पावसाळ्यात वीकेंडला शहराबाहेर जाऊन डोंगरकपारींमध्ये धबधब्यांखाली मनसोक्त भिजायचं हा फिरस्तींसाठी आवडीचा कार्यक्रम असतो. पण हा ‘जलजल्लोष’ नेमका कुठे अनुभवावा याचा लेखाजोखा आजच्या सफरनामामध्ये……

पावसाळी भटकंती म्हटलं की डोळ्यासमोर येतात ढगात लपलेले हिरवे डोंगरमाथे आणि कड्यांवरून कोसळणारे धबधबे ! उत्तुंग नभाची धरणीशी भेट घडते आणि त्यातून सृष्टीचं हे चैतन्य उमलत जातं. सह्याद्रीच्या माथ्यावरून असंख्य जलप्रपात स्वत:ला झोकून देतात. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रपातामुळे आणि त्यातून वाहणाऱ्या दगडगोट्यांमुळे खाली गोलाकर कुंड तयार होतात. पायथ्याचा दगड जितका जास्त टणक, तितकी आखीवरेखीव व खोलगट कुंड तयार होतात. निसर्गाचा अद्भुत नजारा अशा ठिकाणी पहायला मिळतो.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Elephant charges at man after persistent teasing
Viral Video : तरुणाने काढली हत्तीची छेड, संतापलेला हत्ती अंगावर आला धावून…पाहा पुढे काय घडले!
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
elephant doing a headstand video
खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री

धबधब्यांमध्ये चिंब भिजण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही, परंतु सगळेच धबधबे हे डुंबण्यासाठी नसतात. काहींचा आनंद दुरूनच त्यांचं सौंदर्य डोळ्यांत साठवून घेण्यात असतो, हे विसरून चालणार नाही. आजकाल समाजमाध्यमांवरील रील्स तसंच फोटो पाहून अनेक मंडळी या जागांकडे धाव घेताना दिसतात, असं सांगत धबधब्यांची भटकंती सातत्याने करणारा महाडमधील संकेत शिंदे म्हणाला, ‘सर्वांपेक्षा काहीतरी वेगळा कन्टेन्ट मला मिळावा या हट्टापायी अनेक तरुण मंडळी सह्याद्रीतील धोकादायक आणि आडवाटेवरच्या ठिकाणांची निवड करतात. अनेकजण फक्त समाजमाध्यमांवरील रील्स बघून जात असतात. खरंतर आपण जे आकर्षक रील्स पाहतो त्यामागे बनवणाऱ्यांची मेहनतही असते. कन्टेन्ट बनवणाऱ्या व्यक्तींनी त्या ठिकाणी आधी भेट देऊन पाहणी केलेली असते आणि मगच फोटो किंवा व्हिडीओग्राफी केलेली असते. परंतु बरेच उत्साही पर्यटक कोणत्याही अभ्यासाशिवाय हे साहसी पर्यटन करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात. त्यामुळे हल्ली सह्याद्रीतील अपघातांचे प्रमाण वाढले आहे’. अनादीअनंत काळापासून अज्ञाताचं कोडं उलगडण्याचं वेड मानवाला भुरळ घालत आलंय. त्याच ओढीने मानवी पावलं डोंगर दऱ्यांकडे वळतात. हा शोधही आवश्यकच आहे, पण तो सभान असावा, असंही तो नमूद करतो.

महाराष्ट्राला वरदहस्त लाभलाय सह्याद्रीचा! हा पुराणपुरुष आपल्या पोटात अनेक गुपितं राखून आहे. बेसॉल्टच्या रचनेमुळे सह्याद्रीच्या कुशीत अनेक लेणी, किल्ले, मंदिरांची सौंदर्यस्थळं आहेत. पावसाळ्यात या डोंगररांगा हिरवा साज लेऊन माथ्यावरून धबधब्यांची उधळण करत आपल्या डोळ्यांचं पारणं फेडतात. महाराष्ट्रातच यातील अनेक परिचित-अपरिचित धबधबे आहेत. प्रसिद्ध धबधब्यांवर पावसाळी पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालतं. महाराष्ट्राची शान असणारे काही धबधबे संकेतने सांगितले.

पालघर

पालघर जिल्ह्यातील जव्हारला फेसाळते धबधबे, दाट धुके आणि थंड हवामान लाभलं आहे. यामुळे मिनी महाबळेश्वर अशी ओळख जव्हारला प्राप्त झाली आहे. जव्हार जवळील दाभोसा, हिरडपाडा, काळमांडवी हे धबधबे बारमाही धबधबे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा आनंद लुटण्यासाठी नाशिक, मुंबई, गुजरात, दीव यासारख्या ठिकाणांहून लोक गर्दी करतात.

तिनेकशे फुटांवरून कोसळणारा दाभोसा धबधबा पाहताक्षणी तुमच्या नजरेचा ठाव घेतो. विशेषत: जुलैमधला धुवाधार पाऊस कोसळून गेला असेल तर दाभोसाची भली मोठी पांढरी शुभ्र जलधारा डोळ्यांचं पारणे फेडते. दाभोसा धबधब्याजवळ रॅपलिंग, कयाकिंग अशा साहसी खेळांची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र दाभोसाची रचना आणि स्वरूप पाहिल्यावर हा भिजायचा नाही तर फक्त पाहायचा धबधबा आहे याची खात्री पटते.

पुणे

पुण्यातील जुन्नर तालुक्यात माळशेज घाटाजवळील काळू आणि धुरनळी धबधबा हा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षणाचा भाग बनला आहे. अडराईच्या जंगलातून टप्प्यांमध्ये कोसळणारा प्रलयकारी काळू धबधबा, नाणेघाट मार्गातील रिव्हर्स / उलटा धबधबा पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करून टाकतो. अंजनेरी पर्वतावरील धबधबे, पाटण तालुक्यातील सडावाघापूर, अंबोलीतील कावळेसाद या ठिकाणांची ओळख सुप्रसिद्ध रिव्हर्स फॉल अशी बनली आहे. मुंबई-पुणे यांच्या मध्यावर असलेल्या लोणावळा येथील कातळधार धबधबा, कुणे फॉल्स, झेनिथ फॉल्स, भूशी डॅम या ठिकाणी पर्यटकांची गर्दी दाटलेली दिसते. असंच काहीसं चित्र ताम्हिणी घाट परिसरातील रिंग धबधबा, मिल्किबार, देवकुंड आणि सिक्रेट स्पॉट या धबधब्यांचं झालं आहे.

नाशिक

नाशिकमधील इगतपुरी हे परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. येथील धुक्याने आच्छादलेले डोंगर आणि त्यावरून वाहणारे असंख्य जलप्रपात पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. येथील अशोका धबधबा, कॅमल व्हॅली, गिरीसागर हे धबधबे प्रसिद्ध आहेत. याशिवाय, नाशिकमध्ये अशोका, डुगरवाडी हे धबधबेसुद्धा आहेत. लोकलने जाण्यासारखा आणि म्हणून मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झालेला एक धबधबा कसाऱ्याहून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. हा धबधबा विही गावाजवळ असला तरी आता तो ‘अशोका धबधबा’ म्हणून ओळखला जातो, कारण शाहरुख आणि करिनाच्या ‘अशोका’ चित्रपटातील एका गाण्याचा काही भाग इथे चित्रित झाला होता, असं गावकरी सांगतात. सध्या विही धबधब्याकडे लोक आकर्षित होतात, कारण इथल्या नैसर्गिक प्रस्तर भिंतीमुळे धबधब्यातून रॅपलिंग करण्याचा थरार अनुभवता येतो. विही गावामध्ये फारशा सुविधा नसल्याने कसाऱ्याहून पोटपूजेची व्यवस्था करून जाणं उत्तम. भंडारदरा येथील प्रवरा नदीवरील रंधा धबधबा, अंब्रेला धबधबा, आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी अशी ओळख असलेल्या सांधनदरी येथे देखील रिव्हर्स फॉलची किमया अनुभवता येते.

रायगड

पावसाचं हे भरून येणं अनुभवायचं असेल तर खरं पठारासारखी जागा हवी मोकळी. ती मुंबईत कुठून मिळणार? मग मुंबईकर धाव घेतात ती रायगड जिल्ह्याकडे. मुंबई-पुणे येथील प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी दरवर्षी वाढतच असल्यामुळे महाडजवळील कुंभे, सातसडा, नाणेमाची, शिवथरघळ, माझेरी या धबधब्यांकडे पर्यटक जाऊ लागले आहेत.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग

कोकणातल्या गावागावांकडचा पावसाळा असा अधीर करणारा असतो. म्हणूनच, मुंबईत काम करणारा चाकरमानी पावसाळ्याची वर्दी मिळताच गावाकडे धाव घेतो. निसर्गदेवतेने कोकणावर सौंदर्याची अक्षरश: लयलूट केली आहे. निसर्गाच्या विविध रूपांना नटवणारे जलप्रपात आपल्याला मोहातच पाडतात. संत रामदासस्वामीसुद्धा धबधब्याचे वर्णन करताना म्हणतात, ‘‘गिरीचे मस्तकी गंगा तेथुनि चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे’’. अशा अल्हाददायक आणि नीरव शांततेत सागरगड येथील सिद्धेश्वर, मार्लेश्वर आणि राजपूरजवळील धुतपापेश्वर वसलेले आहेत. येथील दुधाळ जलप्रपात, धीरगंभीर आवाज आणि त्यांचे रौद्ररूप हे सारं काही अचाटच. परशुराम घाटातील सवतसडा धबधबा, मिनी दूधसागर अशी ओळख असलेला उक्षी-रानपाटचा धबधबा, निवळीचा धबधबा, राजापुरजवळील सवतकडा, आंबोलीचा धबधबा हे सर्वच कोकणच्या निसर्गसौदर्यांत भर घालतात.

सातारा

मराठय़ांच्या इतिहासाची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या सातारा शहराच्या अवतीभवती पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये पावसाळ्यात अनेक जलप्रपात आपले जलवैभव दाखवत कोसळत असतात. जैवविविधतेने नटलेल्या साताऱ्यातील कास पठारावरून तीन टप्प्यांत कोसळणारा वजराई धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा मानला जातो. कोयना अभयारण्यात यासारखेच अनेक धबधबे फक्त लांबून पाहता येतात. ठोसेघर, केळवली, ओझर्डे हे त्यापैकी काही. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर येथील लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते.

कोल्हापूर

धबधब्यांच्या मौक्तिक माळा फक्त कोकणानेच मिरवाव्यात असं नाही. कोकणातून घाट माथ्यावर आल्यावरही धबधब्यांच्या जलधारांची मजा लुटता येते. कोल्हापूरमधील राऊतवाडी, तोरस्करवाडी, केर्ले, बर्की हे धबधबे प्रसिद्ध आहेत.

विदर्भ

पावसाच्या सरींना सुरुवात झाली की लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचीच पावलं आपोआप घराबाहेर पडायला लागतात. पाऊस एन्जॉय करणं शिकावं ते विदर्भकरांकडूनच. अमरावती येथील भीमकुंड, जवाहरकुंड, राणीगाव, वडाझिरी, चिंचाटी, गोंदियातील हाजरा धबधबा, बुलढाण्यातील जटाशंकर, महाकाली तर चंद्रपूर येथील भीमकुंड, मुक्ताई, रामदेगी, मोरचंडी हे धबधबे लोकप्रिय आहेत.

खानदेश

धुळे येथील नवादेवी आणि धाबादेवी धबधबे तर नंदुरबार येथील निनाई, सातपुडा पर्वतरांगेतील बारामुखी, सीताखाई, दहेल या धबधब्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.

गोवा

गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील दूधसागर धबधबा हा पर्यटकांचा लाडका धबधबा ! भारतातील उंच धबधब्यांपैकी पाचव्या क्रमांकाचा हा धबधबा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटामुळे आकर्षणाचा भाग झाला आहे. त्याच्या फेसाळ पाण्याच्या प्रवाहामुळे दुग्धाभिषेक करत असल्याची अनुभूती मिळते. धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांतून सर्वात जास्त पर्यंटक भेट देतात. गोवा प्रशासनाने अतिपाऊस आणि गर्दीमुळे मागच्या वर्षी दूधसागर धबधब्याकडे जाण्यास बंदी घातली होती. धबधब्यावर जाण्याची वाट ही महावीर वन्यजीव अभयारण्यातून असून त्यातील काही भाग हा रेल्वे रुळावरून पार करावा लागतो. वाटेत जळवांचे प्रमाण खूप असल्याने खबरदारी बाळगावी लागते.

डोंगरदऱ्यातला जलजल्लोष अनुभवताना थोडी काळजी अवश्य घ्या. पावसामुळे धबधब्याजवळचा परिसर निसरडा झालेला असतो, शेवाळ्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे उगाच धावपळ करू नका. धबधब्याचे डोह, त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि प्रमाण याचा अंदाज घेऊन मगच पाण्यात उतरा. उगाच नसते साहस करण्यासाठी धबधब्याच्या उगमापाशी जाण्याचा प्रयत्न करू नका. धबधब्याची मजा लुटताना मद्यापान करू नका. ज्यांना पोहता येत नाही त्यांना पाण्यात उतरायचा आग्रह करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात बोकाळलेले सेल्फीचे वेड पाहाता, धबधब्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढताना सावधगिरी बाळगा. जराशी काळजी घेतलीत तर पावसाळ्य़ातील धबधबाभेटीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.

viva@expressindia.com

Story img Loader