउलट सतत सेल्फी पोस्ट केल्याने कालांतराने नार्सिसिझममध्ये वाढ होऊ शकते. सोशल मीडियामुळे नार्सिसिझम प्रवृत्ती नसणाऱ्यांमध्येदेखील नार्सिसिझम वाढू शकतो. फेसबुकवर टाकलेली एखादी पोस्ट असो, इन्स्टाग्रामवरचा आपला एखादा फोटो… त्याला आलेल्या लाइक, कमेंट्स सगळ्यांनाच हव्याहव्याशा वाटतात. यातून मिळणारं त्वरित डोपामिन शॉट हे मुख्य कारण सांगता येईल. मग अशा लाइक्स मिळवण्यासाठी सतत काही ना काही शेअर करत राहण्याची इच्छा बळावते. सतत स्वत:विषयी पोस्ट करत राहणं, काय खाल्लं, कुठे गेलो, कोणाला भेटलो, काय पाहिलं, अशा सगळ्या गोष्टी सतत स्टेटसला टाकण्याची सवय बळावते. त्यातूनच आत्मप्रौढी वृत्ती वाढीस लागते.
सोशल मीडिया खरंतर अभिव्यक्तीचं माध्यम आहे. आपल्याला जे वाटतं ते सहजपणे व्यक्त होण्याचं साधन, पण हळूहळू अभिव्यक्तीपेक्षा नकळतपणे दिखाव्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग होतो. फेसबुक पोस्ट लिहिताना लाइक्स मिळवण्यासाठी लोकांना काय आवडतं ते लक्षात घेऊन लिहिलं जातं. मिसळ किंवा भेळ खाताना सहज स्टेटस टाकणं वेगळं आणि खास पोस्ट टाकण्यासाठी एखाद्या ठिकाणी खायला जाणं, सगळं छान डेकोरेट करून मग फोटो टाकणं हे वेगळं. किल्ल्यावरची, जंगलातली उनाड भटकंती वेगळी आणि खास फोटोसाठी ट्रेकिंगला जाणं वेगळं. कुठेही गेल्यावर त्या स्थळाचे फोटो काढण्याऐवजी आपलं तिथलं अस्तित्व सिद्ध करायला भारंभार सेल्फी घेतले जातात. बऱ्याचदा स्वत:ला मोठं करण्याच्या नादात इतरांना तुच्छ लेखणं, इतरांच्या पोस्टवर उगाच नकारात्मक कमेंट करणं अशा पध्दतीने सततचा ‘मी…पणा’ नार्सिसिझम वाढवतो.
पूर्वी टीव्ही आणि प्रिंट मीडियाच्या काळात त्यातून दिसणारं सेलेब्रिटींचं सुखमय जीवन पाहून फार फार तर स्वप्नरंजन व्हायचं, पण आता सोशल मीडियामुळे आपलंही जीवन असंच सुखमय, स्टायलिश आहे हे जगाला दाखवता येण्याची सोय झाली. रोजचा व्यायाम, सुट्टीतली ट्रिप किंवा अगदी लग्नासारखे जीवनातले आनंदी क्षण हे सगळं सोशल मीडियावर एखाद्या सिनेमासारखं स्क्रिप्टेड दाखवता येऊ शकतं. एखाद्या धार्मिक किंवा पर्यटनस्थळी गेल्यावर तिथली माहिती दाखवण्यापेक्षा मी तिथे कसा गेलो, काय केलं… हा ‘मी’ पोस्टमधून डोकवायला लागतो. लग्न, वाढदिवस किंवा इतर समारंभांत नैसर्गिक क्षण टिपण्याऐवजी खोटे कॅन्डीड शॉट्स घेण्याचा आग्रह धरला जातो. स्वत:ला सतत सोशल मीडियाच्या ‘मुख्य पात्रा’सारखं दाखवण्याच्या अतिरेकातून अनेक लोकांमध्ये ‘मेन कॅरेक्टर सिंड्रोम’ बळावतो.
स्वत:ची सोशल प्रतिमा जपायच्या नादात तिथे आपलं सगळं परफेक्टच दिसायला हवं हा आग्रह वाढीस लागू शकतो. परफेक्शनचा हा अट्टहास जीवनातला आनंद घालवतो. अगदी स्वत:च्या लग्नातही विधींमधला आनंद घेण्याऐवजी परफेक्ट शॉटसाठी विधींचे रिटेक्स घेतले जातात. एखाद्या सनसेट पॉइंटला सूर्यास्त बघण्याचा आनंद घेण्याऐवजी सूर्य बोटात पकडण्याच्या पोझसाठीची धडपड सुरू होते. मग असे १०-१२ क्लिक, त्यातून बेस्ट फोटोची निवड, फिल्टर लावणं, हटके कॅप्शन शोधणं, शेअर करणं या गडबडीत आकाशातला सूर्य आणि मनातला आनंद दोन्ही मावळून जातात.
बऱ्याचदा स्वत:ची सोशल प्रतिमा उंचावण्यासाठी जीवनातली खरी वस्तुस्थिती झाकत फक्त निवडक भाग पोस्ट करणं, त्याला फिल्टर करणं असे पर्याय अवलंबले जातात. रंग, रूप उजळवण्यासाठी वेगेवेगळे फिल्टर्स सोशल मीडिया अॅप्सद्वारे सहज उपलब्ध असतात. बऱ्याचदा स्थूल व्यक्ती फक्त चेहरा दिसेल असे सेल्फी घेतात. काहीजण श्रीमंत दिसण्यासाठी दुसऱ्यांच्या लक्झरी कार, हॉटेल लॉबी, डिझायनर स्टोअर्ससमोर पोज देतात. आपण आहोत त्यापेक्षा डिजिटल जगात भारी कसे दिसू यासाठी धडपड सुरू होते. नवीन एआय टूल्स आपले फोटो अधिक नाट्यमय आणि भारी करून देत असल्याने हे उसनं भारीपण दाखवणं शक्य होतं. सध्या घिबली स्टुडिओ स्टाइल इमेजेस ट्रेंडिंग होण्याचं कारणही हेच आहे. जे नाही ते खोटंखोटं दाखवण्याची सवय बळावते. घरात शॉवर आणि इतर कारणांसाठी भारंभार पाणी वाया घालवत असू… पण सोशल मीडियावर ‘सेव्ह वॉटर’च्या पोस्ट टाकल्या जातात. शास्त्रीय संगीताची अजिबात आवड नसलेली अनेक मंडळी उगाच सवाई वा तत्सम महोत्सवात सोशल इमेज उंचवायला जातात. प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट करण्याच्या नादात डिजिटल नार्सिसिझम बळावतो.
या डिजिटल नार्सिसिझमचे अनेक मानसिक, सामाजिक परिणाम दिसत आहेत. सोशल मीडियावरच्या परफेक्ट आणि फिल्टर्ड जीवनाच्या मागे धावताना काहीजणांचा आत्मसन्मान कमी होतो. दुसऱ्यांच्या लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्सवरून स्वत:ची किंमत करायची सवय लागते. कमी लाइक्स आल्यावर बेचैनी वाढते. स्वत:च्या खऱ्या आयुष्याची तुलना सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या परिपूर्ण जीवनाशी करण्यातून काहींना नैराश्य येतं, सतत परफेक्शनच्या अट्टहासात खऱ्या जीवनातला आनंद हरपतो. मित्रांसोबत ट्रेकला गेल्यावर मौजमजा करण्याऐवजी त्यांना स्वत:चे भारंभार फोटो घ्यायला सांगणं, आपल्या मनासारखा ‘पोस्टेबल’ फोटो न आल्याने चिडचिड होणं हे प्रकार वाढतात. डिजिटल इमेज उंचवण्यासाठी महागडे ब्रॅण्ड्स, अॅडव्हेंचर्स ट्रिप, महागडे रेस्तराँ, कॅफे यांच्यावरचा वाढता खर्च, आपल्या पोस्टला नेहमी लाइक देणाऱ्या, कमेंट करणाऱ्या आभासी मित्रांविषयी वाटू लागणाऱ्या अधिक जिव्हाळ्यामुळे स्पष्टपणे खरं मत मांडणाऱ्या मित्रांना दूर ठेवलं जातं, ‘अहो रूपं अहो ध्वनी’ या सुभाषितासारखी उगाच एकमेकांची केली जाणारी सोशल स्तुती, इतरांच्या भावनांविषयी आस्था कमी होऊ लागणं, आपणच भारी हे दाखवण्यासाठी इतरांना ट्रोल करणं, पुढे सायबर बुलिंगदेखील सुरू होतं.
हा डिजिटल नार्सिसिझम हळूहळू वैयक्तिक जीवनातही डोकावू लागतो. आपण कोणीतरी विशेष आहोत असं खऱ्या जीवनातही वाटू लागतं. सोशल मीडियावरच्या लाइक्स-कमेंट्सच्या अतिसवयीमुळे प्रत्यक्षात कोणी कौतुक केलं नाही तर अस्वस्थ वाटतं. आपल्यापेक्षा वेगळं मत मांडणारा आपला मत्सर करतो आहे, हा गैरसमज वाढतो. सोशल मीडियावर आपण सतत आपलंच मत दामटत असल्याने इतरांचे विचार, दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळे असू शकताच हे मान्य करणंच कठीण होऊ लागतं. वास्तव आयुष्यात कुटुंबीय आणि मित्र यांच्या भावनांविषयी अनास्था वाढीस लागते, एखाद्या समस्येविषयी स्वत: काही करण्यापेक्षा त्याविषयी सोशल पोस्ट टाकली की आपली जबाबदारी संपली अशी मानसिकता वाढू शकते. अर्थात, सेल्फी घेणं आणि स्टेटस टाकणं म्हणजे डिजिटल नार्सिसिझम असं नक्कीच नाही. किंवा सोशल मीडियावर सक्रिय राहणं वाईट असंही नाही. आजच्या डिजिटल जिंदगीत सोशल मीडिया जीवनाचा अविभाज्य भाग आहे. एखाद्या गोष्टीविषयी आपले विचार काय आहेत? आपल्या जीवनात काय चालू आहे हे आपल्या प्रियजनांना दाखवायची सोयही सोशल मीडियामुळे झाली आहे. मात्र त्याचा उपयोग अभिव्यक्तीपेक्षा स्वप्रतिमावर्धनात होत असेल आणि यासाठी वेळ, पैसे आणि नाती खर्च होत असतील. हेच आयुष्यातलं सार्थक वाटत असेल तर ती धोक्याची घंटा म्हणता येईल. लाइक आणि कमेंटची तीव्र भूक, सोशल इमेजविषयी कमालीची सजगता, त्यासाठी परफेक्शनचा अट्टहास आणि वस्तुस्थिती झाकण्याची किंवा फिल्टर करायची सवय, इतरांच्या सोशल स्टेटसविषयी असूया, सोशल मीडियाची स्वत:वरील टीका सहन न होणं, इतरांच्या पोस्टला तुच्छ लेखणं, ही डिजिटल नार्सिसिझमची काही लक्षणं सांगता येतील. याच्या कमी-जास्त प्रमाणावरून स्वयंमूल्यांकन शक्य आहे.
डिजिटल नार्सिसिझम कमी करण्यासाठी, सोशल मीडियाचा सजग वापर करणं आवश्यक ठरतं. पोस्ट करताना अभिव्यक्ती आणि आत्मप्रौढी यातला फरक लक्षात ठेवणं, आपण जसे आहोत तसे सोशल मीडियावर व्यक्त होण्याची सवय लावणं, फिल्टर्स टाळणं, अवास्तव जीवनशैली दाखवणाऱ्यांना अनफॉलो करणं, ऑनलाइनपेक्षा वैयक्तिक नात्यांवर भर देणं असे काही उपाय शक्य आहेत. अधूनमधून डिजिटल डिटॉक्स करत सोशल मीडियापासून काही काळ लांब राहणं हा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणता येईल.
लाइक्स, कमेंट, पोस्ट यापलीकडे, सोशल मीडियाच्या बाहेर आपलं खरं जीवन आहे याचं भान राखणं सगळ्यात महत्त्वाचं. या जीवनातले आपले छंद, कौशल्यं, नातीगोती या गोष्टी आपल्या जीवनाला आकार देतात. चविष्ट खाणं, मनमुराद भटकणं, श्रवणमधुर ऐकणं, अर्थगर्भ वाचणं या क्रिया स्वान्त-सुखाय करायची सवय लागली की इतरांना दाखवण्याची चढाओढ थांबेल. आणि मग त्यातून येणारी स्वमुग्धतादेखील आपसूकच निमेल. सोशल मीडियाच्या मग्न तळ्याकाठी बसलेल्या मनाच्या नार्सिससला स्वप्रतिमा प्रेमातून वेळीच जागं करणं आता गरजेचं झालं आहे.
viva@expressindia.com