एचटी स्मार्ट कार्ड प्रस्तुत स्पॉटीफायवरील ‘दहशत’ या पॉडकास्टमध्ये गुन्हेगारी विश्वात घडणाऱ्या काल्पनिक कथा मनोरंजनात्मकरीत्या श्रोत्यांना ऐकवल्या जातात. यामध्ये पोलीस गुन्हेगारांना कसे पकडतात? हे साध्या सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहे. ‘दहशत’ या पॉडकास्टमधील ‘बदला’ या भागात आर. जे. रिधिमा आपल्या आईच्या मृत्यूचा बदला घेणाऱ्या रिषभची गोष्ट सांगते. यामध्ये रिषभ स्वत:च्या जिवलग मित्राच्या आई-वडिलांचा खून करतो, पण त्याचा मित्र त्याच्या या चुकीसाठी माफ करतो. पण तो असं का करतो? यामागचं रहस्य काय आहे याचा उलगडा आर. जे. रिधिमा पॉडकास्टच्या शेवटी करते. त्याच वेळी तिने ‘हम ‘बदला’ लेने के चक्कर में सब कुछ खोते है, क्षमा ‘जिसने’ कर दिया वो लोग बडे महान होते है’ या काव्यपंक्ती ऐकवून कथेचा शेवट केला आहे.
मी गुन्हेगारी विषयावर अनेक पुस्तकं लहानपणापासून वाचतो आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वातील घडामोडींबद्दल माहिती जमा करणं मला आवडतं. माझ्या वडिलांनी मला ‘दहशत’ या पॉडकास्टविषयी सांगितलं. या पॉडकास्टमध्ये आर. जे. रिधिमा स्वलिखित अनेक कथा सांगते. या पॉडकास्टमधील ‘बदला’ हा भाग मला अधिक आवडतो, कारण यामध्ये मानसिकता खराब असलेला, मनात द्वेष असलेला मित्र कसं नुकसान करू शकतो हे सहज मांडण्यात आलं आहे. असे अनेक प्रसंग असतात जेव्हा आपल्याला आजूबाजूला असलेल्या फसव्या लोकांची जाणीव होते. अशा लोकांशी कसं वागावं हे ‘दहशत’ या पॉडकास्टमधील ‘बदला’ या कथेत अचूक प्रकारे मांडलं आहे.
– आर्यन केळुसकर (बीएमएम विद्यार्थी)
शब्दांकन: श्रुती कदम