गुडघाभर चिखलातून जाणाऱ्या पायवाटा, धुक्यात मंत्रमुग्ध झालेली जंगले, सतत रिपरिपणाऱ्या जलधारा आणि गडकिल्ल्यांवरील सोसाट्याचा वारा हे सारे काही ट्रेकिंगच्या माध्यमातून याचि देही याचि डोळा अनुभवण्याची मजा काही औरच…

कडाक्याच्या उन्हात तापलेला सह्याद्रीचा काळाकभिन्न कातळ जलधारांच्या वर्षावानंतर हिरव्याकंच शालीने सजून आपले रौद्र रूप काही काळ दडवून ठेवतो. डोंगरकड्यांवरून एकसुरात कोसळणारे प्रपात, त्याच्याशी लगट करून दाटणारे दाट धुके, भर्राट वाऱ्याचे झोत आणि नीरव शांततेने रानभूल न पडल्यासच नवल… निसर्गाचे हे सौंदर्य अनुभवणे म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळाल्यासारखेच आहे. अशा पावसाळ्यामध्ये वेड लागतात ते निसर्गाच्या सान्निध्यात मनमुराद भटकंती करण्याचे. गुडघाभर चिखलातून जाणाऱ्या पायवाटा, धुक्यात मंत्रमुग्ध झालेली जंगले, सतत रिपरिपणाऱ्या जलधारा आणि गडकिल्ल्यांवरील सोसाट्याचा वारा हे सारे काही याचि देही याचि डोळा ट्रेकिंगच्या माध्यमातून अनुभवण्याची मजा काही औरच असते.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Yenpure gang , Katraj , Leader Yenpure gang arrested
पुणे : कात्रज भागातील येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक, मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार
Hapus season delayed , Hapus pune, pune, mango ,
पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Excessive use of chemical fertilizers disrupts the natural chain says MLA Arun Lad
रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे निसर्ग साखळी विस्कळीत – आमदार अरूण लाड

सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुरातन वास्तू, गडकिल्ले, लेणी तसेच मंदिरे यांची भटकंती आणि अभ्यास करणारा महाडमधील ट्रेकर तथा ब्लॉगर संकेत दिलीप शिंदे महाराष्ट्रातील वैभवशाली ट्रेकिंग पॉइंटबद्दल सविस्तर माहिती देताना म्हणाला, ‘महाराष्ट्राला आर्थिक, भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या वेगळेपण लाभलेले आहे. महाराष्ट्राला लाभलेली सह्याद्रीची मुख्य डोंगररांग ही ४०० किमी असून दक्षिणोत्तर अरबी समुद्राला समांतर पसरलेली आहे. याच डोंगररांगेमुळे कोकण आणि देश असे दोन भाग पडले आहेत. सह्याद्रीच्या मुख्य डोंगररांगेपासून विलग झालेल्या अनेक डोंगररांगा महाराष्ट्रात आहेत. रायरेश्वरापासून शिंगणापूरपर्यंत पसरलेल्या रांगेला शंभूमहादेवाची डोंगररांग म्हटले जाते. या रांगा सातारा-सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात. गोदावरी नदीच्या दक्षिणेस पसरलेल्या डोंगररांगेला पश्चिम बाजूस हरिश्चंद्र घाट तर पूर्वेकडील बाजूस बालाघाट म्हणून ओळखले जाते. हीच डोंगररांग पुढे आंध्र प्रदेशात जाते. नाशिक जिल्ह्याच्या वायव्य बाजूस सुरू होणारी सातमाळा डोंगररांग मनमाडच्या पुढे गेल्यावर अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखली जाते. अजिंठ्यापासून ही रांग विभक्त होऊन एक देवगिरी सिंदखेडवरून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाते. तिला ‘निर्मल रांग’ म्हणतात तर उत्तरेकडे ती रांग यवतमाळ जिल्ह्यातून जाते. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळ काहीसा भाग सातपुडा डोंगररांगेचा येतो’. इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या या डोंगररांगांमध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार स्वत:च्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले, असे सांगतानाच सह्याद्रीच्या उंचच उंच शिखरापासून ते खोलच खोल समुद्रात गिरीदुर्ग, मिश्रदुर्ग, भुईदुर्ग आणि जलदुर्ग अशा वेगवेगळ्या भौगोलिकतेचा उपयोग करून बांधलेले हे किल्ले पाहणे हा ट्रेकिंगच्या मोहिमांमधला अनेकांचा आवडीचा भाग. महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचे सखोल ज्ञान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा अचूक उपयोग स्वराज्याची स्थापना, विस्तार, संरक्षण आणि विकास यासाठी करून घेतला. गडकोट म्हणजेच राज्याचे मूळ, गडकोट हाच खरा खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजेच प्राण संरक्षण हेच धोरण डोळ्यासमोर ठेवून राजांनी अनेक ठिकाणीं विविध प्रकारच्या किल्ल्यांची उभारणी केली, अशी माहिती संकेतने दिली.

निसर्गात जाऊन त्याचा आनंद घेत निरीक्षण-अभ्यास करण्यासाठी ट्रेकिंग, पदभ्रमण हे एक माध्यम आहे. मग अशा माध्यमावर स्वार होताना स्वत: आणि स्वत:भोवतीच्या वस्तू या ‘फिट’ असल्याच पाहिजेत, असे मत मांडत पुण्यातील ट्रेकर स्वप्निल खोत याने ट्रेकिंग करताना कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले, अनेकजण पायात सँडल, हातात ट्रॅव्हल बॅग आणि डोक्यावर छत्री असा जामानिमा करत डोंगरदऱ्यांत शिरतात. मग सगळीच अवस्था फाटकी होऊन बसते. पायांत चांगल्या तळव्याचे बूट, अंगात रेनकोट, पाठीवर चांगल्या बंदांची पाठपिशवी (सॅक) आणि डोक्यावर टोपी असा वेश ट्रेकिंग करताना असलाच पाहिजे, तरच आधारासाठी रिकामे हात आणि भक्कम पाय वापरायला मिळतील, असे स्वप्निल सांगतो. ‘सॅक भरतानाही आतील वस्तू धो धो पावसात भिजणार नाहीत याची काळजी घेत भराव्यात. त्यामध्ये कॅमेरा, बॅटरी, मोबाइल, चार्जर अशा गोष्टींची काळजी थोडी जास्त घ्यावी. पावसातल्या प्रत्येक वारीवेळी कोरड्या कपडय़ांचा एक जादा जोड बरोबर ठेवावा. सॅकमधील वस्तूंमध्ये छोटीशी दोरी, टॉर्च, आवश्यक औषधे, पाण्याची बाटली, रक्तगट – दूरध्वनी क्रमांक असलेले ओळखपत्र, पाण्याची बाटली, काड्यापेटी – मेणबत्ती या गोष्टी ‘किरकोळ’ न मानता आठवणीने घ्याव्यात. यातली एखादी छोटी वस्तूही या आडवाटांवर मौल्यवान ठरू शकते. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास पाण्यात उतरू नका. अपरिचित ट्रेकिंग पॉइंटला जाताना स्थानिक वाटाड्या सोबत असायलाच हवा’ असेही तो विशेषत्वाने नमूद करतो.

पावसाळ्यात भटकंती करताना वातावरणातील बदलांचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे. हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे गडकिल्ले आणि दरडग्रस्त भागातील काही ट्रेकिंग पॉइंट्स शासनाने तात्पुरते बंद केले आहेत. बऱ्याचदा हौशी पर्यटक हे गडकिल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्यापेक्षा त्या पॉइंट्सला एक मौजमस्ती करण्याचे ठिकाण समजतात. भटकंती करताना गडाचा इतिहास जाणून घेत तिथला निसर्ग अनुभवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात मनसोक्त भटकंती करता येण्यासारख्या परिचित-अपरिचित अशा गडकिल्ल्यांची आणि ट्रेकिंग पॉइंट्सची माहिती सह्याद्रीमित्र गिरिभ्रमण संस्था, महाड येथील सदस्य संकेत दिलीप शिंदे याने दिली.

जिल्हा ठाणे व पालघर :

पालघर विभागात अनेक लहानमोठे किल्ले आहेत, त्यापैकी अशेरीगड हा त्याच्या प्रचंड आकारमानामुळे बुलंद वाटतो. त्याशिवाय आसावा, कोहोज आणि काळदुर्ग या किल्ल्यांचा समावेश होतो. जव्हार आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील भटकंतीकरिता मध्यम श्रेणीतील हे किल्ले आहेत. ठाण्यातील शहापूर तालुक्यात माहुली-भंडारगड-पळसगड हे दुर्गत्रिकूट आहे. तांदुळवाडी, कामनदुर्ग, टकमक, मलंगगड, सिद्धगड, गोरखगड या मध्यम श्रेणीतील किल्लेही या परिसरात आहेत. वरीलपैकी कोणतेही किल्ले मुंबईहून एका दिवसाच्या भटकंतीत पूर्ण करता येतात.

जिल्हा पुणे :

हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी अशी ओळख असलेला गडांचा राजा, राजियांचा गड म्हणजेच किल्ले राजगड हा मावळ भागामध्ये आजही आपल्याला हिंदू स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. याशिवाय, पावसाळ्यात मावळातील रायरेश्वर, कैलासगड, घनगड, प्रचंडगड, मोहनगड, रोहीडा, कोरीगड, लोहगड, विसापूर, कोकणदिवा, पुरंदर, तुंग, तिकोना यांसारखे किल्ले आहेत. पुण्यातील जुन्नर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून शिवनेरी हे महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र बनलेले आहे. याच परिसरात हडसर, जीवधन, नाणेघाट, निमगिरी, चावंड, हटकेश्वर यांसारखे ट्रेकिंगचे पर्याय आहेत. लोणावळा परिसरात राजमाची, भीमाशंकर, ड्युक्स नोज, ढाकगड, कोथळीगड या ठिकाणांची भटकंती आपण करू शकतो.

जिल्हा रायगड :

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यांचा शेवटकाळ अनुभवलेल्या अशा अभेद्या रायगड किल्ल्यावर एकदा तरी जाण्याची इच्छा ही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची असतेच. रायगड जिल्ह्यात अवचितगड, माणिकगड, कर्नाळा, मृगगड, सरसगड, सुधागड, सुरगड, घोसाळगड असे अनेक किल्ले आहेत. शिवाय माथेरानजवळ विकटगड, सोंडाई, चंदेरी, प्रबळगड, गार्बेट पठार, इर्शाळगड यांसारखे उत्तम ट्रेकिंग पॉइंट आहेत.

जिल्हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग :

जावळीच्या खोऱ्यात मोडणारे सुमारगड-महिपतगड-रसाळगड हे दुर्गत्रिकूट सर्वांच्याच परिचयाचे आहे. याशिवाय, भवानगड, कोळकेवाडी दुर्ग, मंडणगड, पालगड, रत्नदुर्ग यांची निवड करता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महादेवगड, रामगड, यशवंतगड, खारेपाटण, भरतगड, भगवंतगड या किल्ल्यांची भटकंती करता येते.

जिल्हा कोल्हापूर :

महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेला किल्ला म्हणजे पन्हाळा किल्ला होय. थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे येथे राहण्याची व खाण्याची उत्तम सोय आहे. याशिवाय रांगणा, भुदरगड, विशाळगड, कलानिधीगड, पारगड, सामानगड हे किल्ले या परिसरात आहेत.

जिल्हा सातारा आणि सांगली :

मराठ्यांची चौथी राजधानी अशी ओळख अजिंक्यतारा या किल्ल्याची आहे. महाबळेश्वरच्या जंगलात आणि पार घाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड नावाचा बुलंद किल्ला बांधला. याच किल्ल्याच्या पायथ्याशी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध महाराजांनी केला. राजधानी साताऱ्यात दातेगड, सज्जनगड, कमळगड, भूषणगड, वैराटगड, चंदन- वंदन, कल्याणगड यांसारखे अनेक बलाढ्य किल्ले आहेत. पाटेश्वर आणि जरंडेश्वर यांसारखी देवस्थाने प्रसिद्ध आहेत. सांगलीमध्ये मच्छिंद्रगड आणि विलासगड यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत.

जिल्हा नाशिक :

महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला अशी साल्हेर किल्ल्याची ओळख आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक किल्ले नाशिक जिल्ह्यात आहेत. याशिवाय मुल्हेर, हरिहर, भास्करगड, अंकाई- टंकाई, त्रिंबकगड, अंजनेरी हे किल्ले आहेत. इगतपुरी परिसरात मोरधन, कावनई, त्रिंगलवाडी, बितनगड, औंढा हे किल्ले आहेत.

जिल्हा नगर :

ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवरील अजस्रा पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. निसर्गसौदर्याने नटलेला हा किल्ला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. शिवाय महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नगर जिल्ह्यात आहे. रतनगड, भैरवगड, विश्रामगड हे किल्ले आहेत.

जिल्हा जळगाव आणि धुळे :

जळगावमधील कन्हेरगड, अंमळनेर, पारोळा हे भुईकोट किल्ले आहेत. धुळेमधील लळिंग, सोनगीर, भामेर हे मध्यम श्रेणीतील किल्ले आहेत.

विदर्भ :

विदर्भामध्ये नरनाळा, गाविलगड, रामटेक, सिताबर्डी, आमनेर, बाळापूर यांसारखे सोप्या श्रेणीतील किल्ले आहेत.

मराठवाडा :

महाराष्ट्रातील उत्तम किल्ल्यांमध्ये मराठवाड्यातील देवगिरी किल्ल्याची गणना केली जाते. याशिवाय, अंतूर, वेताळवाडी हे भुईकोट आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा भूदुर्ग अशी धाराशिवमधील नळदुर्ग किल्ल्याची ओळख आहे. नांदेडमधील कंधार किल्लासुद्धा सोप्या श्रेणीतील किल्ला भटकंतीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

viva@expressindia.com

Story img Loader