स्वानंद गांगल
भारतात सध्या आयपीएल नावाचा वार्षिक उत्सव सुरू आहे. सर्वत्र सध्या त्याचाच बोलबाला आहे. पु. ल. म्हणतात त्याप्रमाणे क्रिकेट हा खेळण्यापेक्षा जास्त बोलण्याचा विषय. गोऱ्या ‘साहेबा’कडून आपल्याला चहा, रेल्वेसारख्या ज्या काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, त्यातच क्रिकेटही येतो. जगात इतरत्र हा खेळ म्हणून गणला जात असला तरी भारतात मात्र याला एखाद्या राष्ट्रीय सणाचा दर्जा प्राप्त आहे. भारतीयांच्या भावना एखाद्या सुंदर ललनेत किंवा हँडसम हंकमध्ये जेवढय़ा गुंतत नाहीत तेवढय़ा क्रिकेटमध्ये गुंततात. या सगळय़ा भावनिक गुंतवणुकीला नवा तडका दिला आयपीएलने!

२००८ साली क्रिकेट इतिहासातल्या या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. २००७ साली टी-२० विश्वचषकातील भारताच्या यशामुळे या नव्या फॉरमॅटची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. आयपीएलच्या यशाचा उंच मनोरा रचायला ही एवढी पायाभरणी पुरेशी होती. गेल्या १७ वर्षांत या लीगने क्रिकेट खेळाची आणि त्याच्या सभोवताली फिरणारी अनेक व्यावसायिक गणितंच बदलून टाकली आहेत. आयपीएल ही फक्त एक खेळाची स्पर्धा राहिलेली नसून त्याही पलीकडे खूप व्यापक झाली आहे. आज घडीला जगातल्या सर्वात श्रीमंत १० क्रीडा स्पर्धामध्ये आयपीएलचा समावेश होतो. हे यश एका रात्रीत नक्कीच आलेलं नाही. एका योजनाबद्ध रणनीतीतून आखलेल्या एका व्यावसायिक मॉडेलचे हे यश आहे. वरकरणी चित्र पाहायचे तर भारतातील काही श्रीमंत लोक, एका शहराची टीम खरेदी करतात आणि मग खेळाडूंसाठी कोटय़वधींची बोली लावून स्पर्धेत सहभागी होतात, ही आयपीएलची सामान्य संकल्पना. पण या संकल्पनेने अनेक वेगवेगळय़ा गोष्टींना प्रभावित केले आहे.

IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पाहिले तर आयपीएलने अनेकांना आर्थिक स्थैर्य दिले. भारतासारख्या १३० कोटींच्या देशातून १५ जणांचा राष्ट्रीय संघ निवडत असताना अनेक होतकरू खेळाडूंना संधी मिळणार नाही हे उघड आहे. अशा वेळी रणजी आणि इतर स्पर्धा खेळताना अपेक्षित आर्थिक स्थैर्य शोधणे नक्कीच कठीण होते. आयपीएलने या सर्वासाठी नवे दार खुले केले. भारताच्या अनेक छोटय़ा गावांमधील होतकरू खेळाडूंना संधी मिळाली. जिथे क्रिकेट फक्त विरंगुळा म्हणून खेळला जायचा, तिथेही आता रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू झाल्या आहेत. आयपीएल संघांशी संलग्न असलेली मंडळी या गाव खेडय़ांमध्ये पोहोचू लागली. तिकडच्या चांगल्या खेळाडूंची चाचणी घेऊन त्यांना आपल्या संघासाठी संधी देऊ लागली. आयपीएलमधून पुढे आलेले जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ासारखे अनेक खेळाडू पुढे भारतासाठी चमकदार कामगिरी करून गेले.

आयपीएलमधून क्रिकेटर्स व्यतिरिक्तही अनेकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. आज या संघांसाठी संघ व्यवस्थापक, स्पोर्ट्स अ‍ॅनालिस्ट, मेंटल वेलनेस कोच अशा प्रकारचे काम करणाऱ्या तज्ज्ञ लोकांची मागणीही वाढू लागली आहे. आजवर ऑलिम्पिक, फिफा वल्र्ड कप, विम्बल्डन अशा स्पर्धामुळे परदेशात पाहायला मिळणारा स्पोर्ट्स टुरिझम हा प्रकार आयपीएलमुळे भारतातही वाढू लागला. आयपीएलच्या निमित्ताने अनेक परदेशी पाहुणे भारतात येऊ लागले. अनेक भारतीय क्रिकेट चाहते आपल्या आवडीच्या संघांचे सामने पाहायला वेगवेगळय़ा शहरांमध्ये प्रवास करू लागले. त्यानिमित्ताने टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी संलग्न अनेक व्यवसायांना तेजी आली. हॉटेल्स, लॉजिंग, दळणवळणाची साधने, खाद्यपदार्थ हे व्यवसाय वृिद्धगत झाले. क्रिकेट स्टेडियम अद्ययावत ठेवणे गरजेचे झाले, त्यामुळे त्याच्याशी निगडित रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. पण आयपीएलच्या या वाढत्या लोकप्रियतेचा एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्रीला फटका बसल्याचेही पाहायला मिळते. आयपीएल सुरू असण्याच्या कालावधीत अनेक टीव्ही मालिका, इतर क्रीडा स्पर्धा यांच्या टीआरपीमध्ये घट पाहायला मिळते. या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही याचा फटका बसताना दिसतो. याचे सगळय़ात ताजे उदाहरण म्हणजे अजय देवगणचा ‘मैदान’ आणि अक्षय कुमार, टायगर श्रॉफचा ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हे दोन्हीही बिग बजेट चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटले. त्यामुळे या फटक्यातून वाचण्यासाठी अनेकदा चित्रपटाच्या प्रचारासाठीही आयपीएलच्या व्यासपीठाचा आधार घेतला जातो. अभिनेते सामन्याच्या आधी स्टुडिओमध्ये हजेरी लावून आयपीएल, क्रिकेट, त्यांचे आवडते संघ, खेळाडू याबद्दल भरभरून बोलतात आणि मध्येच मुख्य मुद्दय़ाला हात घालत आपल्या आगामी कलाकृतीचे प्रमोशनही करतात.

आयपीएलच्या ६०-७० दिवसांच्या कालावधीत विविध ब्रॅण्ड्स या क्रिकेट फीवरचा फायदा उचलायचा प्रयत्न करतात. त्यांचे मार्केटिंग, ब्रॅिण्डग, जाहिरातबाजी सर्व आयपीएल केंद्रित असते. वेगवेगळय़ा ऑफर्स घेऊन ते बाजारात येतात आणि ग्राहकांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात. अगदी स्थानिक पातळीवरचे रेस्टॉरंट किंवा कॅफे ओनरसुद्धा मोठमोठय़ा स्क्रीन्स लावून गर्दी आकर्षित करताना दिसतात. मैदानात होणारी जाहिरातबाजी वेगळय़ाच पातळीवर गेली आहे. खेळाडूंच्या जर्सीवर वेगवेगळय़ा कोपऱ्यात ब्रॅण्ड लोगो टाकून जाहिरातबाजी, स्पर्धेतील चौकार, षटकार, सर्वोत्कृष्ट झेल, स्ट्रॅटेजिक टाइम आऊट, सर्वोत्तम खेळाडू आदी प्रकारांना ब्रॅण्ड्सच्या नावाने ओळखले जाते. स्पर्धेतील स्टार खेळाडूंना जाहिरातींसाठीही करारबद्ध केले जाते. थोडक्यात काय तर आयपीएलच्या नावाने जी पैशाची नदी वाहते त्यातले काही थेंब आपल्यावरही पडावेत यासाठी मोठा खटाटोप दिसतो.

एकीकडे पैशाचा आणि ग्लॅमरचा हा गदारोळ सुरू असतानाच क्रिकेट नियामक मंडळ आणि विविध संघाकडून सामाजिक बांधिलकीचेही काही उपक्रम पाहायला मिळतात. मुंबई इंडियन्स या संघातर्फे दरवर्षी गरीब लहान मुलांना स्वखर्चाने सामना पाहायला मैदानात आणले जाते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा संघ दरवर्षी एका सामन्यात हिरवी जर्सी घालून पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करतो. राजस्थान रॉयल्सकडून एक आगळावेगळा उपक्रम या वर्षी राबविण्यात आला, ज्या अंतर्गत त्यांनी बंगलोर विरुद्धच्या सामन्यात मारल्या गेलेल्या प्रत्येक षटकारासाठी राजस्थानमधील सहा कुटुंबांना सौर ऊर्जा पुरवली. बीसीसीआयच्या माध्यमातूनही या वर्षी कॅन्सर आणि थॅलेसेमियाशी झुंजणाऱ्या लहान मुलांना कुटुंबासमवेत सामना पाहण्यासाठी बोलावले गेले. बंगलोरच्या संघाने तर घरातील चार पायांच्या सदस्यांसाठीही विशेष व्यवस्था केली आहे. थोडक्यात आयपीएलची लोकप्रियता ही फक्त दोन पायांच्या प्राण्यांपुरती मर्यादित नसून चार पायांच्या प्राण्यांमध्येही आहे. फक्त त्याचे तिकीट काढण्याची क्षमता त्याच्या मालकात असली पाहिजे.

आयपीएलने केलेली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतात कमर्शियल स्पोर्ट्स लीगची नवी इंडस्ट्री जन्माला घातली. आज भारतात आयपीएल व्यतिरिक्त फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, बॅडिमटन अशा मैदानी खेळापासून ते चेससारख्या खेळापर्यंतच्या सर्व लीग्स खेळवल्या जातात. ज्याचा ढाचा हा आयपीएलसारखाच असतो. या सर्व लीग्स आयपीएल इतक्या प्रसिद्धी झोतात नसल्या तरीही लोकप्रिय आहेत. या खेळाडूंनाही चांगल्या प्रकारे पैसा मिळू लागला आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर म्हणजे सरकारच्या स्पोर्ट्स कोटय़ातून मिळणारी नोकरी किंवा पैसा फक्त क्रिकेटमध्येच मिळतो या पारंपरिक कल्पनांना छेद दिला आहे.

भारतीय संस्कृतीची एक वाहक म्हणून ही स्पर्धा नकळत का होईना पण कार्यरत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शेकडो परदेशी खेळाडू आणि इतर मंडळी भारतात येतात. या निमित्ताने त्यांची भारतीय कला, भाषा, खाद्य, पेहराव या सर्व गोष्टींशी जवळून ओळख होते. आज हे खेळाडू स्पर्धेच्या प्रमोशनसाठी मराठी, हिंदूी, तमिळ, तेलुगू अशा विविध भारतीय भाषांमध्ये संवाद साधतात. बिहू, रंगपंचमीसारखे सण एकत्र साजरे करतात. कधी भारतीय वेशभूषा आत्मसात करतात तर कधी भारतीय संगीतावर ठेका धरतात. या खेळाडूंच्या माध्यमातून या गोष्टी त्यांच्या देशातही जातात. ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा आपल्या कुटुंबासोबत भारतीय गाण्यांवर, चित्रपटांवर एवढे रिल्स करताना दिसतो की हा खरंतर डेव्हिड नसून एखादा देविलाल असावा असा विचार चटकन मनात येऊन जातो.

एवढय़ा वर्षांत वाढत गेलेल्या आयपीएलच्या या पसाऱ्याला वादाचीही मोठी किनार आहे. या स्पर्धेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी यांच्यावरच गैरव्यवहाराचे गंभीर आरोप झाल्याने ते सध्या भारताबाहेर परागंदा आहेत. २०१० साली आपल्या पदाचा गैरवापर करून कोची टस्कर्स या संघातील काही भाग मिळवल्याचे आरोप तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर झाला होता. या प्रकरणात त्यांना राजीनामाही द्यावा लागला होता. स्पर्धेतील दोन महत्त्वाचे संघ चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर मॅच फििक्सग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची कारवाई झाली होती. मैदानात होणाऱ्या राडय़ांची तर गणतीच नाही. कधी विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडतात तर कधी पोलार्ड विरोधी संघातील बॉलरवर चिडून बॅट उगारतो. हरभजन सिंगने तर ‘मैदानातील फटकेबाजी’ हे विशेषण एवढं गांभीर्याने घेतलं की त्याने थेट श्रीशांतच्या कानशिलातच लगावली होती. या वर्षीही कधी कर्णधार पदावरून तर कधी पंचाच्या निर्णयांवरून आयपीएलही वादग्रस्त ठरते आहे.

या सगळय़ा गोष्टींसकट आयपीएल आता कोटय़वधी भारतीयांसाठी आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. जेवढय़ा आतुरतेने गणेशोत्सव अथवा दिवाळीची वाट बघितली जाते तेवढय़ाच आतुरतेने आयपीएलचीही ओढ लागलेली असते. पुढच्या वर्षी लवकर या हे आपण तिला सांगत नसलो तरीही ती येतेच, किंबहुना ती येणार आणि नव्या दिमाखात येणार हे आपल्याला माहितीच असते. आयपीएल चांगली की वाईट याबद्दल आजवर अनेक वाद झाले. आजही होतात, आणि भविष्यातही होत राहतील पण तरीही एक गोष्ट सगळेच मान्य करतील की रोजच्या धकाधकीच्या आयुष्याला कंटाळलेल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात विरंगुळय़ाचे चार क्षण देण्याचे पुण्य तिच्या खात्यात जमा आहे आणि दरवर्षी त्यावर व्याजही चढत आहे.