टीम व्हिवा
बदल हा कुठल्याही क्षेत्राप्रमाणे फॅशन उद्याोगालाही लागू होतो. फॅशनच्या बाबतीत म्हणायचं तर खरंच बदल ही एकच गोष्ट कायम असते. कुठली फॅशन दीर्घकाळ चालेल आणि कुठल्या ट्रेंडकडे चटकन पाठ फिरवली जाईल, याची अचूक समीकरणं सागणं कठीणच. मात्र वर्षभरातील फॅशनच्या वेगवेगळ्या ट्रेंड्सचा वेध घेतला तर नक्की काय काय लोकप्रिय आहे आणि नवीन वर्षातही किती काळ तो ट्रेंड टिकून राहील, याचा अंदाज सहज बांधता येतो. या सरत्या वर्षात सस्टेनेबल फॅशन ही गोष्ट अगदी आलिया भट्टसारख्या सेलिब्रिटींनीही केवळ चर्चा आणि प्रदर्शनांपुरती न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे.
सस्टेनेबल फॅशन हा गेल्या काही वर्षांत किमान आंतरराष्ट्रीय फॅशन शोजमधून परवलीचा झालेला शब्द. खादी, हॅण्डलूम कपड्यांची हळूहळू का होईना सातत्याने वाढलेली मागणी हे कुठे तरी फॅशनप्रेमी कपड्यांच्या बाबतीतही शाश्वत टिकणाऱ्या गोष्टींचा विचार करू लागले आहेत याचं द्याोतक आहे. याही वर्षी हॅण्डलूम टेक्स्टाईल्स, खादी आणि अस्सल कॉटन कपड्यांची मागणी अधिक होती. साड्यांपासून पंजाबी ड्रेस ते अगदी वेस्टर्न फ्युजन कपड्यांसाठीही या पारंपरिक फॅब्रिकचा विचार अधिक होतो आहे. पारंपरिक फॅब्रिक, फ्युजन लुक आणि अजरख, इंडिगो अशा जुन्या प्रिंट्सचं एक वेगळंच मिश्रण असलेले कपडे अधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने फॅशनचा विचार होतो आहे. आलिया भट्टने आपल्या ब्रॅण्डसाठीही या पर्यावरणपूरक फॅब्रिकला प्राधान्य दिलं आहे. तिच्या ‘एड ए मम्मा’ या लहान मुलांच्या कपड्यांच्या ब्रॅण्डअंतर्गत तिने इको फ्रेंडली, सस्टेनेबल फॅब्रिकचेच कपडे उपलब्ध करून दिले आहेत. तिच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांमुळे सस्टेनेबल ट्रेंड अधिक वेगाने सर्वदूर पोहोचायला मदत होणार आहे.
सस्टेनेबल फॅशनबरोबरच आरामदायी आणि फॅशनेबल अशा दोन्ही गोष्टींचा मेळ घालणाऱ्या कपड्यांची मागणी या वर्षी अधिक होती. त्यामुळे अॅथलिजर आणि स्पोर्ट्स वा जिमवेअर ड्रेसेस ट्रेंडमध्ये आहेत. करोनानंतर आलेल्या वर्क फ्रॉम होम प्रकारामुळेही बहुधा अशा पद्धतीच्या कपड्यांची मागणी अधिक वाढली असावी. केवळ जिम किंवा व्यायामासाठीच नव्हे तर हे कपडे विमानातून प्रवास करण्यापासून ते मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाण्यासाठी म्हणूनही वापरले जातात. कम्फर्ट आणि फॅशनेबल लुक दोन्ही गरजा पूर्ण करणाऱ्या जिमवेअर ड्रेसेसचा ट्रेंड पुढच्या वर्षीही कायम राहील.
फॅशनच्या बाबतीत अनेकदा जुनी फॅशन काही वर्षांनी पुन्हा ट्रेंडमध्ये येते, असं म्हणतात. सध्या जीन्स आणि पॅँट्सच्या बाबतीत हा प्रकार अनुभवायला मिळतो आहे. फ्लेअर्ड जीन्स आणि पँट्स हा प्रकार पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. रेट्रो फॅशन म्हणून ओळखल्या गेलेल्या वाइड लेग पँट वा फ्लेअर्ड पँट पुन्हा ट्रेंडमध्ये आल्या आहेत. केवळ जीन्सच नव्हे तर वेगवेगळ्या फॅब्रिक आणि ब्रँडच्या वाइड लेग पँट, फ्लेअर्ड पँट्सना मागणी वाढली आहे. या पँट्सवर शर्ट्स, क्रॉप टॉप्स किंवा ब्रालेटपासून काहीही पेअर करत फॅशनेबल लुक साधता येत असल्याने हा प्रकार सध्या अधिक पॉप्युलर झाला आहे. केवळ कॉलेजला जाणाऱ्या मुलींमध्येच नाही तर ऑफिसवेअर म्हणूनही फ्लेअर्ड पँट्स आणि त्यावर ब्लेझर या लुकला स्त्रियांकडून पसंती मिळते आहे. युनिसेक्स कपड्यांचीही मागणी वाढली आहे. रंगांच्या बाबतीतही अमुक रंग पुरुषांच्या कपड्यांना आणि तमुक स्त्रियांना हा भेदाभेद उरलेला नाही. खरं तर तो कपड्यांच्या प्रकाराच्या बाबतीतही उरलेला नाही. स्कर्टपासून पायघोळ पायजम्यांपर्यंतचे प्रकार पुरुषांमध्येही आरामदायी फॅशनवेअर म्हणून लोकप्रिय झाले आहेत. रंगांमध्ये सेलिब्रिटींच्या कृपेने लोकप्रिय झालेले पेस्टल शेड्स आताही तेवढेच ट्रेंडमध्ये आहेत. त्यातल्या त्यात लग्नासाठी लेहंगा वा साडीमध्ये पुन्हा एकदा पारंपरिक लाल, राणी कलरमधील शेड्स पुन्हा आल्या आहेत. मात्र, पेस्टल शेड्सवरचं प्रेम कमी झालेलं नाही हेही तितकंच खरं. या वर्षभरात रुळलेल्या या फॅशन ट्रेंड्सचा प्रभाव नव्या वर्षातही निश्चितच जाणवल्याशिवाय राहणार नाही.
viva@expressindia.com